top of page
‘नदी’ या विषयावर शाळेतील मुलांसाठी काही वर्षांपूर्वी  (२०१३-१४)  केलेले एक छोटे टिपण

(c) योगेश पाठक 

आधीच्या एका वर्गात आपण पाहिले की वेगवेगळी नैसर्गिक साधने (ज्यांना माणूस “कच्चा माल” म्हणून वापरतो) ती प्रत्यक्षात निसर्गाची “finished products” आहेत. त्यांच्यामध्ये निसर्गाची लाखो वर्षाची मेहनत, कल्पकता, व कौशल्य दिसून येते. नदी हेही निसर्गाचे असेच एक विलक्षण finished product.

पृथ्वीवर असलेल्या पाण्यापैकी ९७% खारे समुद्री पाणी आहे आणि फक्त ३% गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्यापैकी ७०% पृथ्वीच्या ध्रुवांवर बर्फाच्या स्वरुपात आहे तर उरलेले ३०% जमिनीवर उपलब्ध आहे (तलाव, नद्या, विहिरी, महासरोवरे, पाणथळी, इ). सर्व गोडे पाणी मुळात पावसाद्वारे येते व त्याला ‘जलचक्र’ म्हणतात हे आपण शिकलो आहोत. पावसाद्वारे पृथ्वीवर पडण्याऱ्या पाण्यापैकी ७०% समुद्री क्षेत्रावर पडते तर ३०% भूक्षेत्रावर पडते. हे पृष्ठभागावर पडलेले पाणी मुख्यत्वे नदीच्या स्वरुपात पुढे जाते.

 

पावसाचे डोंगरावर पडलेले पाणी छोट्या ओहोळांच्या (freshlets) स्वरुपात खाली वाहते. अनेक ओहोळांचा मिळून एक नाला (brook) बनतो. अनेक नाले मिळून एक ओढा (stream) तयार होतो. असे काही ओढे मिळून नदी सुरु होते. नदीच्या आजूबाजूला छोट्या/मोठ्या वनस्पती, शेवाळ, व झाडे असतात. या वनस्पतींपासून मिळणारी सेंद्रीय द्रव्ये, पालापाचोळा, फुले/फळे/परागकण हे सर्व नदीबरोबर सदैव वाहत असते. नदी तिच्या वाह्ण्याच्या वेगामुळे आपल्या पात्रात असेलेले खडक/खनिजे/माती/दगडगोटे यांची झीज करत असते व त्यांचे बारीक कणही बरोबर वाहून नेत असते. सुरुवातीला उतार जास्त असतो त्यामुळे प्रवाह वेगवान असतो व पृष्ठभागाची झीज जास्त होत असते. पुढे प्रवाह संथ होत जातो व पृष्ठभागाची झीज हळूहळू मंदावत जाते.

 

या गोष्टी तसेच मृत सजीव, सूक्ष्मजीव, इ. मिळून तयार होतो नदीबरोबर वाहणारा गाळ (sediment). या गाळात सजीवांसाठी व शेतजमिनीसाठी उपयुक्त अशी पोषकद्रव्ये (nutrients) असतात. जशीजशी नदी पुढे जाते तसा हा गाळ तिच्या काठांवर साचत जातो. म्हणजेच, नदीच्या सुरुवातीला तिच्या प्रवाहात पोषकद्रव्ये जास्त असतात व पुढे ती कमी होत जातात. या पोषक द्रव्यांवर अवलंबून असलेले अनेक सजीव नदीत व तिच्या काठावर वास्तव्य करून असतात. 

आता तुम्हाला सांगता येईल का:

• नदीच्या काठासभोवतालच्या प्रदेशात शेती का केली जाते?

• नदी ही एक ‘परिसंस्था’ का आहे?

• मासे प्रजननाच्या काळात प्रवाहाविरुद्ध का पोहतात?

• नदीच्या उगमाच्या भागातील जंगल कापले गेले तर  प्रवाहातील पोषकद्रव्ये कमी होतील का? त्याचे परिणाम काय होतील?

