top of page
पर्यावरण शिक्षण : आमुलाग्र बदलाची गरज  

योगेश पाठक

(ग्राममंगल ‘शिक्षणवेध’ च्या जुलै २०१४ अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचे टिपण)

या लेखात पर्यावरण शिक्षण हे पर्यावरणाकडे बघण्याच्या एका सर्वंकष दृष्टीकोनातून कसे असावे याची चर्चा केली आहे. प्रकाश गोळे यांच्या “What can be the holistic point of view?” या निबंधात विस्ताराने मांडलेला हा दृष्टीकोन नक्की काय आहे यापासून सुरुवात करू.

पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टीकोन नैसर्गिक परिसंस्थांना व प्रक्रियांना केंद्रस्थानी ठेवतो,  ज्ञानाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांना स्पर्श करतो, आणि आपली जीवनशैली नैसर्गिक संसाधनांच्या मर्यादांच्या आत असावी असे आवाहन करतो.  याचे मुख्य पैलू प्रथम पाहू या:

१. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार द्रव्य व ऊर्जा नेहमी जास्त विस्कळीत होऊ पहात असतात, विखुरली जात असतात (उदा. बर्फाचे पाणी होणे). पृथ्वीवर जी भूरचना निर्माण झाली व उत्क्रांतीमुळे जी जीवसृष्टी विकसित पावली त्यामुळे द्रव्य व ऊर्जा यांची अनेक रूपे एकमेकांशी बांधली गेली व विस्कळीत होण्याचा वेग कमी झाला. पण हा बदल कोट्यवधी वर्षांत हळूहळू झाला. उदा. सेंद्रीय द्रव्यांच्या साखळ्या एकत्र येऊन एखादा जीव निर्माण होतो व आयुष्यभर वाढतो तसे अजून द्रव्य, अजून ऊर्जा तेथे बांधली जात असते. मात्र मानव जेव्हा निसर्गात हस्तक्षेप करतो (उदा. झाड तोडणे, जमीन खणताना मातीचा मौल्यवान थर विस्कटणे), तेव्हा वर्षानुवर्षे बंधित होत गेलेली  द्रव्य व ऊर्जा काही मिनिटातच विस्कळीत होण्यास सुरुवात होते. निसर्गाचा ‘सुघटन’ करायचा वेग हा आपल्या ‘विघटन’ करायच्या वेगापेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की हा सगळा हस्तक्षेप आपल्याच अस्तित्वाला धोका पोहचवणार आहे.

 

२. आता भूगोलाकडे वळू. आपल्या पृथ्वीवरील भौगोलिक प्रक्रीया काय सांगतात? खडकांचे क्षरण होऊन माती तयार होणे, आणि माती साचणे व तिचे थर/ वेगळे खडक तयार होणे या दोन्ही प्रक्रिया धीम्या गतीने पण अव्याहतपणे येथे चालू आहेत. त्यांचाही एक समतोल आहेच. हा समतोल जीवसृष्टीला अदृश्यपणे आधार देत असतो. जेव्हा मानव खडक किंवा डोंगर फोडून सपाटीकरण करतो, तेव्हा हा समतोल ढळतो, याकडे सर्वंकष दृष्टीकोन आपले लक्ष वेधतो. जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे पाणी, म्हणजेच नद्या हाही या चक्राचा एक महत्वाचा भाग. जेव्हा आपण मोठी धरणे बांधतो तेव्हा नदीचे एक परिसंस्था म्हणून कार्यच थांबते. गाळ वाहून नेण्यासारख्या  तिच्या अनेक नैसर्गिक कार्यात  आपण बाधा आणतो. तिची भौतिक स्थिती तसेच जैविक चक्रही आपण बदलतो. भौगोलिक स्वरूप न बदलता तिचा व तिच्यातला जैविक – अजैविक घटकांचा व नैसर्गिक सेवांचा लाभ घेतला तर तो चिरंतन व शाश्वत ठरेल.

 

३. रसायनशास्त्राच्या अभ्यासकाला पृथ्वीवर मोठेच नाट्य दिसेल. जीवसृष्टीची पहाट होत असताना इथल्या सूक्ष्म वनस्पतींनी सूर्यकिरण व जीवनद्रव्ये यांच्या संयोगाने अन्ननिर्मिती करण्यास सुरुवात केली. या प्रकाशसंश्लेषणासाठी त्यांनी वापरले हरितद्रव्य – कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, व मॅग्नेशियम यांचे एक संयुग. या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडला जातो – जो माणसाचा आणि इतर सर्व प्राण्यांचा जीवनाधार आहे. जमिनीवरील व पाण्यातील वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि इतर सर्व जीवनास जगवितात (त्यात माणूसही आलाच). वातावरणातील ओझोनचा थर अतिनील किरणांपासून सर्व जीवसृष्टीचे रक्षण करतो.  सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की हे “नैसर्गिक रसायनशास्त्र” अबाधितपणे चालू राहिले  पाहिजे. झाडे कमी करणे, जंगल/पाणथळ आदि परिसंस्था उध्वस्त होऊ देणे, व वातावरणात घातक रसायने सोडून त्यास बाधा आणणे हे शहाणपणाचे नाही.

 

४. जीवशास्त्र सांगते की पृथ्वीचे वय जरी ४५० कोटी वर्षे असले, तरी पुढे जी प्रचंड जैवविविधता निर्माण झाली तिची सुरुवात झाली साधारण ५४ कोटी वर्षांपूर्वी. आजपूर्वी ४४ कोटी ते ६.५ कोटी वर्षे या काळात पृथ्वीवर नैसर्गिक कारणांमुळे पाच वेळा बहुतांश जीवसृष्टी लोप पावली व पुन्हा निर्माण झाली. आज मात्र मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेचा एवढ्या झपाट्याने ऱ्हास होत आहे की शास्त्रज्ञांना जीवसृष्टी सहाव्यांदा लोप पावेल की काय असे वाटते आहे. हे भान सामान्य नागरिकांना नाही. डायनोसॉर आकाराने मोठे व सर्वात बलवान होते तरी ते पृथ्वीवरून नाश पावले. आज आपल्या विकसित मेंदूमुळे माणूस पृथ्वीवरचा सर्वात बलवान प्राणी झाला आहे. तोही नाश पावणार नाही कशावरून? सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की मानवाचे एक “जीव जाती” म्हणून रक्षण करणे मानवाच्याच हातात आहे. मानवनिर्मित अर्थव्यवस्थेपेक्षा निसर्ग मोठा आहे. परिसंस्था व जैवविविधता यांचे रक्षण आर्थिक विकासापेक्षा जास्त महत्वाचे आहे. आपल्या स्वार्थासाठीच आपण जैवविविधता टिकविली पाहिजे.

