सिंगालीला राष्ट्रीय उद्यान : लाल पांडाचे संवर्धन व समस्या
आदित्य पाठक
(पूर्वप्रसिद्धी: Newsletter of Ecological Society, Pune, June 2022)
८ ते १० मे, २०२२ हे तीन दिवस मी माझ्या वडिलांसोबत पूर्व हिमालयातील सिंगालीला राष्ट्रीय उद्यानात घालविले. हे अभयारण्य म्हणजे मुख्यतः बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील जंगल असून त्याचा काही भाग सिक्कीम व नेपाळमध्येही आहे. याची उंची २४०० ते ३६०० मी. आहे. इथले जंगल मुख्यतः रुंदपर्णी व मिश्र प्रकारात मोडते.
पक्ष्यांची भरपूर विविधता असली तरी या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे लाल पांडा. हा एक दुर्मिळ, संकटग्रस्त, व लाजराबुजरा प्राणी असल्याने त्याचे दर्शन क्वचितच घडते. मात्र आमच्या सुदैवाने आम्हाला दोन वेळा हा प्राणी बघता आला. या वनातील पांडा संवर्धन व आव्हानांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. या लेखातील सर्व माहिती केवळ प्रवासात विविध लोकांशी संवाद करून मिळविली आहे व त्यावर आधारित स्वमत मी येथे मांडत आहे.
लाल पांडाबद्दल: Ailuridae कुळातील हा एक ५० ते ६० cm लांबीचा सस्तन प्राणी आहे. तो नेपाळ, भारत, भूतान, चीन, व ब्रह्मदेशातील जंगलात आढळतो. तो चीनमधील कृष्णधवल पांडाशी संबंधित नसून racoon, skunk यांचा नातेवाईक आहे. तो मिश्राहारी प्राणी आहे. फळे, बांबूची पाने, सरडे, व किडे हे त्याचे खाद्य आहे. सूचीपर्णी व रुंदपर्णी हिमालयीन वने हा त्याचा अधिवास आहे.
समस्या:
असा हा लाल पांडा IUCN च्या Endangered प्राण्यांच्या यादीत का आहे? त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत:
१. तस्करी व शिकार:
गेली अनेक दशके लाल पांडांची मोठ्या प्रमाणात शिकार व चीनमध्ये तस्करी झालेली आहे. चीनमध्ये एक असे राजघराणेही होते जे पांडाच्या कातडीच्या टोप्या घालत असे. काहीजण लग्नात असे कपडे/टोप्या घालून मिरवत असत. तसेच काही स्थानिक लोकसमूह पांडाचे मांस खातात. पूर्वी एका स्थानिक कुटुंबाने पांडा पाळलासुद्धा होता. एके काळी पांडा ५०० ते ७०० रु. दराने विकला जायचा असे समजले. आता तस्कर ५ लाख रु. देतात. बेकार तरुणांसाठी अशा किमती हे मोठे प्रलोभन ठरते.
लाल पांडाची शिकार करणे तेवढे कठीण नाही, हे अजून एक कारण. तो फारसा चपळ नाही. स्वसंरक्षणासाठी त्याच्याकडे नख्या सोडून काहीच हत्यार नाही. त्याच्या केसांमुळे तो झाडाच्या फांद्यावरील शेवाळ्यात (मॉस मध्ये) लपून राहू शकतो, ही एकच जमेची बाजू आहे.
२. निर्वनीकरण व अधिवास नष्ट होणे:
ब्रिटिशांच्या काळापासून भारतात मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे पांडांचा अधिवास वेगाने नष्ट होत आहे. सिंगालीलाच्या नेपाळमधील भागात विशेष निर्बंध नाहीत त्यामुळे तेथे वनजमीनीवर बांधकाम होऊ शकते. आम्ही तिथे असतानाही दुरून बुलडोझरचे आवाज येत होते.
भारत आणि इतर देशांमध्येही संरक्षित वनांबाहेर मोठ्या प्रमाणात वनप्रदेश आहे, जिथे पांडांची संख्या आहे. त्या भागात जंगलतोड होत जाते तसे पांडा लहानश्या जंगलाच्या तुकड्यात अडकून बसतात. असे कित्येक पांडा कुत्री किंवा मार्टेनच्या तावडीत सापडतात. लाल पांडा ही एक प्रदेशनिष्ठ प्रजात असून अधिवास कमी होणे ही त्यांच्यासाठी एक महत्वाची समस्या आहे.
