स्थूल सूक्ष्म सर्व जाणावे | रचनाकारे ||
(c) योगेश पाठक
पुण्यातील मुळा-मुठा सुशोभीकरणाच्या केंद्रस्थानी वास्तुविशारदाने केलेले ‘प्रोजेक्ट डिझाईन’ आहे, जे अशा सर्व प्रकल्पांचा गाभा असतो.
एखाद्या प्रकल्पाचे डिझाईन खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही नसेल तर ते तसे का नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. या ‘का’ वर जी उत्तरे येतात त्यावर अजून अनेक वेळा ‘का’ विचारत गेल्यास (5 why’s technique) आपल्याला वास्तुविशारदाचा पेशा, त्यांचे शिक्षण, त्यांचे व्यावसायिक अवकाश व संधी या सर्वांचा विचार करावाच लागतो. हा या लेखाचा विषय आहे.
या लेखात ‘रचनाकार’ या संज्ञेत खालील व्यावसायिकांचा अंतर्भाव केला आहे:
-
वास्तुविशारद (building architect) : सामान्यत: सर्व इमारतींची रचना करणारे
-
भूशोभाकार / स्थलशिल्पी (landscape architect/designer): इमारतींच्या आजूबाजूस असलेले नैसर्गिक क्षेत्र मानवास आवडेल अशा रीतीने घडविणारे, सजविणारे
-
नगररचनाकार : शहराची किंवा त्यातील मुख्य भागांची, प्रकल्पांची मुख्यत्वे मानवकेंद्री दृष्टीकोनातून रचना करणारे
या लेखात निसर्गस्नेही / पर्यावरणस्नेही रचना (design) कशी असावी याचा ऊहापोह केलेला नाही. निसर्गस्नेही रचनेची मुख्य तत्वे जाणकार अभ्यासकांनी याआधीच लिहून ठेवली आहेत. उदा.
-
लॉरी बेकर यांची रचना-तत्वे
-
Ecological Design (Sim Van der Ryn, Stuart Cowan)
-
Responsibility of a Designer – An Ecologist’s Perspective (Prakash Gole, Journal of Ecological Society, 2010)
-
शेकडो गाव-पाडे-आदिवासी वस्त्यांमधून पारंपरिक पद्धतीची घरे बांधणारे गावकरी, बेलदार, गवंडी, सुतार, आदिवासी. त्यांनी पुस्तके लिहिली नसतील, पण त्यांच्या घर बांधण्याच्या कलेत आपण अनेक पर्यावरणस्नेही रचना-तत्वे प्रत्यक्ष बघू शकतो.
प्रश्न असा आहे की पर्यावरणस्नेही रचना-तत्वे गेल्या अनेक शतकांपासून माहीत असताना, मुख्य प्रवाहातील आजचे रचनाकार ही तत्वे का वापरत नाहीत?
मानवी विचार, भावना, वस्तू, सेवा, अर्थकारण, यांच्या पसाऱ्यात कुठल्याही व्यवसायाचे एक विशिष्ट स्थान असते. मानवी इतिहास आणि संस्कृती यात त्या व्यवसायाची एक जागा असते. कुठलाही महाविद्यालयीन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यास हे संदर्भबिंदू समजणे, त्याने त्याबद्दल प्रश्न विचारणे महत्वाचे आहे. पण बहुतेक वेळा विद्यार्थी आपल्या व्यवसायाचे संदर्भबिंदू न समजता, त्याला प्रश्न न विचारता, वैचारिक आव्हान न देता, संपूर्ण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतो. आपल्या व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल विद्यार्थी अनेक गोष्टी आपोआप गृहीत धरतात आणि हीच गृहीतके विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या पुढे पोहोचवत राहतात.
रचनाकार होणारे विद्यार्थी व व्यावसायिक यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारणे आवश्यक आहे:
-
माझा व्यवसाय नक्की काय आहे? माझ्या क्षेत्रातील व्यावसायिक नक्की कोणती सेवा पुरवतात? या सेवा मानव आणि समाजासाठी कशा तऱ्हेने उपयुक्त आहेत किंवा नाहीत? माझ्या व्यवसायाने मानवजातीला कोणती आर्थिक, भावनिक किंवा मानसिक-शारीरिक उपयुक्तता/स्थैर्य/सुख प्रदान केली आहे?
-
मानवी समाजांच्या वैविध्यपूर्ण ‘गोधडी’त, माझा व्यवसाय काही मोजक्या समाजांसाठी (उदा. शहरी) उपयुक्त आहे की सर्वांना ? माझ्या व्यवसायाचे आर्थिक गणित काय आहे व ते अर्थव्यवस्थेत कुठे बसते? मी जिथे राहतो तेथील स्थानिक समुदायासाठी माझा व्यवसाय उपयुक्त आहे का?
-
माझ्या व्यवसायाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे (सेवेचे स्वरूप, साधने, तंत्रज्ञान)?
-
हा व्यवसाय माझ्यासाठी कसा उपयुक्त आहे? पुढील 5, 10, 20, 30, 40 वर्षांत माझी काय प्रगती होईल? प्रगतीची माझी कल्पना काय आहे? माझ्या व्यवसायात व्यावसायिक कसे परिपक्व होतात?
-
या व्यवसायातील उत्पादने किंवा सेवा कशा तयार केल्या जातात आणि वितरित केल्या जातात? त्यांची कच्चा/पक्का माल आणि ऊर्जेची गरज काय आहे? याचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?