उत्क्रांतीच्या चक्रात आपल्याला उलटा प्रवास करता येत नाही. लांडग्यापासून कुत्रा उत्क्रांत झाला. लांडगा नामशेष झाला तर आपण कुत्र्यापासून लांडगा परत जन्माला घालू शकत नाही. म्हणून सर्वच प्रजाती वाचविणे महत्वाचे आहे. दुसरे उदाहरण म्हणजे केळे ही उष्ण कटिबंधातील, भारतातील वनस्पती. पण दक्षिण भारतातील जंगले कमी होत असल्याने केळ्याच्या अनेक रानटी प्रजातींचा ऱ्हास होत आहे.  आपण नेहमी खात असलेल्या केळ्याची जरी मोठ्या प्रमाणात लागवड होत असली तरी या रानटी प्रजातींच्या जनुकांना वाचविणे हेदेखील महत्वाचे आहे.

 

५. पृथ्वीच्या विषुववृत्तापासून धृवांकडे जाताना जे वेगवेगळे भौगोलिक प्रदेश दिसतात त्यांचा शालेय भूगोलात ढोबळमानाने अभ्यास होतो (उदा. पर्जन्यवने, पानगळीची वने, गवताळ प्रदेश, वाळवंटे, तैगा, टुंड्रा, इ.). परंतु या पट्ट्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पर्जन्यमान, उन्हाळा व हिवाळा या ऋतूंचा काळ, स्थानिक डोंगर, पठारे व इतर भूरूपे असतात. मातीही वेगवेगळी असते. यामुळे वेगवेगळे स्थानिक हवामान (micro climate), वैशिष्ट्यपूर्ण अधिवास व स्थानिक जैवविविधता निर्माण होत असते आणि याचा परिणाम अन्नसंस्कृतीमधेही दिसतो. उदा. आजऱ्याचे तांदूळ, डहाणूचे चिकू, सासवडची सीताफळे. या सर्व विविधतेचा अभ्यास व त्यांचे निसर्गाच्या व मानवाच्या दृष्टीने महत्व या गोष्टींचा विचार व्हायला हवा असे सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो.

 

६.  मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात की मानव जेव्हा अतिशय साध्या अन्नसंकलक (hunting-gathering) अवस्थेत होता तेव्हा तो खूप आनंदी असणार. पृथ्वीवरील लोकसंख्या एवढी कमी होती की प्रत्येक मानवास सरासरी २६ चौ.कि.मी. क्षेत्रावरील नैसर्गिक अन्न उपलब्ध होते. भूक आणि रोगराई जवळपास नव्हतीच. समूहात राहून सहकार्य करण्यास महत्व होते. कृत्रिम सामाजिक बंधने व नियम तेव्हा नव्हते त्यामुळे लोभ, मत्सर, स्पर्धा, भांडणे यांचे प्रमाण अल्प. अशा अवस्थेत अनेक आदिवासी समाज अजूनही जगत आहेत. सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की निसर्गाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या या समाजांकडून आपण शिकले पाहिजे. पण संपत्ती, तंत्रज्ञान, शहरीकरण यांना देव्हाऱ्यात बसविणारी आधुनिक समाजव्यवस्था मात्र त्यांना मागास मानते. विकास म्हणजे आर्थिक विकास हे गणित सोडून विकास म्हणजे आनंदी, आरोग्यसंपन्न जीवन असे तत्व आपण स्वीकारायला हवे.

 

७. अर्थशास्त्रात आपण वाचतो की पैशाचा शोध लागायच्या आधी व्यवहारात वस्तूंची देवघेव (barter) होत असे. आपल्या दृष्टीने देवघेवीला फक्त ऐतिहासिक महत्वच उरले आहे. पण प्रत्यक्षात मात्र काही आदिवासी व ग्रामीण समाज अजूनही देवघेव पद्धत वापरतात. सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की स्थानिक उत्पादन झालेल्या वस्तूंचा स्थानिक प्रदेशातच उपभोग होणार असेल तर देवघेव ही आदर्श व्यवहारपद्धती आहे. रोजच्या गरजा भागवण्यासाठी तर निश्चितच स्थानिक संसाधने वापरावीत. स्थानिक जैवविविधता वापरून बनविलेले अन्न, कलाकुसरीच्या वस्तू यांना देवघेवीमुळे उत्तेजन मिळेल. उदा. नेहमीचा गहू/तांदूळ कमी करून स्थानिक धान्ये, भाज्या यांचा वापर वाढविणे. आजच्या अर्थव्यवस्थेत संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. अर्थव्यवहार विकेंद्रित झाले तर संपत्तीही विकेंद्रित होईल. त्यामुळे पैशाचे महत्व थोडे कमी करून देवघेवीचा विचार व्हावा.

८. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी शेती हवी, पण शेतीकडे तटस्थ  दृष्टीक्षेप टाकल्यास काय दिसते? शेती म्हणजे जमिनीच्या विशिष्ट तुकडयावरील सर्व नैसर्गिक विविधता हटवून फक्त एकाच प्रकारच्या वनस्पतींची लागवड  तेथे करणे. म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेतील हस्तक्षेपच. आणि अलीकडे तर शेती ही अन्न पुरवण्यासाठी नव्हे तर आर्थिक फायद्यासाठी केली जाते. त्यातून निर्यात वाढते पण देशातल्या गरिबांना मात्र अन्नाची वानवाच राहते. इतिहास सांगतो की  जशीजशी माणसाने जास्त जमीन शेतीखाली आणली तशी जैवविविधता कमी होत गेली. म्हणून सर्वंकष दृष्टीकोन म्हणतो की जरी आपल्याला अन्ननिर्मितीसाठी शेती हवी आहे तरी शेती कुठे, कशाची, व कशी करावी याबाबत आपण तारतम्य बाळगावे. उदा. जिथे वर्षभर चांगले पर्जन्यमान आहे किंवा किमान पाण्याची शाश्वती आहे, जिथे मृदेचा थर खोल आहे, पाण्याचा चांगला निचरा होतो, जिथे जमिनीचा कस नैसर्गिक प्रक्रियांनी भरून येणे शक्य आहे, जिथले हवामान कीड लागण्यास नैसर्गिकरीत्या प्रतिबंध करेल, असे प्रदेश शेतीसाठी योग्य आहेत. असा प्रदेश समशीतोष्ण व काही  प्रमाणात उष्ण कटिबंधातील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मुख्यत्वे आढळतो. दक्षिण भारत, पश्चिम आशिया अशा कोरड्या प्रदेशात  जरी प्राचीन काळापासून शेती झाली, तरी इथे पाऊस नेहमीच बेभरवशाचा असतो, सुपीक मृदेचा थर पातळ असतो, आणि उष्णतेमुळे पाण्याचे सारखे बाष्पीभवन होत असते. या ठिकाणी अशा पिकांची शेती हवी की ती कमी पाऊस व साधारण जमीन यातही तग धरेल व तिला वेगळा पाणीपुरवठा लागणार नाही. २०१३ सालच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात पिकणाऱ्या ऊसामुळे जी साखर मिळते तिच्या प्रत्येक किलोग्रॅम साठी २०६८ लिटर पाणी खर्च झालेले असते, उत्तर प्रदेशात हेच प्रमाण १०४४ लिटर आहे. ऊसासारख्या खूप पाणी लागणाऱ्या पिकांची महाराष्ट्रातील कोरड्या प्रदेशात शेती होऊ नये. पिकांची विविधता वाढायला हवी. विस्मृतीत गेलेली स्थानिक वाणे पुनरुज्जीवीत व्हायला हवीत व आपल्या अन्नात यायला हवीत.

जमिनीचा कमी होणारा कस, रासायनिक खते-कीटकनाशके यांचा मारा, शेतमालास योग्य भाव न मिळणे, अनियमित हवामान व त्यामुळे होणारा कहर, महागडे बियाणे, या सर्वांशी झुंजताना आजचा शेतकरी थकला आहे. शेती पेट्रोल/विद्युत यासारख्या ऊर्जेवर कधी नव्हे एवढी अवलंबून राहते आहे त्यामुळे शेती करणे अजूनच महाग झाले आहे. अनुदाने, कर्जमाफी, शेतमालाच्या दरातील सरकारी हस्तक्षेप या उपायांचा उपयोग फक्त मलमपट्टीसारखाच होत आहे. आता खरी गरज आहे ती मुलभूत उपायांची: उदा. शेतीच्या व्यवस्थापनाचे गाव पातळीवर निसर्गकेंद्री नियोजन, विकेंद्रीकरण, शेतीतील जैवविविधता वाढविणे, जमिनीची धूप थांबविणे, सेंद्रिय शेती करून जमिनीचा कस वाढविणे, कायम प्रयोगशील राहणे. 

 

९. सर्वंकष दृष्टीकोन हेही सांगतो की शेती, उद्योगधंदे, व शहरी पाणीपुरवठा यासाठी मोठी धरणे, कालवे, पाईपलाईन यांची जी प्रचंड यंत्रणा उभी केली जाते ती निसर्गाशी समरस नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा व बांधकाम लागते, नदी-ओढे-नाले-ओहोळ या परिसंस्थांची हानी होते, व मोठ्या प्रमाणात पाणी वायाही जाते. प्रत्येक नदी-ओढा-नाला-ओहोळ यांच्याकडे एक परिसंस्था म्हणून बघितले जावे. त्यांचे विकेंद्रित व्यवस्थापन व्हावे. धरणांची पाणलोट व लाभ क्षेत्रे यांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापन व्हावे. नवीन मोठी धरणे बांधण्यास मज्जाव व्हावा. शेतीस शेततळी, विहीर, छोट्या बंधारांच्या साखळ्या, पारंपरिक जलयोजना याद्वारे पाणीपुरवठा व्हावा.

१०. शेवटी आजचे तंत्रज्ञान, त्यावर आधारित आधुनिक समाज व अर्थव्यवस्था याकडे वळू. विकसित देशांचे आता पूर्ण औद्योगिकीकरण झाले आहे तर विकसनशील देश त्याच दिशेने धावत आहेत. औद्योगिकीकरण अवलंबून असते नवनव्या यंत्रांवर. यंत्राचे मुलभूत स्वरूप म्हणजे द्रव्य व ऊर्जा यांचे रुपांतर करणे. मानवी/पशूबळावर जी यंत्रे चालतात ती सोडल्यास इतर सर्व यंत्रे नैसर्गिक उर्जांचे (मुख्यत्वे कोळसा व खनिज तेल, तसेच जलविद्युत, पवन, सौर, इ.) फक्त माणसाच्या फायद्यासाठी रुपांतर करतात. भौतिकशास्त्र सांगते की कुठल्याही रुपांतरणात काही ऊर्जा वाया जाते. ती उष्णतेच्या स्वरुपात सोडली जाते व तिचा परत काहीही उपयोग करता येत नाही. तसेच थोडे द्रव्यही प्रत्येक रुपांतरणात वाया जातेच. आपल्या दैनंदिन जीवनातले वेगवेगळे उपभोग किंवा सुविधा म्हणजे द्रव्य व ऊर्जेची अशी अनेकानेक रुपांतरणे.

वस्तू बनविणाऱ्या उत्पादकाला मात्र या प्रत्येक पायरीत वाया गेलेल्या उर्जेचे व द्रव्याचे सोयरसूतक नसते. रुपांतरणात वाया गेलेले द्रव्य बरेचदा प्रदूषणाच्या स्वरुपात आपल्याला दिसते. प्रदूषण कमी करण्यासाठी लागणारा खर्च हा उत्पादक वस्तूच्या किमतीद्वारे वसूल करू शकत नाही (नाहीतर सर्व वस्तूंच्या किमती लगेच वाढतील व अर्थव्यवस्था कोसळेल) म्हणून प्रदूषणाची किंमत समाज चुकती करतो. वस्तूंच्या किमती कमी राहाव्या म्हणून कच्चा मालही जगात जिथे सर्वात स्वस्त मिळेल तिथून ओरबाडला जातो (उदा. खनिजे). हे करताना परिसंस्था व जैवविविधता यांचा नाश कायमच सुरु असतो. तो कारखान्यापर्यंत नेण्यासाठी  परत वाहनांचा (म्हणजे ऊर्जेचा) वापर.