संवर्धनाचे प्रयत्न व त्यातील समस्या:
पांडाच्या संवर्धनासाठी अनेक संस्थांकडून प्रयत्न चालू आहेत. नुकतेच दोन captivity मध्ये वाढलेल्या पांडांना दार्जिलिंग प्राणिसंग्रहालयामार्फत यशस्वीरीत्या सिंगालीलात परत सोडण्यात आले. रेडिओ कॉलरमार्फत या पांडांना ट्रॅक केले जात आहे. 'रेड पांडा नेटवर्क' ही संस्था सर्वंकष उपायांवर काम करत आहे. काही वेळा पांडा प्राणिसंग्रहालयांना देण्यात येतात, जेणेकरून त्यांची संख्या जंगलाबाहेर सुरक्षित राहील. मात्र पांडाच्या सवयींमुळे प्रत्यक्ष जंगलात त्याच्यावर नजर ठेवणॆ खूप अवघड आहे. ते मुख्यतः निशाचर असतात व दिवसा आराम करतात. वाघांच्या शरीरांवरील पट्ट्यांमुळे ते वेगवेगळे ओळखता येतात तश्या सोप्या खुणा पांडांमध्ये नाहीत (ओळखायच्या खुणा -- उदा. चेहऱ्यावरील पांढरे पट्टे, शेपटीवरील वर्तुळे -- यावर संशोधन चालू आहे).
दीर्घकालीन उपाय:
लाल पांडाचे संवर्धन अनेक मार्गाने करता येईल व लवकरच प्रयत्न केल्यास हा प्राणी निश्चितपणे वाचवला जाऊ शकेल. त्यासाठी मला महत्वाचे वाटणारे काही उपाय पुढीलप्रमाणे:
१. पर्यटनास चालना (समतोल व मर्यादा राखून): सध्या सिंगालीलाच्या भारतीय भागात पर्यटक जाऊ शकत नाहीत. आम्ही मुख्यत्वे सीमारेषेवरील रस्त्यावर व नेपाळच्या हद्दीतील काही भागात फिरलो. अतिरेकी पर्यटनामुळे अधिवासांवर वेगळा ताण येऊ शकतो हे खरे, पण मर्यादित स्वरूपातील पर्यटनास हरकत नसावी. ठराविक वाटांवर व मार्गदर्शकासोबतच पर्यटकांना जाऊ दिल्यास त्यांना हे जंगल व पांडाबद्दल माहिती मिळेल व आत्मीयता वाटेल. स्थानिकांसाठी रोजगार निर्माण होईल व मिळालेल्या पैशातून संरक्षणासाठी आणखी प्रयत्न करता येतील.
२. स्थानिक लोकांचा सहभाग: कोणत्याही प्राण्याच्या संरक्षणासाठी त्या प्राण्याच्या अधिवासाजवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांची भूमिका सर्वात महत्वाची असते. सिंगालीलाजवळ राहणारे लोक बहुतांश नेपाळी भाषिक आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत पांडाचे महत्व समजावून द्यायला हवे. या दुर्गम भागात जास्त शाळा नसल्याने लहान मुले शिक्षणासाठी शहरात जातात.शाळांमध्ये पांडाविषयक कार्यशाळा घेतल्या तर मुलांवर लहान वयातच निसर्ग रक्षणाचे संस्कार होतील. बेरोजगारी ही या भागातील मोठी समस्या आहे. कित्येक तरुण नोकरीसाठी शहरांमध्ये येतात. त्यांना इथेच वनरक्षण, पर्यटन, किंवा निसर्गशिक्षक म्हणून नोकऱ्या मिळायला हव्यात. शिकारीचे आमिष सोडून पांडाच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी येथील तरुणांना प्रवृत्त केले पाहिजे.
३. लाल पांडा कॉरिडॉर संरक्षण: पांडाचा अधिवास संरक्षित नसलेल्या वनातही आहे. सिंगालीला आणि त्याच्याजवळचे कांचेनजुंगा राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये ३० कि.मी. चे अंतर आहे. हा मधला भाग संरक्षित नसला तरी तिथेही पांडांची काही संख्या असणारच. त्यामुळे या भागातील वनीकरण व जनजागृती हेही महत्वाचे आहे.
अशा विविध उपायांमार्फत आपण लाल पांडा या सुंदर प्राण्याला निश्चितच वाचवू शकू.
अर्थात, सिंगालीला राष्ट्रीय उद्यानातील विशाल अन्नसाखळीमधील पांडा हा केवळ एक दुवा आहे. त्याशिवाय मार्टेन, पिका, बिबट्या, क्लाऊडेड बिबट्या, अस्वल, जंगली मांजरीच्या अनेक प्रजाती,असे अनेक प्राणी व पक्षी इथे आहेत. अस्वलाच्या पावलाचे ताजे ठसे आणि बिबट्याची विष्ठा आम्हाला दिसली. वनस्पतींच्या विविधतेबद्दल तर बोलायलाच नको - ऱ्होडोडेन्ड्रॉन, मॅग्नोलिया, बांबू, ओक, पाईन, मेपल, विविध नेचे व आमरी (orchids) येथे आढळतात. 'चित्रे' गावात एका बौद्ध मठाजवळ फिरताना आम्हाला हिमालयन सॅलॅमँडर ही भारतातील एकमेव सॅलॅमँडरची प्रजातीही दिसली. एकूणच, 'सिंगालीला राष्ट्रीय उद्यान' हा पूर्व हिमालयातील वैविध्यपूर्ण वनप्रदेश असून भविष्यात तो संरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.