top of page
नदीसुधार: मूल्यव्यवस्था व्यापक व्हावी 

(c) योगेश पाठक 

* अमेरिका १८५०-१९६० (विशेषतः १९३४-१९५९).

* चीन १९५०-२०१०: प्रथम सरकारी व १९९२ नंतर खाजगी औद्योगिकरण.

* भारत १९५० ते आत्तापर्यंत: प्रथम सरकारी व १९९१ नंतर खाजगी औद्योगिकरण.

एखादा देश वेगाने औद्योगिक होण्याच्या, विकसित होण्याच्या घाईत असतो ती ४ ते ८ दशके अशी असतात की तेव्हा नैसर्गिक परिसंस्थांकडे कुणाचेच लक्ष नसते. या काळात भराभर उभे केले जाणारे कारखाने, बेसुमार वाढत जाणारी शहरे, हे सगळं एकमेकांना जोडण्यासाठी केले जात असलेले रस्ते, आणि सर्व प्रकारचे प्रदूषण यांचा घाला निसर्गावर पडत असतो.  

 

नद्यांवर मोठी धरणे बांधली जात असतात, जंगले कापली जाऊन त्यांचे क्षेत्र कमी होत असते, नद्या, इतर जलाशय व हवा प्रदूषित होत असतात, आणि डोंगर फोडले जाऊन त्यांच्यातून घाटरस्ते, रेल्वेमार्ग निघत असतात. माळरानांवर विमानतळ बांधले जात असतात किंवा नवीन उपनगरे/शहरे वसत असतात. नैसर्गिक संसाधनांचे खाजगीकरणही होत असते, संपत्तीची निर्मिती होत असते आणि त्याचा निसर्गावर अजून वेगळा ताण येत असतो. 

 

निसर्गाचा हा विनाश जरी समजत असला तरी उमजून येत असतोच असे नाही. विकासाची झापडबंद स्पर्धा, नवीन उद्योग, नवीन कौशल्ये, संपत्तीनिर्मिती व त्यातून साध्य होणारे नवनवे उपभोग यात समाज मश्गुल असतो, तर वाढत्या लोकसंख्येच्या मागण्या पुरविणे, विकासाची स्वप्ने दाखविणे, रोजगार निर्मिती, जागतिकीकरण हे प्रशासनाचे प्राधान्यक्रम असतात. 

 

औद्योगिकरण स्थिरस्थावर होऊ लागले की राजसत्तेस व जनसमूहास थोडी फुरसत मिळते व शाश्वत मूल्यांचा विचार जास्त होऊ लागतो (उदा. पर्यावरण, आर्थिक व सामाजिक समता). ज्यांनी हे मुद्दे आत्तापर्यंत मांडले असतात त्यांना छांदिष्ट किंवा चळवळे असे लेबल न लावता त्यांच्या विचारांकडे आता जास्त लक्ष दिले जाते. ओढ्यांपासून सड्यांपर्यंत अनेक दुर्लक्षित परिसंस्थांकडे लोकांचे लक्ष जाऊ लागते. त्यांच्याबद्दल समाजमनात नव्याने आस्था निर्माण होते. लोकांकडे संपत्ती व स्थैर्य आल्यामुळे जो मोकळा वेळ असतो, तसेच मानवास निसर्गाबद्दल जे मूलभूत कुतूहल व ओढ असते, ती यास कारणीभूत आहे. मधील काळात निसर्गावर जो घाला पडला त्याची आता एक प्रकारे  उलटतपासणी होऊ लागते. 

 

हा एक महत्वाचा बिंदू असतो. इथून पुढे शाश्वत विकासाच्या मूल्यांनुसार निसर्गाचे रक्षण/पुनरुज्जीवन केले जाईल का, हे त्या देशातील कायदे, न्यायसंस्था, निर्णयप्रक्रिया (लोकशाही किंवा इतर), (लोकशाही असल्यास) लोकशाहीचा गुणात्मक दर्जा, राजकारण, चळवळी, शिक्षण, ज्ञाननिर्मितीची-देवघेवीची प्रक्रिया, व लोकांचा एकंदर प्रामाणिकपणा यावर अवलंबून असते. मूल्यव्यवस्था व्यापक होण्यात पर्यावरणप्रेमी नागरिक (खरंतर सर्व नागरिक) व सामाजिक संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतात. 

