top of page
शिक्षणपद्धतींबद्दल

(c) योगेश पाठक

On Educational Frameworks (17 Dec 2017) या इंग्लिशमधील लेखाचा मराठी अनुवाद 

 

इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार मांडण्याआधी आपण शिक्षणपद्धतींची एकूण संकल्पनाच मुळाशी जाऊन पाहू या. 

 

मला वाटतं की शिक्षणपद्धती खालील दोन प्रकारे जन्माला येतात:

 

१. समाजाची एखादी गरज किंवा सामाजिक समस्या किंवा तत्कालीन समाज-अर्थ व्यवस्था यामुळे व्यक्तींना एका विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे क्रमप्राप्त होते. ही गरज पूर्ण करण्यासाठी एका प्रकारची शिक्षणपद्धती आणि व्यवस्था उदयास येते. या प्रकारच्या शिक्षणपद्धतीस आपण व्यवस्थाकेंद्री शिक्षणपद्धत म्हणू या. 

 

या प्रकारच्या शिक्षणपद्धतीत व्यक्ती ही समाज-अर्थ व्यवस्थेचे नियम, रचना, व रूढी पाळायला शिकते, त्याप्रमाणे कौशल्ये व ज्ञान प्राप्त करते. समाज-अर्थ व्यवस्थेस आव्हान देणारी तत्वे ही अशा शिक्षणपद्धतीत सहसा अंतर्भूत नसतात. नवीन विचार व उद्यमशीलता येथे काही प्रमाणात भरास येते, पण ती समाज-अर्थ व्यवस्थेने आखून दिलेल्या चौकटीतच. 

 

२.  एखादा/एखादी विचारवंत वा शिक्षणतज्ज्ञ काही खोल चिंतन करते, प्रयोग करते. ती शिक्षणसंदर्भात काही मूलभूत प्रश्न विचारते: माणूस असणे म्हणजे नक्की काय? समाधानी/आनंदी आयुष्य म्हणजे नक्की काय? व्यक्तिविकास म्हणजे काय?  शिक्षण आणि जगणे याचे ‘खरे/शुद्ध’ नाते काय असावे? शिक्षणाची सेंद्रिय प्रक्रिया कशी असावी? एक स्वस्थ, समाधानी मानव होण्यासाठी कुठला शैक्षणिक अनुभव मुलास मिळावा? इत्यादी. 

या विचारप्रक्रियेवर आधारित ते विचारवंत एक नवीन, प्रायोगिक  शिक्षणपद्धती आखतात. याचे प्रात्यक्षिक म्हणून ते एखादी नवीन शाळा काढतात व तिथे ती शिक्षणपद्धती अमलात आणतात. या प्रकारच्या शिक्षणपद्धतीस आपण मानवकेंद्री शिक्षणपद्धत म्हणू या. 

 

व्यवस्थाकेंद्री शिक्षणपद्धतींची काही उदाहरणे:  

 • औद्योगिक क्रांतीनंतर अनेक देशात पाठांतरास व स्पर्धेस खतपाणी घालणाऱ्या वर्तनवादी शिक्षणपद्धती उदयास आल्या. या शिक्षण प्रक्रियेतून अनेक प्रकारचे ‘तज्ज्ञ’ नवीन समाज-अर्थव्यवस्थेस विनासायास मिळाले. उदा: इंजिनिअर, डॉक्टर, लेखापाल, शास्त्रज्ञ, वकील, कंपनीतील व्यवस्थापक, इत्यादी. 

 • त्याबरोबरच श्रमाचे औद्योगिक काम करणारे कामगार पुरविणारी अजून एक शिक्षणपद्धती उभी राहिली, ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण म्हणतो. यांचा रोजगार वर उल्लेखलेल्या तज्ञांपेक्षा कमी असतो, पण ग्राहकप्रधान, बाजारी अर्थव्यवस्थेला त्यांची तेवढीच गरज आहे. उदा. सुतार, प्लम्बर, इलेकट्रिशिअन, माळी, कारखान्यातील टर्नर/फिटर आदी कामगार.  

 • सद्यस्थितीतील अमेरिकेचे उदाहरण घ्या. विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातील आपल्या देशाचा अव्वल क्रमांक कायम ठेवण्यासाठी तिथे STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षणास प्रचंड प्रोत्साहन दिले जात आहे. ही प्रक्रिया तत्वत: शीतयुद्धकालीन सोव्हीएट रशिया किंवा १९९० नंतरचा चीन यांपेक्षा वेगळी नाही. 