इतर देशांमधून स्वस्तात लुटलेले द्रव्य, ऊर्जा, व मनुष्यबळ यांच्या पायावरच विकसित देशांचे औद्योगिकीकरण उभे आहे. अमेरिकन माणसाचा सरासरी वीजवापर आहे १३,३९४ kWh तर भारतीय माणसाचा ६२५ kWh, पण आपणही हळूहळू त्या जीवनशैलीकडे प्रवास करत आहोत. द्रव्य व ऊर्जा यांचा विचार केल्यास माणसाच्या आधुनिक उपभोगांस ‘एक पृथ्वी’ पुरी न पडता ४-५ ‘पृथ्व्या’ लागतील अशी चिंता आता सर्वांना भेडसावत आहे. या ‘पृथ्व्या’आणायच्या कुठून?

यामुळे सर्वंकष दृष्टीकोन सांगतो की सर्वसामान्य माणसाला द्रव्य-ऊर्जा-साक्षर होणे आता फार आवश्यक झाले आहे. द्रव्य व ऊर्जा यांचा अतिवापर करणारी आपली जीवनशैली काबूत आणायची आता गरज आहे. प्रत्येक देशाचे पर्यावरण, मनुष्यबळ, स्थानिक जैवविविधता, हस्तकौशल्ये यावर आधारित, निसर्ग-केंद्री अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे. समाजात जे काही यंत्राधारीत उत्पादन होईल त्यात वाया गेलेल्या द्रव्य-उर्जेची, प्रदूषणाची संपूर्ण किंमत (व शारीरिक-मानसिक परिणामही) जनतेला समजले पाहिजेत.

अशा पर्यायी समाज-अर्थव्यवस्थेत नैसर्गिक स्त्रोतांचा अतिशय कमी व न्याय्य वापर आणि निसर्गकेंद्री नियोजन हे एक पायाभूत तत्व असेल (उदा. वातावरण, जलावरण, मृदावरण, वने, गवताळ व पाणथळ परिसंस्था, खनिजे, किनारी भाग, इ).  दुसरे तत्व म्हणजे विनाश होत चाललेल्या निसर्गाचे पुनरुज्जीवन. तिसरे म्हणजे लोकांना निसर्ग-समरस अर्थव्यवस्थेत उपयोगी पडेल असे ज्ञान व कौशल्य मिळविण्यास उद्युक्त करणे.  

यावरून हे अनुषंगानेच आले की आजच्या पर्यावरण शिक्षणात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. याची मुख्य कारणे:

  1. पर्यावरणाचे थोडेफार औपचारिक शिक्षण मिळालेली पिढी अजूनही शाळा-कॉलेजातच शिकते आहे. म्हणजे आधीच्या सर्व पिढ्यांना वरील सर्वंकष दृष्टीकोन तर सोडाच, पण पर्यावरणीय समस्या, निसर्ग-माणूस संबंध, शेती, अशा पायाभूत विषयांचे ज्ञानही फार जुजबी आहे. आपण मानव निसर्गाचाच एक भाग आहोत त्यामुळे पर्यावरणीय सजगता आपल्या जीवनात कायम असणे महत्वाचे आहे हे मुलभूत तत्व पारंपरिक शिक्षणात आलेच नाही.

  2. जागतिकीकरण हे संपत्ती निर्माण करण्यास प्राधान्य देत आहे. अनावश्यक औद्योगिकीकरण जगात पसरत आहे. यात पर्यावरण, जैवविविधता, व सांस्कृतिक विविधता (उदा. भाषा), यांचा बळी जातो आहे. यामुळे विविधता (सांस्कृतिक, भाषांची, अन्नाची, जीवांची, परिसंस्थांची) का महत्वाची आहे, ती कशी जपली पाहिजे, निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास काय आहे, स्थानिक परिसरातील निसर्ग का व कसा जपला पाहिजे, या गोष्टींची ओळख मुलांना पर्यावरण शिक्षणातून व्हावी.

  3. कॉलेजात शिकविला जाणारा ‘पर्यावरण विज्ञान’ हा एक ‘दुर्लक्षणीय’ विषय म्हणून त्याची विद्यार्थ्यात (व अध्यापकांतही) ख्याती आहे. तो शिकता-शिकविताना गंभीरता अभावानेच आढळते.

  4. शालेय अभ्यासक्रमात वेगवेगळ्या विषयात (उदा. विज्ञान, भूगोल) आता पर्यावरणीय विषयांची तुकडया-तुकड्याने ओळख आहे. परंतु उद्याचा पर्यावरण-सजग नागरिक घडविण्यासाठी निसर्ग-माणूस संबंधांचा संपूर्ण पट उलगडणे, निसर्ग-विज्ञानाची साकल्याने ओळख घडविणे (उदा. परिसंस्थाशास्त्र) या अपेक्षा अजूनही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

  5. थोड्याफार अभ्यास-सहली किंवा प्रकल्प सोडले तर शाळा-कॉलेजातील पर्यावरण शिक्षणात अनुभवाधारित किंवा रचनावादी दृष्टीकोन अभावानेच आढळतो.

  6. अध्यापक, शाळा/कॉलेजचे प्रशासन, व विद्यापीठे येथेही पर्यावरणीय समस्यांची गंभीरता, पर्यावरणाचा वरील सर्वंकष दृष्टीकोन किंवा पर्यायी समाज-अर्थव्यवस्थेची गरज, याबद्दल पुरेसे आकलन, विचारमंथन झालेले नाही. यासंबंधातील जागतिक चर्चा तसेच भारतीय विचारवंतांनी केलेली मांडणी हे सर्वसामान्य अध्यापकाला माहीत असायची शक्यता कमीच, किंवा माहिती असली तरी थेट जागतिक पातळीच्या हवामान बदल, तापमान वाढ, ओझोन थरातली गळती इ. समस्यांची आहे. स्थानिक पातळीवरील निसर्ग, जैवविविधता यांच्या समस्याही तितक्याच महत्वाच्या आहेत.

  7. एकंदरीत शिक्षणाची दिशा सध्याच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला लागणारे  मनुष्यबळ पुरविणे यावरच केंद्रित झाली आहे (उदा. माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, किंवा व्यवस्थापनाचे नवनवीन कोर्सेस)

यासाठी नवीन पर्यावरण शिक्षण वेगवेगळ्या अंगांनी कसे प्रवाही करता येईल ते आता पाहू या.