नदीच्या संदर्भात या प्रक्रियेचे एक उदाहरण म्हणून आपण अमेरिकन शहरांतील नद्या व नदीकाठ यावर एक दृष्टिक्षेप टाकू. {संदर्भ: Ecological Riverfront Design – Betsy Otto, Kathleen McCormick, and Michael Leccese – https://www.csu.edu/cerc/documents/EcologicalRiverfrontDesign.pdf}

 • १९वे शतक: मिसिसिपी व ओहायो या मोठ्या नद्यांचा मालवाहतुकीसाठी उपयोग. पिट्सबर्गसारख्या देशांतर्गत बंदराचा उदय. 

 • पूर्व किनारा व देशांतर्गत जलवाहतूक/बंदरे यांना जोडणाऱ्या कालव्यांची बांधणी.  

 • १९ व्या आणि २० व्या शतकात जलवाहतूक करणाऱ्या नद्यांच्या काठी अनेक शहरे उभी राहिली. उदा. देशांतर्गत वाहतुकीसाठी पिट्सबर्ग, सिनसिनाटी, तर समुद्री वाहतूक जिथून शक्य होती अशी फिलाडेल्फिया, बाल्टिमोर, आणि  पोर्टलॅंड. 

 • या सर्व बंदरांमध्ये काही समान वैशिष्ट्ये होती. १९ व्या शतकात या शहरांतील नद्यांवर प्रथम एक साधी लाकडी जेट्टी असायची. पुढे याचा विस्तार होऊन मालधक्के सुरु झाले. नदीकाठावरच मालधक्क्यांच्या बाजूला व्यापारी कार्यालये, गोदामे उभी राहिली. तिथे पोचण्यासाठी म्हणून रस्त्यांचे जाळे तयार झाले. व्यापार जास्त वाढत गेला तसे अजून मालधक्के, इमारती, रस्ते नदीकाठच्या प्रदेशात सुरु झाले. व्यापार, नौकाबांधणी, वाहतूक, आणि व्यापारी तत्त्वावरील मासेमारी यामुळे या शहरांची आर्थिक वाढ झाली. 

 • १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या सर्व शहरांत रेल्वे आली. नदीकाठचा परिसर आता रेल्वेचे जाळे, गोदामे यासाठीही वापरला जाऊ लागला व जवळपास पूर्ण भरत आला. व्यापारउदीम एवढा वाढला की शहरांचे मध्यवर्ती भाग (downtown) दुसरीकडे विकसित होऊ लागले. हळूहळू पाण्याऐवजी रेल्वेद्वारे होणारी वाहतूक वाढू लागली. तरीही नदीकाठाचे व्यापारी महत्व कमी झाले नाही. १८५० ते १९५० या काळात तेथील गोदामे, रस्ते, व्यापारी इमारती यांचा पुरेपूर वापर होत राहिला. 

 • विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हमरस्ते व फ्लायओव्हर बांधले गेल्यावर नदीकाठ आणि शहर यांच्यातला दुवा हळूहळू कमी होऊ लागला. सांडपाणी प्रक्रियाकेंद्र (सीवेज ट्रीटमेंट प्लांट – STP) नदीकाठी उभे करायची प्रथा याच काळात पडली. बरेचदा सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते नदीत सोडण्यात येई (विशेषतः पावसाचे पाणी पडत असताना). 