-
माझ्या व्यवसायातील वस्तू-सेवा देण्यासाठी कोणती साधने आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे? ते कोठून आले आहेत? त्यांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो?
-
माझ्या व्यवसायातील वितरीत केलेल्या वस्तू आणि सेवांचा मानवी आरोग्यावर (मानसिक आरोग्यासह) काय परिणाम होतो – ग्राहक, पुरवठादार, व्यावसायिक, इतर कामगारांवर?
-
हे परिणाम किती काळ टिकतात? ते दीर्घकालीन आहेत की अल्पकालीन?
-
पर्यावरणावर/मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतील, तर ते दूर करण्याचा किंवा कमी करण्याबद्दल माझा व्यवसाय कसा विचार करतो? नसेल तर का नाही?
-
माझा व्यवसाय आणि स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पर्यावरणीय आव्हाने यांच्यात काय अन्योन्यसंबंध आहेत?
-
माझ्या व्यवसायात सध्या कोणत्या प्रकारचे पर्यावरणीय नियम/अटी/मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया आणि संस्था आहेत आणि ते उद्देश पूर्ण करतात का?
-
हे विपरीत पर्यावरणीय परिणाम कसे कमी करता येतील? उद्दिष्टे व प्रक्रिया यांची कोणत्या प्रकारची पुनर्रचना आवश्यक आहे? परिवर्तनात्मक मोठे बदल कोठे आवश्यक आहेत आणि छोटे छोटे उपाय कोठे आवश्यक आहेत?
-
मानवी पसाऱ्यातील या व्यवसायाच्या ‘स्थानाचा’ नव्याने विचार करता येईल का? हा व्यवसाय पूर्णपणे थांबविणे किंवा लक्षणीयरित्या बदलणे आवश्यक आहे का?
-
माझ्या व्यवसायातील व्यावसायिक संघटना कॊणत्या आहेत आणि वरील प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे?
वरील प्रकारची आत्मपरीक्षणपर प्रश्नावली सर्व प्रकारच्या व्यावसायिकांस उपयुक्त आहे, पण रचनाकारांसाठी ती विशेष महत्वाची आहे. कारण रचनाकाराचे कार्य हे जमिनीच्या, म्हणजेच निसर्गाच्या एका विशिष्ट तुकड्यावर पुढची अनेक वर्षे उभे राहणार असते. त्याचा तेथील निसर्गावर थेट परिणाम होत असतो. जैवपर्यावरणवादी परिप्रेक्ष्यातून रचनाकार हा निसर्ग आणि मानव यांच्या मधोमध उभा असतो आणि त्याने घेतलेल्या प्रत्येक छोट्यामोठ्या निर्णयाचा निसर्गावर परिणाम होणार असतो.
रचनाकाराच्या (विशेषतः शहरातील) व्यवसायाची एकंदर परिसंस्था, त्याच्या व्यवसायाचे प्रेयस व श्रेयस, आणि त्याच्या व्यवसायाने सामाजिक-आर्थिक परिस्थितीत घडविलेला एकंदर बदल, या सगळ्या चित्रात आत्तापर्यंत निसर्ग कुठेच नव्हता, तो आता यायला हवा - आणायला हवा, हे आज रचनाकाराचे आद्य कर्तव्य आहे. रचनाकाराने निसर्ग-मानव शाश्वत सहअस्तित्वाचा जाणीवपूर्वक पुरस्कार करायला हवा. त्यासाठी जे काही बदल आवश्यक आहेत ते बदल घडवून आणणारा उत्प्रेरक व्हावे.
यासाठी रचनाशास्त्रच (architecture) जास्त व्यापक आणि आंतरशाखीय व्हावे. आजच्या रचनाशास्त्रात रचनेचा इतिहास, रचना-विचार, मानववंशशास्त्र, मानवी आरोग्य, मृदा-अभ्यास, भूशास्त्र, अभियांत्रिकी, चित्र व शिल्पकला, पाणी, हवामान, संसाधनांचा अभ्यास व उपलब्धता, पदार्थ-अभ्यास, स्थानिक व राष्ट्रीय नियम-नियंत्रणे, माहिती तंत्रज्ञान या सर्वांचा अंतर्भाव असतो. वरवर पाहता ते एक परिपूर्ण शास्त्र वाटते. पण शाश्वत सह-अस्तित्वाचा आत्मा, म्हणजेच निसर्गाबद्दलचा सर्वंकष दृष्टिकोन जोपर्यंत त्यात येत नाही, तोपर्यंत ते अपूर्णच राहणार.
यासाठी रचनाकाराने खालील विषयांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते: परिसंस्थाशास्त्र, जैवविविधता, जल व मृदा यांचे पुनर्भरण, भूचित्र अभ्यास, परिसंस्थांचे संवर्धन, निसर्गस्नेही बांधकाम तंत्रे, निसर्गस्नेही कच्चा माल, ऊर्जावापर, अन्ननिर्मिती, साधे-समुचित तंत्रज्ञान, वापरा-व-फेका याऐवजी दुरुस्ती व पुनर्वापर, अर्थव्यवस्था, स्थानिक व जागतिक पुरवठा साखळ्या, उपभोगाची साधने, कौटुंबिक मूल्ये, सामाजिक-आर्थिक स्तर व महत्वाकांक्षा, आर्थिक विषमता, खाजगी व सामुदायिक जीवन यातील समतोल, मानसिक व शारीरिक आरोग्य, हवामानबदल व त्यामुळे येणारी नैसर्गिक संकटे, अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी लागणारी लवचिकता, इत्यादी.