(अ) शालेय पर्यावरण शिक्षण

 

शालेय पर्यावरण शिक्षणाचे हेतू हे असावेत की: १. निसर्गाचे वेगवेगळे अनुभव मिळून मुलास निसर्गाबद्दल आयुष्यभर टिकणारे प्रेम निर्माण व्हावे. २. उद्याचा पर्यावरण-सजग नागरिक म्हणून मुलाच्या मनाची मशागत व्हावी.  ३. निसर्ग-समरस अर्थव्यवस्थेत मुलास एक व्यक्ती म्हणून जी वाटचाल करायची असेल त्यात उपयोगी पडणारी विज्ञान, माहिती, कौशल्ये अशी शिदोरी त्याला जमविता यावी.

 

शालेय पर्यावरण शिक्षण खालील सूत्रांनी गुंफले जावे: सौंदर्यानुभूती, निसर्ग-विज्ञान, आणि निसर्ग-माणूस संबंध.

 

१. सौंदर्यानुभूती: मूल जेव्हा एखादे चित्र काढते/पाहते, वाद्य वाजविते/ऐकते, तेव्हा त्याला सौंदर्याचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव मिळत असतो. निसर्गातील सौंदर्याचाही मुलास असाच अनुभव मिळणे आवश्यक आहे. तरच मुलाचे निसर्गाशी भावनिक नाते प्रस्थापित होईल.

 

हे तीन प्रकारे साधता येईल:

 

१.१ निसर्गात भटकणे व त्याचे सौंदर्य पंचेंद्रियांच्या आधारे मनात साठविणे. स्थानिक परिसरातील निसर्ग (उदा. टेकड्या, तळी, नद्या, वने, माळराने व तेथील प्राणी-पक्षी) हा मुलांना पालक, शाळेतील ताई-दादा, मोठी भावंडे यांच्याबरोबर पुन्हापुन्हा पाहता यावा. निसर्गातील रंग, आकार, स्पर्श, आवाज, प्रवाह, नैसर्गिक घटना, चक्रे यांची अनुभूती त्यांना यावी.

 

१.२ मनात साठविलेला निसर्ग शब्द, चित्र, भाषण, अभिनय, इ. मधून व्यक्त करता येणे. मुलांनी आपले अनुभव बोलावे, लिहावे. दिसलेल्या प्राणी-पक्षी-झाडांची चित्रे काढावी, निसर्गाबद्दल नाटुकली लिहून ती सादर करावीत.

 

१.३ इतरांनी व्यक्त केलेल्या, रेखिलेल्या निसर्गसौंदर्याचा रसास्वाद घेता येणे. उदा. प्रकाश गोळे, मारुती चितमपल्ली, किरण पुरंदरे अशा लेखकांचे निसर्गविषयक लेखन वाचणे, ऑडोबॉन सारख्या चित्रकाराने किंवा परिसरातील चित्रकारांनी काढलेली निसर्गचित्रे पाहणे इ.

 

पुढच्या इयत्तांमध्ये निसर्गाची एक कलाकार, अभियंता, गणितज्ञ, रचनाकार अशीही ओळख या अनुभवांतून होत जावी. उदा. गुणोत्तर, भूमिती, अशा संकल्पना शिकलेल्या मुलांना, Golden Ratio, Fractals या गोष्टी समजतील. प्राण्यांची किंवा मानवी शरीराची ओळख करून घेताना किंवा Biomimicry अभ्यासताना मुलांना हे समजून यावे की निसर्गात मर्यादित ऊर्जा व द्रव्य वापरून गुंतागुंतीच्या तरीही स्वनियंत्रित,  स्वचलित, सेंद्रीय, २४ तास काम करणाऱ्या रचना कशा आहेत. निसर्ग-रचनेच्या ज्या अनेकानेक भव्य, सुंदर, मिती आहेत त्यांचा मुलांना ठाव घेता यावा.

 

२. निसर्ग-विज्ञान: माझ्या मते आजच्या शालेय विज्ञान अभ्यासक्रमात खालील वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यांचे तौलनिक महत्व ठरविणे प्रथम आवश्यक आहे.

 

पहिला प्रवाह आहे विज्ञानातील मुलभूत संकल्पनांचा – उदा.

  • भौतिकशास्त्रातील बल, कार्य, ऊर्जा, इ.,

  • जीवशास्त्रातील वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, अवयव इ., 

  • रसायनशास्त्रातील द्रव्याचे गुणधर्म, भौतिक व रासायनिक बदल, अणूची रचना, आवर्तसारणी, इ.

 

हा प्रवाह विज्ञान शिक्षणातील सर्वात मोठा प्रवाह आहे आणि तो पारंपरिक पाश्च्यात्य “reductionist” पद्धतीने शिकविला जातो. या प्रवाहातील जीवशास्त्राचे धडे निसर्ग-विज्ञानाचा पाया रचण्यासाठी आवश्यक आहेत, पण पुरेसे नाहीत.

 

दुसरा प्रवाह आहे दैनंदिन आयुष्य व व्यवहार यातील विज्ञान. उदा. अन्न व त्याचे घटक, शेतीतील विज्ञान, स्वयंपाकघरातील विज्ञान, इ. यांचा आत्ता एक प्रवाह म्हणून साकल्याने विचारच होत नाही. तसा विचार व्हावा, आणि माणूस-निसर्ग संबंधातील विज्ञानास (उदा. अन्नातील जैवविविधता, वनौषधी, वनौपज) इथे योग्य ते महत्व दिले जावे.

 

तिसरा प्रवाह आहे औद्योगिकीकरण व आधुनिक जीवनशैली यांच्याशी निगडीत विज्ञानाचा. उदा. विद्युत ऊर्जा, वाहतूक, औद्योगिक उत्पादने (उदा. खनिजे, काच, प्लास्टिक) असे घटक आज शालेय विज्ञानात आहेत. हे शिकविणे आवश्यक आहे असे मानले तरी औद्योगिकीकरणाची काळी बाजू (नैसर्गिक संसाधनांवरील मर्यादा, प्रदूषण, मानवाचे अतोनात उपभोग) हीसुद्धा स्पष्टपणे मांडली गेली पाहिजे. औद्योगिकीकरण आत्ता चालू आहे तसेच पुढे चालविणे का धोक्याचे आहे, पर्याय काय आहेत, व यात विज्ञानाची काय भूमिका आहे, याची ओळख मुलांना व्हावी.