 • मागील लेखात आपण पाहिले कि पूर हे एक मानवनिर्मित संकट आहे. व्यापारी इमारती, गोदामे नदीकाठी दाटीवाटीने उभी असल्याने त्यांना पुराचा धोका होताच. पुराचा धोका कमी करायची जबाबदारी अमेरिकन लष्कराचा अभियंता विभाग (U.S. Army Corps of Engineers) यांच्याकडे सोपविली गेली. त्यांनी लष्करी खाक्याने नदीचे सरळीकरण, खोलीकरण,  नदीकाठचा नैसर्गिक झाडोरा तोडणे, पुरापासून संरक्षण करण्यासाठी भिंती उभारणे, पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी बंदिस्त करण्यासाठी भिंती उभारणे, अशी तंत्रे या काळी विकसित केली. पुढे या तंत्रांचा जगभर सर्रास वापर सुरु झाला. या तंत्रांमुळे नदी शहरी भागात तिच्या काठावरील सपाट प्रदेशापासून (floodplain) पूर्णपणे वेगळी झाली. 

 • १९५० च्या दशकात तंत्रज्ञानातील बदलांमुळे जलवाहतूक एकंदर कमी झाली (इतर प्रकारची वाहतूक वाढली) व शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या वरील बंदरांचा वापर कमी झाला. याच सुमारास अमेरिकेत आंतरराज्यीय महामार्गांचे जाळे तयार होत होते. नदीकाठांवरील अजून न वापरल्या गेलेल्या (नैसर्गिक) जमिनी अनेक ठिकाणी या रस्त्यांसाठी देण्यात आल्या. महामार्ग व नदी यांच्यामध्ये पुन्हा भिंती/कुंपणे उभारण्यात आली. परिणामी, अशा सर्व ठिकाणी नदीचा तिच्या सभोवतालच्या परिसरापासून व माणसापासून संबंध तुटला. 

 • त्यामुळे १९६० च्या दशकापर्यंत असे अनेक नदीकाठ भकास दिसू झाले. त्यांच्याभोवती निसर्ग आणि माणूस नव्हता, पण आधीच्या औद्योगिक इमारतींच्या काळवंडलेल्या खुणा होत्या. औद्योगिक कचरा व सांडपाणी नद्यांमध्ये सर्रास सोडण्यात येत होते. नद्या प्रदूषित होत होत्या. 

 • १९६२ साली रॅचेल कार्सन यांचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. आधुनिक पर्यावरणीय विचार सुस्पष्टपणे मांडला जाऊ लागला. १९६० च्या दशकात हळूहळू सॅन फ्रांसिस्को, सॅन अँटोनियो, न्यू बेडफोर्ड अशा शहरांनी आपले नदीकाठ पुनर्विकसित करून मोकळी जागा, घरे, दुकाने, कार्यालये आदींसाठी देण्याचा विचार सुरु केला. यामागे शहराच्या त्या भागाला आर्थिक उभारी देण्याचा विचारही होताच.  

 • १९७० च्या दशकांपर्यंत ‘शहरातील नदीकाठांचे काय करायचे’ यावर अमेरिकेत पुष्कळ चर्चा सुरु झाली होती. हा भाग परत उद्योगप्रधान, स्वच्छ व रमणीय करावा, तिथे स्थानिक लोक व प्रवासी यांना यावेसे वाटावे असा एकंदर मतप्रवाह होता. बाल्टिमोर, बोस्टन, आणि टोरोंटो इथल्या नद्यांवर झालेले पुनर्विकासाचे प्रकल्प याचे उदाहरण आहेत. भरपूर मोकळी जागा, पायवाटा, मस्त्यालय, दुकाने, रेस्तराँ, कार्यालये, घरे, असे या प्रकल्पांचे स्वरूप आहे. असे प्रकल्प पुढे शिकागो आणि डेन्व्हर इथेही सुरु झाले. 

 • १९८० पासून ते आतापर्यंत असे अनेक प्रकल्प तिथे झाले. परंतु गेल्या २५ वर्षात या प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय मूल्यांना झुकते माप दिले गेले आहे. याची काही कारणे आहेत, ती खालीलप्रमाणे. 

