top of page
पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टिकोन

(c) योगेश पाठक 

एकोयुनिव्ह बालवाडीपासून ते विद्यापीठ शिक्षणासाठी एक सर्वसमावेशक पर्यावरण शिक्षणविचार मांडण्याच्या प्रयत्नात आहे.

याची पूर्वतयारी म्हणून या विचारसरणीचा पाया – पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टिकोन – या लेखात दिला आहे. हाच दृष्टिकोन २०१४ मधील आमच्या एका लेखात सविस्तरपणे मांडला आहे. या दृष्टिकोनाची मूळ मांडणी प्रकाश गोळे यांनी आपल्या “What can be the holistic point of view?” या निबंधात केली होती.

काय आहे हा दृष्टिकोन?

 • निसर्गाचे गुंतागुंतीचे, चक्रिय, व नाजूक स्वरूप समजून घेणे

 • निसर्गात ऊर्जा व द्रव्य यांचा प्रवास कसा होतो ते समजून घेणे

 • सामान्य नागरिकांना ‘ऊर्जासाक्षर’ व ‘द्रव्यसाक्षर’ करणे. निसर्गातील प्रणाली व व्यवस्था समजून घेणे

 • नैसर्गिक परिसंस्थांचे खरे मूल्य समजून घेणे. त्यांच्या मानवास मिळणाऱ्या सेवा या परिसंस्थांची रचना/कार्य/प्रवाह/समृद्धी यांना धक्का न लावता संयमाने वापरणे

 • माणसाच्या सद्य व्यवस्थेतील कृतींचा व ‘आत्तापुरता फायदा’ पाहण्याच्या प्रवृत्तीचा निसर्गावर होणारा परिणाम समजून घेणे: शेती, उद्योग, घरबांधणी, रस्ते, प्रदूषण, इ.

 • आपण ज्याला ‘विकास’ म्हणतो, त्या एकंदर व्यवस्थेमुळे नैसर्गिक संसाधनांची क्षिति ज्या वेगाने होत आहे, तो वेग निसर्गाच्या पुनर्भरण करायच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे, हे समजून घेणे

 • पर्यावरणीय नीतीमत्ता समजून घेणे

 • शाश्वत सह-अस्तित्व (‘विकास’ नव्हे) समजून घेणे

 • सद्यकालीन विकासामध्ये अर्थशास्त्र या शाखेचे काय योगदान राहिले आहे व त्यामुळे काय नुकसान झाले आहे ते समजून घेणे

 • माणूस निसर्गाचा एक भाग आहे व निसर्ग-रक्षण अर्थशास्त्राआधी आले पाहिजे हे समजून घेणे

 • निसर्गातील विविधता (ऐतिहासिक व वर्तमानकालीन) संपूर्णतया समजून घेणे

 • निसर्गातील विविधता आणि मानवी जीवनशैलीतील व संस्कृतींमधील विविधता यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते समजून घेणे

 • ज्यांनी परंपरेने निसर्ग-रक्षण केले आहे (उदा. आदिवासी समाज) ते कसे केले आहे ते समजून घेणे

 • शाश्वत सह-अस्तित्वासाठी एक नवीन समाज व अर्थ व्यवस्था उभी करता येईल का याचा शोध घेणे. यात जमीनीचा वापर, नैसर्गिक संसाधनांचा वापर, स्थानिक कच्चा माल स्थानिक उद्योगांत वापरणे, नैसर्गिक परिसंस्थाना संरक्षण, परिसंस्थांचे पुनरुज्जीवन हे सर्व अभिप्रेत आहे. याचे उदाहरण म्हणून आपल्या अन्न-व्यवस्थेकडे बघू या. आपली आजची कृषि व अन्न व्यवस्था नक्की किती जमीन, पाणी, व इतर नैसर्गिक साधने वापरते, कुठले पीक व किती घ्यायचे याचे निर्णय कसे केले जातात, हे समजून घ्यावे लागेल. अन्नातील जैवविविधता निसर्गावर नवीन ताण न आणता वाढविता येईल का? मृदेचे वेगाने होत चाललेले क्षरण कसे थांबविता येईल? या व अशा इतर प्रश्नाची उत्तर वैज्ञानिक पाया व प्रयोगशीलता यातून मिळवावी लागतील.

bottom of page