चौथा प्रवाह आहे वर उल्लेखिलेल्या सर्वंकष दृष्टीकोनासाठी आवश्यक अशा निसर्ग-विज्ञानाचा. हा भाग आजच्या शालेय शिक्षणात तुकड्यांच्या स्वरुपात व अपुरा आहे. निसर्ग-विज्ञान एकात्मिक स्वरुपात शिकता यावे व त्यात खालील गोष्टी यायला हव्यात.

 

२.१ पृथ्वीचा भौगोलिक व जैविक इतिहास, उत्क्रांती

२.२ पृथ्वीवरील द्रव्य व ऊर्जा यांची वेगवेगळी चक्रे. मृदावरण, जलावरण यांचा अभ्यास.

२.३ परिसंस्था, अन्नजाळे, जैवविविधता, अधिवास, भूचित्र (ecological landscape) या संकल्पना

२.४ परिसंस्थाशास्त्राची (ecology) सविस्तर ओळख. परिसंस्थांचे आरोग्य मोजण्याच्या पद्धती.

२.५ आपल्या देशातील महत्वाच्या परिसंस्थांची सविस्तर ओळख: वने व त्यांचे वेगवेगळे प्रकार, पाणथळ, गवताळ प्रदेश, वाळवंट, समुद्री परिसंस्था व किनारी परिसंस्था.

२.६ वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक भूरूपे, हवामान, व स्थानिक जैवविविधता असलेले प्रदेश (microclimates)

२.७ द्रव्य-ऊर्जा साक्षरता, भौतिकशास्त्राचे संबंधित नियम. विस्कळीतपणाची (entropy) संकल्पना. यंत्रे व त्यांचे मुलभूत स्वरूप. ऊर्जा रुपांतरण. रुपांतरणात वाया जाणारे द्रव्य व ऊर्जा.

२.८ प्रदूषण, ते मोजण्याच्या पद्धती व मापन.

२.९ Ecological footprint व carbon footprint. नैसर्गिक संसाधनांचा वापर व गुणवत्ता मोजण्याच्या पद्धती.

२.१० शेतीची पारंपरिक  वैज्ञानिक माहिती तसेच परिसंस्थाशास्त्राच्या दृष्टीकोनातून ओळख.

२.११ परिसंस्थांचे पुनरुज्जीवन: ओळख

२.१२ स्थानिक निसर्गाचा अभ्यास/व्यवस्थापन/पुनरुज्जीवन करताना वरील ज्ञान वापरण्याची क्षमता.

३. निसर्ग-माणूस संबंध

 

मानव अन्नसंकलक, पशुपालक, शेतकरी, औद्योगिकीकरण अशा वेगवेगळ्या अवस्थांमधून पुढे गेला. या प्रत्येक अवस्थेत त्याचे निसर्गाशी संबंध कसे राहिले, त्यामुळे समाजरचनेवर काय परिणाम झाला हा इतिहासाचा एक महत्वाचा पैलू, पण पारंपरिक  इतिहास शिक्षणात तो जवळपास नसतोच. अनेक प्राचीन समाजांनी निसर्गाच्या कुठल्यातरी साधनाचे अतिशोषण केले (उदा. मृदा, जलस्त्रोत, वृक्ष) व त्याचे पर्यवसान ती संस्कृतीच नामशेष होण्यात झाले. इतिहासातील हे धडे आपल्याला आजही महत्वाचे आहेत. इतिहासातील अनेक संघर्षही पारंपरिक राजकीय दृष्टीकोनाऐवजी नैसर्गिक साधनांच्या दृष्टीकोनातून बघता येतात व त्यांचा नवीन अर्थ आपल्याला कळून येतो.

 

याप्रमाणेच निसर्गस्नेही जीवनशैली असलेले अनेक समाज जगात पूर्वी होते आणि आजही आहेत. त्यांचा अभ्यास करताना त्यांचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन मुलांना समजून येईल. निसर्गाचे शोषण व दोहन यातील फरक त्यांना कळेल.

 

तंत्रज्ञान हा अजून एक पैलू. प्रथम तंत्रज्ञान साधे व निसर्ग-समरस होते. पण वेगवेगळे उर्जेचे स्त्रोत जसेजसे माणसाने आपल्या नियंत्रणाखाली आणले, नवीन वैज्ञानिक शोध लागत गेले, कच्चा माल उपलब्ध होत गेला, तशी तंत्रज्ञानाची गुंतागुंत व ऊर्जेची भूक वाढत गेली. पुढे तर जागतिक अर्थव्यवस्थेने विज्ञान व तंत्रज्ञान यांना पूर्णपणे वेठीसच धरले. आज सर्वसामान्य माणूस तंत्रज्ञानाचा दास होण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा अवाढव्य डोलारा मुलांना या संदर्भात समजला पाहिजे. पुढच्या पिढीला तंत्रज्ञानासंबंधी नीरक्षीरविवेक करता आला पाहिजे.

वरील व असे इतर पैलू (उदा. पर्यावरणीय अर्थशास्त्र, पर्यावरणीय न्याय) हे निसर्ग-माणूस संबंधांचा भाग आहेत. वर्तमानकाळातील स्थानिक व जागतिक पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी या विषयाचा पाया पक्का लागेल. मानववंशशास्त्र, पुराणवस्तूशास्त्र, इतिहास, भूगोल, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र या सर्वांना स्पर्श करणारा हा विषय मुळातच आंतरशाखीय आहे. त्यामुळे तो शिकताना वेगवेगळ्या शाखांमधील अध्यापक व शैक्षणिक साधने यांचा समन्वय लागेल.  

याबरोबरच शालेय पर्यावरण शिक्षणासंबंधी खालील गोष्टी अभिप्रेत आहेत:

  • या शिक्षणाचे नियोजन पहिलीपासून ते बारावीपर्यंत असावे व त्यात सुसूत्रता असावी. कुठल्याही इयत्तेत खंड पडू नये.

  • शिक्षणपद्धती प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्यास व अनुभवास प्राधान्य देणारी, स्वत:च शिकण्यास उद्युक्त करणारी, कृतीशील असावी.

  • निसर्गातील अनुभव, निसर्ग-विज्ञान, माणूस-निसर्ग संबंध, स्थानिक भूगोल/पर्यावरण/जैवविविधता, शेती, यांचा एक परस्परपूरक, आंतरशाखीय, स्थानिक स्वरूपाचा अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत वेगवेगळा तयार व्हावा. यासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक ठरते.