 • नदीत वाहणारे पाणी स्वच्छ/शुद्ध असावे याबद्दल खूपच जनजागृती झाली. १९७२ मध्ये पास झालेल्या Clean Water Act नंतर साधारण एक लाख कोटी डॉलर्स फक्त वेगवेगळ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर खर्च करण्यात आले. १९७० पर्यंत सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, व शैवाल यांनी भरून वाहणाऱ्या अमेरिकन नद्यांमधील पाणी १९८० च्या दशकापासून बहुतांशी स्वच्छ दिसू लागले. नद्यांमधील मासे व जवळ वावरणारे पक्षी यांची विविधता वाढत चालली. नागरिक नदीजवळ चालण्यासाठी येऊ लागले, नदीत होड्या वल्हवू   लागले. 

 • १९९० च्या दशकापासून आरोग्याविषयी जी जनजागृती झाली त्यामुळे नदीकाठी भरपूर मोकळ्या जागा असाव्यात, हिरवाई असावी, व्यायाम करता यावा, पायवाटा असाव्यात, फक्त दुकाने व कॅफे नकोत, असा आग्रह अमेरिकेतील नागरिकांकडून सुरु झाला व तो स्थानिक सरकारांनी मानला. 

 • त्याच सुमारास झालेल्या पर्यावरणीय जागृतीमुळे नैसर्गिक संसाधनांचे दीर्घ पल्ल्याचे संरक्षण व नियोजन आपली पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे हा विचार अधोरेखित झाला. स्थानिक निसर्गरक्षण चळवळींना जोम आला.  फक्त सुशोभीकरण नको, फक्त्त आधीची घाण साफ करणे नको, तर नदीचे नैसर्गिक कार्य पुन्हा कसे चालू होईल, त्यासाठी नदीचे एक परिसंस्था म्हणून पुनरुज्जीवन कसे करायचे हा विचार चालू झाला  (उदा. नैसर्गिकरित्या पुराचे नियंत्रण, पाण्याचे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण, अनेक प्राणिपक्ष्यांसाठी अधिवास, फक्त शाश्वत मूल्यांनुसार मासेमारी, इत्यादी). नदीची ही नैसर्गिक कार्ये एकदा बंद झाली कि पुन्हा सुरु करणे किती अवघड असू शकते हे सर्वांच्या लक्षात आले होते. 

 • अमेरिकेतील जलमय भूमीचा (wetlands) वेगाने होणारा ऱ्हास ही एकंदर चिंतेची बाब झाली होती, त्यामुळे १९९० पासून त्यांच्या संरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्व पातळीवरील सरकारे व नागरिकांनी केले. १९५० च्या आसपास दरवर्षी ५ लाख एकर जलमय भूमी नष्ट होत होती तो दर २००४ पर्यंत १ लाख एकर एवढा खाली आला. 

 

थोडक्यात, अमेरिकेत पर्यावरणीय जागृती १९६० च्या दशकापासून सुरु झाली. वर उल्लेखलेला आत्मपरीक्षण बिंदू अमेरिकन शहरातील नद्या व नदीकाठ यांच्या संदर्भात १९७०-१९९० मध्ये आला. पर्यावरणीय मूल्ये नदीविकासाच्या कल्पनांमध्ये तसेच सर्व सरकारी प्रकल्पातही रुजली व त्याची फळेही दिसू लागली. बहुतांश  प्रकल्पात स्थानिक सरकारांनी, सजग नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी मोलाची भूमिका बजावली. काही ठिकाणी प्रकल्प ना-नफा तत्वावर व देणग्या मिळवून करण्यात आले. सर्व प्रकल्पात नदीचे पाणी स्वच्छ व पोहण्यायोग्य करणे हा महत्वाचा हेतू होता. 