 

नदीच्या प्रवाहात नैसर्गिक अडथळेही येतात. उदा. धबधबे (waterfalls), भोवरे (eddies), डोहांची निर्मिती (pools), उथळ पण वेगवान प्रवाहाचे भाग (riffles), नदीचे साचलेले पाणी (backwater) इ. या प्रत्येक प्रकाराची वैशिष्ट्ये व महत्व आहे. उदा.

• येथे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वेगळे असू शकते, त्यामुळे रासायनिकदृष्ट्या पाणी वेगळ्या प्रकारच्या जीवांना आधार देऊ शकते.

• येथे पाणी पुढे जाताना वेगवेगळ्या प्रकारे गाळले जाऊ शकते. यामुळेही येथील स्थानिक परिसंस्था व जीविधता वेगळी असू शकते.

 

आता भूगोलाच्या पुस्तकांमध्ये नेहमी दिसणारे नदीचे चित्र बघू या.

river1_edited.jpg

सपाट प्रदेशात जेव्हा नदी येते तेव्हा तिचा प्रवाह वळणा-वळणाचा (meander) असतो व तो भरपूर गाळ जमा करत जातो. या गाळाच्या जास्त प्रमाणामुळेच वळणेही  तयार होऊ शकतात व प्रवाह बदलू शकतो. अशा  सपाट प्रदेशात नदीच्या पुराचे जास्तीचे पाणी विस्तीर्ण प्रदेशात पसरू शकते व तिच्या गाळाचा फायदाही शेतीसाठी जास्त होऊ शकतो. यामुळेच अशा प्रदेशात शेती मोठ्या प्रमाणावर झाली.

शेवटी नदी समुद्राला मिळते तेव्हा खाडी किंवा त्रिभुज प्रदेशाच्या रुपात मिळते. या दोन्ही ठिकाणीही विशिष्ट प्रकारची परिसंस्था व जीविधता असते.

प्रत्येक नदीच्या प्रवाहाची व पुराचीही ऋतुनुसार एक लय असते. नैसर्गिकदृष्ट्या पुरामध्ये काहीच चुकीचे किंवा अघटीत नाही. जास्त पाऊस पडल्यावर नदीची पातळी वाढणारच. नदीच्या जवळ माणूस नेहमी दाट लोकवस्ती करून राहिला आहे त्यामुळे पूर हे एक ‘संकट’ मानले गेले आहे. म्हणजेच हे संकट मानवनिर्मित आहे.

 

आता यावर विचार करा:

• प्राचीन शहरी संस्कृती नदीकाठच्या सपाट प्रदेशात का सुरु झाल्या?त्यांची काही उदाहरणे व त्या नद्या आठवतात का?

• पुराचे संकट कमी करण्यासाठी निसर्गपूरक व कायमचे उपाय काय असू शकतात?

 

नदीच्या या लयीमुळे तिच्यातील जीवसृष्टीचीही वर्षानुवर्षे एक लय तयार झालेली असते. तिच्या काठांवर समृद्ध वनस्पती व प्राणी जीवन तयार झालेले असते. हे जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये पूर्वीपासून समजलेले आहे. भारतात नद्यांना देवता मानले गेले.

 

आधुनिक ‘विकासा’मुळे (उदा. शहरीकरण, मोठी धरणे) ही नैसर्गिक श्रीमंती कशी नाश पावली/पावते आहे ते बघू या.

 

1. नदीचा प्रवाहच आपण धरण बांधून थांबवतो. धरणामुळे नदीच्या प्रवाही परिसंस्थेत बदल होतो. साचलेल्या पाण्याची ती एक स्थिर, तळ्यासारखी परिसंस्था होते. नदीतील जीवांसाठी हा एक मोठा बदल असतो. निसर्गाचे एक विलक्षण “finished product” माणूस आपल्या फायद्यासाठी पूर्णपणे बदलतो.

