top of page
नदीच्या संदर्भात निसर्गकेन्द्री जीवनशैली

(c) योगेश पाठक 

नदीच्या संदर्भात निसर्गकेन्द्री जीवनशैली म्हणून आफ्रिकेतील केनियातल्या ‘पोकोट’ लोकांचे उदाहरण देता येईल. वर्षाचा काही काळ ते आपल्या शेळ्या व गायीबैल घेऊन हिंडत असतात तर काही काळ ते ‘मोरुनी’ नदीच्या किनाऱ्याजवळ ‘मरीच पास’ या जागी राहतात. त्यांच्या गवतापासून बनवलेल्या गोलाकार झोपड्या नदीपासून काही अंतरावर असतात.  नदीच्या वाहत्या पाण्याचा ते धुण्यासाठी, पिण्यासाठी, व अन्न शिजवण्यासाठी वापर करतात. काही अन्नधान्ये लाकडी पात्रांमध्ये घेऊन नदीच्या धारेत काही वेळ धरतात. ती पाण्यामुळे मऊ झाली की खाण्यास योग्य होतात. नदीतील मासे व काठावरचे पक्षी यांचीही पोटापुरती  शिकार केली जाते.

मरीच पास जवळ नदी उथळ होते व तिचे पात्र विस्तीर्ण असते. नदीकाठावर भरपूर वाळू असते व मधे पाण्याचे प्रवाह असतात. गुरे धुण्यासाठी ही जागा योग्य असते.

 

पोकोट लोकांनी नदी एक प्रवाह व परिसंस्था म्हणून मूळ स्वरुपात टिकवली आहे. आपण नदीवर अवलंबून आहोत याची त्यांना जाणीव आहे. असे निसर्गस्नेही समाज भारतातही आहेतच.

मोरुनी नदी व पोकोट लोक यांचे फोटो इथे पहा: http://habarifromkenya.blogspot.in/2008/11/blog-post.html

पुण्यातील प्रदूषित मुळा-मुठा नदी आणि तिच्या परिसरात  राहणारे  पुणेकर हे वरील प्रकारच्या शाश्वत सहजीवनापासून अनेक योजने दूर आहेत.  This Fissured Land या माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा लिखित पुस्तकात निसर्ग-माणूस संबंधांचे जे वर्गीकरण दिले आहे (अन्नसंकलक/शिकारी, पशुपालक, शेतकरी, औदयोगिक मानव) त्यानुसार पुण्याची बहुतांश लोकसंख्या औद्योगिक मानवांची आहे.

प्रश्न हा आहे की, औद्योगिक मानव असल्यामुळे आपण आणि निसर्ग यात जे अंतर पडले आहे ते आपल्याला अजून वाढवायचे आहे की कमी करायचे आहे. शहरातील, विशेषतः नदीजवळील काँक्रीटीकरण आपण अजून वाढवत नेले तर हे अंतर अजून वाढेल हे निश्चित. नदीकाठ नैसर्गिक अवस्थेत ठेवले तर आपल्या पुढच्या पिढयांसाठी हे अंतर कदाचित अजून कमी होऊ शकेल.

 

संदर्भ: Rivers – Shelagh Whiting​

bottom of page