 

उदाहरणादाखल काही प्रकल्प: 

 • LA River Revitalization Project, Los Angeles 

 • Anacostia Waterfront Project, Washington DC

 • Flood-absorbing wetland project, Davenport, Iowa 

 • Charles River Natural Valley Storage, Boston

 • Great River Greening, Mississippi River, Twin Cities

 

१९ व्या शतकात सुरु झालेले, त्याकाळी ओहायो आणि मिसिसिपी नद्यांचे व्यवस्थापन करणारे,  U.S. Army Corps of Engineers, अजूनही नदीकाठ पुनर्विकास प्रकल्पांमध्ये भाग घेते, पण त्यांची मार्गदर्शक तत्वे आता परिसंस्था संरक्षण व पुनरुज्जीवनावर भर देतात. (संदर्भ: River Basins and Coastal Systems Planning Within the U.S. Army Corps of Engineers – https://www.nap.edu/download/10970)

 

भारतीय नद्यांचा गेल्या काही दशकातला इतिहास या परिप्रेक्ष्यातून आता बघू या. अमेरिकेच्या मानाने भारतात जलवाहतूक मर्यादित राहिली. पण आपली वेगाने वाढलेली लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरणाची भरारी यामुळे शहरांतून जाणाऱ्या नद्यांवर ताण आला. त्यांच्या पात्रात रस्ते व इमारती उभ्या राहिल्या. अमेरिकेप्रमाणेच आपणही शहरांचे सांडपाणी नदीत सोडून दिले. नद्यांना काँक्रीटचे काठ बांधणे, नद्यांचे सरळीकरण, खोलीकरण, नदीपात्रात संरक्षक भिंती बांधणे हे सर्व आपण अगदी तसेच करत आलो. 

नद्या आकुंचित केल्या गेल्या, त्यांच्यावर अनेक धरणे बांधली गेली, त्या प्रदूषित झाल्या, हे सर्वज्ञात आहे. त्यांचे इथून पुढे काय करायचे हा खरा प्रश्न आहे. 

 

यावरची प्रतिक्रिया ही शेवटी तुम्ही कुठली मूल्ये महत्वाची मानता यावर अवलंबून आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे त्यांचे ‘सुशोभीकरण’  व या सुशोभीकरणातून काही आर्थिक विकास झाल्यास ते चांगलेच, ही एक मर्यादित, कालबाह्य मूल्यव्यवस्था आहे. या मूल्यव्यवस्थेस अनुसरून असलेल्या प्रकल्पात नदीचे सरळीकरण, नदीकाठावर काँक्रीटचे लांबलचक फलाट, व्यापारी आस्थापना आणि इतर बांधकाम दिसून येतात. 

 

पर्यावरणाचे जागतिक धडे असे सांगतात की या वळणावर आपण आपली मूल्यव्यवस्था व्यापक करायला हवी. त्यात शाश्वत विकासाला व नैसर्गिक परिसंस्थांना प्राधान्यक्रम द्यायला हवा. नदीचे जिवंत असणे, तिच्या परिसंस्थेचे व floodplain चे संरक्षण, प्रदूषण कमी करणे, नागरिकांचे निसर्गशिक्षण व आरोग्य, त्यांच्या पर्यावरणस्नेही वर्तनास प्रोत्साहन हे प्रकल्पाच्या केंद्रस्थानी हवे. निसर्गातील फेरफार व त्यातून आर्थिक वाढ यांचा प्राधान्यक्रम कमी करायला हवा. जमिनीचा ‘नैसर्गिक’ असलेला इंच न इंच वाचवायला हवा. 

पर्यावरणीय आत्मपरीक्षणाचा बिंदू आला आहे हे समजून घेऊन स्थानिक सरकारांनी दीर्घ पल्ल्याचे नियोजन करायला हवे. तसे झाले नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी आपण नैसर्गिक असे काही ठेवून जाऊ का याचीच शंका वाटते. लोकप्रतिनिधींची, प्रशासनाची, व नागरिकांची आत्ताची पिढी ही निसर्गाचा ऱ्हास कमी करण्याऐवजी तो अजून वाढविणारी ठरते. 

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची मूल्यव्यवस्था व्यापक, शाश्वत करणे सोपे नाही. लॊकशाहीतील राजसत्त्ता व प्रशासन हे शेवटी समाजाचेच एक प्रतिबिंब आहे त्यामुळे समाजाचीच मूल्यव्यवस्था व्यापक व शाश्वत करणे भाग पडते. 

bottom of page