 • भारत ब्रिटिशांची वसाहत होण्यापूर्वीच्या काळात भारतीय खेड्यांमध्येही व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाई: कधी गुरु-शिष्य परंपरेने आश्रमांत, कधी देवस्थानांतर्फे चालविल्या जाण्याऱ्या शाळांमध्ये, तर कधी जाती-पोटजातींचे व्यवसाय पुढे नेण्यास लागणारे शिक्षण घरीच मिळत असे. हे शिक्षण ‘औदयोगिक’ नव्हतं, तरी ते एक विशिष्ट व्यवस्था-रूढीच पुढे नेणारं  होतं, विचारांची क्षितिजे रुंदावणारे नव्हे, हे आपण लक्षात घेऊ या. 

 

मानवकेंद्री शिक्षणपद्धतींची काही उदाहरणे: 

 • मॉंटेसरी शिक्षणपद्धत 

 • वॉलडॉर्फ शिक्षणपद्धत 

 • कृष्णमूर्ती शाळा 

 • रचनावादावर आधारित शिक्षण देणारी विद्यालये 

 • Unschooling, म्हणजे शाळेत न जाता घरी / समाजातूनच थेट शिकण्याची पद्धत व चळवळ 

 

कधीकधी अशी एखादी शिक्षणपद्धत बघायला मिळते, जी मानवकेंद्री तर असतेच, पण मानवाच्या आणि समाजाच्या मूलभूत गरजांचा विचार करत एखादी पर्यायी समाज-अर्थ व्यवस्थाही सुचवत असते. गांधींची ‘बुनियादी शिक्षा’ हे याचे उदाहरण आहे. इथे माणसाचा भौतिक-अध्यात्मिक विकास हा श्रमप्रतिष्ठा, संयम, सदाचरण, स्थानिक अर्थव्यवस्थेस उपयोगी असा रोजगार मिळवणे, आदी मूल्यांशी जोडला आहे. प्रचलित व्यवस्थेस आव्हान दिलेले आहे. 

 

पूर्वसूरींनी विकसित केलेल्या, उच्चतम मूल्यांवर आधारलेल्या, प्रयोगांनी यशस्वी करून दाखविलेल्या या शिक्षणपद्धती पाहिल्यावर असा विचार येतो की, इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार वेगळा असा काय असणार आहे? 

 इथे हे सांगायला हवं की इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार हा, आजच्या घडीला जगापुढे जी गुंतागुंतीची आव्हाने निर्माण झाली आहेत, निसर्गाचे आणि ‘माणूसपणा’चे जे खच्चीकरण झाले आहे, त्याबद्दलच्या पोटतिडकीतूनच जन्माला आला आहे, म्हणून तो सांगणं गरजेचं वाटतं. 

 • आपली आजची जीवनशैली व अर्थव्यवस्था निसर्गाचे प्रचंड वेगाने शोषण करत आहे. निसर्गाला या संपदेचे पुनर्भरण करायला जेवढा वेळ लागतो, त्यापॆक्षा शोषणचा हा वेग कितीतरी अधिक आहे. ही बाब आपल्या व्यवस्थेच्या अजून पुरेशी लक्षातच आलेली नाही. 

 • आपल्या आजच्या व्यवस्थेत आर्थिक असमानता हे कायमस्वरूपी दुखणे होऊन बसले आहे. जेवढी मूठभर देशांची/वर्गांची/व्यक्तींची प्रगती वा भरभराट होत असते त्यापॆक्षा कितीतरी पटीने अधिक लोक दारिद्र्य व संधींची असमानता यांचा सामना करत असतात. आपल्या व्यवस्थेने ही विषमता नाईलाजाने स्वीकारली आहे असेही जाणवते. 

 • अनिर्बंध मानवी ‘प्रगती’मुळे आपल्या सामायिक मालकीची निसर्गसंपदा, मग ती गाव पातळीवरील गायराने असोत, की राष्ट्रीय पातळीवरील नद्या किंवा वने, किंवा जागतिक पातळीवरील हवामान किंवा समुद्र, ही सर्व प्रदूषित किंवा विनाश पावत चालली आहेत. स्थानिक, राष्ट्रीय, व जागतिक अशा सर्व पातळ्यांवरील जैवविविधता धोक्यात आली आहे, नैसर्गिक परिसंस्था कोसळत आहेत. हवा, जल, अन्न, व मृदा प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे ते वेगळॆच. 