 

2. धरणाच्या जलाशयाची खोली १०० ते २०० मीटर एवढी मोठी असू शकते. एवढ्या खोलीवर सूर्यप्रकाश व ऑक्सिजन जास्त पोचू शकत नाही. त्यामुळे हे ‘मृत पाणी’ होऊन त्यातील जीवन नष्ट पावते. माशांना येथे पुरेसे अन्न नसते. मासे नसल्यामुळे मासेमारीही करता येत नाही.

 

3. धरणात साठवलेल्या पाण्याचा एकूण लोकसंखेच्या खूप छोट्या भागास फायदा मिळतो: शहरी नागरिक, उद्योग, व शेती. पण सर्व शेतजमिनीला फायदा होईल असे धरण बांधताच येत नाही, त्यामुळे बरीचशी शेती पाण्याविनाच राहते. उदा. धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी कालवे काढलेले असतात. पण त्यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होते व काही पाणी जमिनीत मुरते.

 

4. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खेडी धरणाच्या मोठ्या जलाशयात बुडून जातात त्यामुळे तेथील लोकांना आपली जमीन व गाव सोडून इतरत्र जावे लागते (आपल्याला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून त्यांना ‘विस्थापित’ व्हावे लागते!). पाणलोट क्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या लोकांना बरेचदा धरणाच्या जलाशयातून पाणी घेण्यासही परवानगी नसते!

 

5. धरणातून मोठ्या पाईपलाईन काढून शहरांना व उद्योगांना पाणी पुरविले जाते. पाणी शहरात आल्यावर गुंतागुंतीच्या पाणी पुरवठा यंत्रणेद्वारे ते सर्वांना पुरविले जाते. या संपूर्ण यंत्रणेत अनेक गळत्या असतात व ते पाणी वायाच जाते.

 

6. धरणाचे पाणी आपल्या घरापर्यंत एवढ्या लांब आणण्यास पंप लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा (वीज) खर्च होते. 

 

7. शहरातील आपले सांडपाणी थोडीफार प्रक्रिया करून परत नदीत सोडले जाते. नदीत स्वतःचा नैसर्गिक प्रवाह शुद्ध करण्याची क्षमता असते पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरील मानवी सांडपाणी नदी कधीच शुद्ध करू शकत नाही व ते तसेच पुढे वाहत जाते. यामुळे नदीतील मूळची नैसर्गिक जीविधता मोठ्या प्रमाणावर नाश पावते. प्रवाहात पुढे जी शहरे येतात त्यांना आधीच्या शहराचे सांडपाणी असलेले पाणीच प्यावे लागते (उदा: पुण्यानंतर सोलापूर).

 

8. सपाट प्रदेशात मोठी धरणे राजकीय कारण किंवा शहराची गरज म्हणून बांधली जातात (उदा. उजनी किंवा जायकवाडी). परंतु अशा धरणाचा जलाशय खूप विस्तीर्ण होतो व धरण अनेक वर्षे पूर्ण भरतच नाही. तसेच साचलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते.

9.  नदीचे नैसर्गिक कार्य गाळ वाहून नेण्याचे असल्याने धरणात गाळ साचत राहतो व त्याची साठवण क्षमताही हळूहळू कमी होत जाते.

 

10. फक्त धरणाचे पाणी विपुल प्रमाणात आहे, म्हणून नगदी पिकांची शेती केली जाते (तेथील जमीन व हवामान दुसऱ्या पिकांसाठी अनुकूल असेल तरीही). 

 

यावर चर्चा  करा:

  • धरणाचे पाणी २४ तास मिळत असल्याने आपल्याला आजूबाजूला जे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहेत (उदा. पावसाचे पाणी, विहिरी) ते वापरायची सवयच गेली आहे का?

  • धरणाचे पाणी २४ तास मिळत असल्याने पाण्याचा अपव्यय करण्याची आपली प्रवृत्ती वाढते का? (उदा. गाडी धुण्यासाठी रोज पाणी वापरणे, रोज फरशी पुसणे, इ.)