  • शहरी भागातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी असा भेद न राहता दोघांनाही एकमेकांकडून शिकता यावे. त्यांच्या कायम भेटी, सहली, आदानप्रदान व्हावे. यामुळे शहरी भागातील विद्यार्थी हा प्रादेशिक निसर्गाशी जोडला जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थांना शहरी पर्यावरणीय समस्या, जीवनशैलीतील धोका कळून येईल.

  • वरील विषयांमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचा बोजा अजून वाढू नये. निसर्ग-विज्ञानाचा काही अभ्यासक्रम आत्ताच्या विज्ञान व भूगोलात समाविष्ट करता येईल. निसर्ग-माणूस संबंधांचा काही अभ्यासक्रम आत्ताच्या इतिहास, भूगोल, विज्ञान, व भाषा यात समाविष्ट करता येईल.  विशेषत: ८ वी पासून पुढे, काही भाग अनिवार्य तर इतर भाग वैकल्पिक विषयांच्या आणि प्रकल्पांच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात यावा. खेळीमेळीच्या स्पर्धा, अभ्यास-सहली, प्रदर्शने, सर्वेक्षणे अशी इतर साधनेही यासाठी वापरता येतील.

 

असे पर्यावरण शिक्षण मुलांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. त्याची काही उदाहरणे: 

  • ऑयकॉस फॉर इकॉलोजीकल सर्विसिस या संस्थेतर्फे, वाईतल्या एका शाळेत इयत्ता ५ वी ते ९ वी करता या विषयाकरता एक वेगळा अभ्यासक्रम बनवण्यात आला व ‘ग्राममंगल’च्या मदतीने ४ वर्षे राबवण्यात देखील सहभाग देण्यात आला. यात निसर्गातील घटक, परिसर ओळख, नियोजन, जीवनशैली व निसर्ग यांचा संबंध, निसर्गपूरक जीवनशैली, हे मुख्य हेतू निश्चित करण्यात आले होते. पर्यावरणाची ११ प्रमुख अंगे घेऊन प्रत्येकात वेगवेगळ्या कृती, प्रकल्प, सहली याद्वारे अनुभविक शिक्षण देण्यात आले. ही अंगे म्हणजे: जमीन, पाणी, झाडी, प्राणी, ऊर्जा, हवा/हवामान, परिसंस्था/निसर्गचक्र, शेती, प्रदूषण, उद्योग, व वस्ती. कृतीचे एक उदाहरण म्हणजे ६ वी तील मुलांना ‘नदीची गोष्ट’ रचण्यास सांगण्यात आले. नदीच्या उगमापासून ते मुखापर्यंत होणाऱ्या प्रवासाचे फोटो दाखवून, नदीला भेट देऊन, तिच्या शास्त्रीय, सामाजिक, नैसर्गिक, राजकीय अशा अस्तित्वांबद्दल मुलांशी बोलणे केले. त्यांना स्वत:च्या निरीक्षणांवरून, स्वत:च्या भाषेत तिची गोष्ट लिहिण्यास सांगितले. याच संस्थेतर्फे गोव्यातल्या जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये ३ वर्षे असे पर्यावरण वर्ग घेण्यात आले तर राजस्थानातल्या रणथांबोर गावात मोगीया आदिवासींबरोबर कार्यशाळा चालू आहेत.

  • प. बंगालमधील बलीयाघाटी या गावात DRCSC या संस्थेने १२-१५ वर्षे वयाच्या मुलांना प्रत्यक्ष अनुभवातूनच परिसंस्था, नैसर्गिक साधने, शेती यांचे शिक्षण दिले, दारिद्र्य, दुष्काळ, आणि पूर यांनी गांजलेल्या या भागात ३० मुलांना भाजीपाला बियाण्याची पाकिटे देण्यात आली. मुलांनी स्वतःच कंपोस्ट खत तयार केले  व जमिनीचा कस वाढविला. ३-४ महिन्यात मुलांना या भाज्यांचे प्रत्येकी सरासरी १५० किलो पीक घेण्यात यश आले. या अवधीत मुलांनी शेतीच्या सविस्तर नोंदी ठेवल्या व त्यामागचे विज्ञान शिकून घेतले.

  • प्रस्तुत लेखकाने शहरी भागातील इयत्ता सातवीतील काही मुलांचा वर्षभर ‘पर्यावरण वर्ग’ घेतला. या वर्गात पृथ्वीचा/मानवाचा/शेतीचा इतिहास, महाराष्ट्रातील मुख्य परिसंस्था, पर्यावरणीय समस्या, त्यांचे मूळ, व उकल यांची प्राथमिक ओळख मुलांना झाली. कृती व प्रकल्प याद्वारे मुलांनी स्वत:ला आवडणाऱ्या विषयांवर काम केले. सर्व मुख्य संकल्पनांची टिपणे मुलांना दिली जेणेकरून पुढच्या इयत्तांमध्येही या विषयाचा अभ्यास ते सुरु ठेवू शकतात. 

(आ) महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण

शालेय शिक्षणाचा वरील किंवा तत्सम कार्यक्रम पद्धतशीरपणे, मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी १० वर्षे तरी लागतील. त्यामुळे  हे लक्षात घ्यावे लागेल की पुढची १० वर्षे तरी महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील सर्वंकष पर्यावरण शिक्षण मिळालेले नसेल. म्हणून खालील तीन प्रकारचे उपक्रम महाविद्यालयीन शिक्षणात सुरु करता येतील.

 

१. सद्य शिक्षणात बदल : वरील सर्वंकष पर्यावरण शिक्षणाचा महत्वाचा भाग (core portion) सर्व महाविद्यालयीन पदवी, पदविका आदि कोर्सेस मधे अनिवार्य करण्यात यावा. यात निसर्गातील सौंदर्यानुभूती, निसर्ग-विज्ञान, आणि निसर्ग-माणूस संबंध ही तीनही महत्वाची सूत्रे असावीत. आत्ता कॉलेजमधे शिकविला जाणारा “पर्यावरण विज्ञान” हा अनिवार्य विषय त्यासाठी आमुलाग्र बदलून बहुधा पदवीची पहिली २ वर्षे शिकवावा लागेल. तसेच तो रंजक बनवावा लागेल जेणेकरून विद्यार्थी त्यात रस घेतील. (“Nature and Man” – ‘निसर्ग आणि माणूस’ हे नवीन शीर्षक यासाठी सुचवावेसे वाटते). जागतिक व स्थानिक पर्यावरणीय समस्या समजून घेणे हेही यात अंतर्भूत असावे.