 • हा विनाश थांबवायचा असेल तर वरील वास्तव समजून घेणारी, त्याला भिडून प्रयत्न करणारी माणसे हवीत. हे तेव्हाच जमेल, जेव्हा आपण पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टिकोन सार्वत्रिक शिक्षणप्रक्रियेत आणू शकू. 

 • आज जे पर्यावरण शिक्षण शाळा-महाविद्यालयांतून दिले जाते ते विज्ञान, भूगोल अशा काही विषयात तुकड्या-तुकड्यांच्या स्वरूपात आहे. उपभोगप्रधान व्यवस्था बदलण्याची आणि पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची या शिक्षणात पुरेशी क्षमता नाही. स्थळ-कालपरत्वे बदलत गेलेले निसर्ग-माणूस संबंध, निसर्ग-विज्ञानाचा संपूर्ण परीघ, याचा अभ्यास आजच्या शिक्षणात नाही. पारिस्थितिकी आणि अर्थशास्त्र यांच्या आंतरछेदावर मिळणारे महत्वाचे धडे या शिक्षणात नाहीत.  

 • शिक्षणाचे वेगाने जागतिकीकरण होत आहे, मग ती  शिक्षणाची भाषा असो, किंवा अभ्यासक्रम किंवा शिक्षणप्रक्रिया. शिक्षण जणू मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थेचे गुलाम झाले आहे. स्थानिक परिसंस्था, स्थानिक निसर्गसंपदा व हवामान, स्थानिक जमीनवापरातील बदल, स्थानिक जैवविविधता, स्थानिक निसर्ग-माणूस संबंध यावर शिक्षणप्रक्रियेत दिला जाणारा वेळ कमी-कमी होतो आहे. याचा परिपाक म्हणजे आपली पुढची पिढी स्थानिक निसर्गापासून तोडली जात आहे, निसर्गाकडे कोरडेपणे पाहत आहे. 

 • जवळपास सर्व शिक्षणपद्धतींच्या शाळा, मग त्या व्यवस्थाकेंद्री असोत की मानवकेंद्री, बहुतांश शिक्षित मनुष्यबळ औद्योगिक, उपभोगप्रधान अर्थव्यवस्थेलाच पुरवितात. निसर्ग आणि माणूस यांचे शाश्वत सहजीवन कसे असेल, त्यासाठी मनुष्यबळ कसे तयार करायचे याची चर्चा प्रचलित शैक्षणिक वर्तुळात नाहीच.  

 • पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांकडून पर्यावरण शिक्षणासंबंधी अनेक छोटे कौतुकास्पद उपक्रम केले गेले आहेत. सरकारी मदतीने यातील काही प्रकल्प कायमस्वरूपी होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. पण पर्यावरणीय ऱ्हासाचा एकंदर आवाका पाहता हे प्रकल्प म्हणजे निव्वळ सुरुवात आहे. यातील बरचसे उपक्रम कृती-संच, शिक्षकांचे ट्रेनिंग या स्वरूपाचे आहेत. हे महत्वाचे निश्चित आहे पण पुरेसे नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टिकोन हा शाळाचालक व शिक्षक यांच्या विचारात उतरणे जरूर आहे. पर्यावरणीय ऱ्हासाची व्याप्ती व वेग, आणि तो थांबविण्यासाठी आवश्यक असलेला मूलगामी, सर्वसमावेशक बदल हा जर शाळाचालक-शिक्षक यांना नीट समजला, तर पर्यावरण शिक्षणाचे उत्तरदायित्व ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतील. दुसरे म्हणजे खऱ्या पर्यावरणीय शिक्षणात आवश्यक असलेला पालकांचा सहभाग हा अजून कुणीच गंभीरपणे घेतलेला नाही. तिसरे, आत्तापर्यंत उपलब्ध असलेले अभ्यासक्रम व कृती-संच हे पर्यावरणीय संकल्पना, रोजगार, आणि आवश्यक असलेले आर्थिक-प्रशासकीय-सामाजिक  बदल यांची नीट जोडणी करत नाहीत. हे सर्व झाले तरच शाश्वत सहजीवन प्रत्यक्षात येऊ शकते. 

 

इकोयुनिव्हमध्ये आमचा उद्देश व प्रयत्न असा आहे, की वरील त्रुटींचा नीट विचार करून एक सर्वसमावेशक शिक्षणविचार मांडला जावा. 

bottom of page