  • शहराला धरणाचे पाणी मिळत असले तरी ते सर्वाना सारख्या स्वरुपात मिळते का? सर्वाना आपल्या प्राथमिक गरजा भागवता येतात का? दुसरीकडून पाणी भरून ते घरी वाहून नेण्याची पाळी अनेकांवर अजूनही का आहे?

वरील समस्यांवर उपाय आहेत, पण त्यासाठी सर्वांनाच आपली विचार पद्धती बदलावी लागेल. उदा.

1. सर्व नद्यांच्या उगमस्थानांजवळचे जंगल टिकविले पाहिजे, संरक्षित केले पाहिजे, तरच नदीचा पुढचा प्रवाह समृद्ध राहील.

 

2. नदीतील व नदीच्या काठाची परिसंस्था व जीवसृष्टी पूर्णपणे संरक्षित केली पाहिजे. तेथील मानवी वावर (उदा. कारखाने, दाट वस्ती) हे इतरत्र हलविले पाहिजेत.

 

3. ‘नदीचा प्रवाह स्वच्छ व समृद्ध आहे का’ हे त्यात कुठले  वनस्पती, प्राणी, व कीटक आहेत हे पाहून ठरविता येते. (अर्थात प्रत्येक नदीतील जीव थोडेफार वेगवेगळे असतील). असे वनस्पती, प्राणी, व कीटक नदीत आहेत का, याचे कायम निरीक्षण व्हावे.

 

4. नदीचे सर्व पाणी मानवासाठी आहे हा विचार बदलला पाहिजे. त्यातील काही भाग  नैसर्गिक प्रक्रिया, परिसंस्था, इतर सजीव यासाठी आवश्यक आहे.

 

5. सखल प्रदेशातील शेतीही नदीच्या अगदी जवळ न करता नदीच्या आजूबाजूची जीविधता संरक्षित केली पाहिजे.

 

6. नदीचे धोरण तो एक वाहता प्रवाह आहे व तसाच राहील या अनुषंगाने ठरवावे. मोठी धरणे कमी करावी. छोटे बंधारे व तळी यांच्या साखळ्या बांधून लोकांना व शेतीला पाणी द्यावे. स्थानिक जलस्त्रोत (उदा. विहिरी, तलाव) यांना प्रोत्साहन द्यावे व त्यांचे प्रत्येक पावसाळ्यात नीट पुनर्भरण होईल याची काळजी घ्यावी.

 

7. मानवी सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही यासाठी वेगवेगळे उपाय योजावेत.

 

8. बांधकामासाठी नदीचा प्रवाह थांबवणे/बदलणे, नदीपात्रात बांधकाम करणे, नदीच्या अस्तित्वासच धोका पोचेल एवढी वाळू खणून काढणे, हे सर्व निसर्गाविरुद्ध गंभीर गुन्हे म्हणून समजले गेले पाहिजेत.

 

9. पाण्याची समान वाटणी, शुद्ध पाणी, सर्वाना प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पुरेसे पाणी (पण वाया घालविण्यासाठी किंवा विकासाच्या चुकीच्या कल्पनांसाठी नाही) यानुसार पाण्याचा पुरवठा व्हावा.

 

10. आपल्या देशात नदीचे पाणी वापरायच्या अनेक जुन्या निसर्गपूरक परंपरा आहेत. उदा. खानदेशातील ‘फड’ पद्धत. या परंपरांचा सर्वांकडून अभ्यास व्हावा व योग्य तसे पुनरुज्जीवन व्हावे.

संदर्भ:

Ecological Society: Course in Natural Resource Management and Sustainability मधील व्याख्याने – प्रा. प्रकाश गोळे, प्रा. स्वाती गोळे

‘पर्यायी जलनीती’ हे पुस्तक व २०१३ च्या वसुंधरा महोत्सवातील व्याख्यान –  प्रा. प्रकाश गोळे

‘नदी’ या विषयावरील लेख – श्री. अभिजीत घोरपडे

bottom of page