 

२. करिअर दर्शक कोर्सेस मध्ये वेगळा दृष्टीकोन व विषयानुरूप विवक्षित बदल : वेगवेगळे पदवी-पदविका कोर्सेस विद्यार्थांना कुठल्यातरी ‘करिअर’च्या दिशेने नेत असतात. या प्रत्येक क्षेत्रात निसर्ग-समरसता कशी आणता येईल,  निसर्गाच्या मर्यादा ओळखून तो व्यवसाय कसा बदलावा लागेल याचे ज्ञान त्या कोर्सेस मधे शिकणाऱ्या विद्यार्थांना व्हावे. या अनुषंगाने आत्ताच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये बदल व्हावे. उदा.

 

२.१ यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना entropy चे ज्ञान असतेच. त्याचा निसर्गाशी, ऊर्जा-द्रव्य वापराशी काय संबंध आहे ते त्यांना समजून यावे. तंत्रज्ञान व नैसर्गिक साधने यातील अन्योन्यसंबंध त्यांनी समजून घ्यावेत.

 

२.२ स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठी नवीन बांधकामे (उदा. टाऊनशिप, हिल स्टेशन, धरणे, महामार्ग, बंदरे) इ. गोष्टींचा निसर्गावर काय परिणाम होतो ते समजून यावे. पर्यायी विकास कसा साधता येईल याचा त्यांनी विचार करावा.

 

२.३ विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विद्युत निर्मिती केंद्रे, विद्युत नेटवर्क यांचे निसर्गावर परिणाम, प्रदूषण, इ. विषय समजून यावे. विद्युत यंत्रणेचे विकेंद्रीकरण कसे घडवता येईल याचा त्यांनी विचार करावा.

 

२.४ वास्तुरचना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक माल व पारंपरिक  कौशल्ये वापरून, ऊर्जेचा कमी वापर करणारी निसर्ग-स्नेही वास्तुरचना कशी करता येईल हे अभ्यासक्रमात शिकता यावे. नगर-रचना शिकताना, शहरीकरण हेच मुळात योग्य आहे का हे तपासून पाहता यावे. मोठ्या शहरांचा द्रव्य-उर्जेचा अतिवापर, ग्रामीण भाग/तेथील शेती/तेथील नद्यांचे पाणी यावर शहरांचे अवलंबून असणे, या एकंदरीत बांडगुळासारख्या शहरी जीवनशैलीला काय पर्याय आहेत, वेगळ्या प्रकारची, पर्यावरणस्नेही शहरे/वस्त्या/खेडी यांची रचना करता येईल का याचा विचार व्हावा.

 

२.५ उद्योग व आर्थिक व्यवस्थापन शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या द्रव्य-ऊर्जा वापराचा, आर्थिक ताळेबंदाचा निसर्गाच्या मर्यादांच्या परिप्रेक्ष्यात विचार करता यावा. प्रदूषण, कचरा, यावर होणारा खर्च काढता यावा. निसर्ग रक्षणाच्या बाबतीत एखाद्या कंपनीची जबाबदारी कुठे सुरु होते, कुठे थांबते, यावर त्यांनी चर्चा करावी.

 

अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकंदरीत, आत्ताच्या आधुनिक व्यवसायांची पर्यावरणीय किंमत काय आहे याचे डोळसपणे शिक्षण मिळावे व पर्याय शोधता यावेत.

 

३. पूर्णपणे नवीन पदवी-पदविका : निसर्गाधारित समाज-अर्थव्यवस्थेचा पाया रचण्यासाठी पूर्णपणे नवीन पदवी-पदविकाही सुरु कराव्या लागतील. या कोर्सेसचे खालील हेतू असतील.

  • जागतिक/स्थानिक पर्यावरणीय समस्यांची उकल करण्यासाठी लागणारे सक्षम नेतृत्व तयार करणे.

  • आत्ताच्या समाज-अर्थव्यवस्थेतील काय घ्यावे, काय टाकावे याचे मंथन करणारे वैचारिक नेतृत्व.

  • सर्वंकष दृष्टीकोनानुसार, निसर्ग-समरस अशी समाज-अर्थव्यवस्था रचण्यासाठी लागणारे नेतृत्व (change agents), उद्योजक, व सक्षम मनुष्यबळ (human capital).

 

उदाहरणादाखल दोन पदवी अभ्यासक्रमांची ढोबळ कल्पना खाली दिली आहे. यात Arizona State University येथील अशा अभ्यासक्रमांची माहिती व त्यात माझेही विचार अंतर्भूत केले आहेत.

 

३.१ BA in Sustainability: यात पाया म्हणून वर सांगितलेला निसर्ग-माणूस संबंध हा विषय खोलात जाऊन अभ्यासता येईल. यानंतर निसर्ग-समरस अर्थव्यवस्थेसाठी समाजात नक्की काय बदल आवश्यक आहेत व ते कसे घडवून आणावेत यावर वेगवेगळे विषय असतील. उदा. सरकारी धोरणे, प्रशासन, न्यायालये अशा वेगवेगळ्या संस्था, पर्यावरणीय कायदा, समाजास निसर्ग-केंद्री करण्याचे आव्हान व त्यातील वेगवेगळे पैलू, स्थानिक-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  पातळीवर करावयाचे बदल व त्यांचा अन्योन्यसंबंध, संस्कृतीमधील बदल, इ. या अभ्यासक्रमाचे स्वरूप आंतरशाखीय असेल (अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, न्याय, भूगोल, इ.). ही पदवी घेतल्यावर विद्यार्थी खालील नोकरी-व्यवसाय करू शकतात: वेगवेगळ्या सरकारी खात्यातील प्रशासक/कर्मचारी, शिक्षक, पर्यावरण पत्रकार, वकील, सामाजिक संस्था, Corporate Social Responsibility Officer, Sustainability Officer, निसर्ग-स्नेही वस्तू/सेवा पुरविणारे उद्योजक इ.

 

३.२ BSc  in Sustainability: यात पाया म्हणून वर सांगितलेला निसर्ग-विज्ञान हा विषय खोलात जाऊन अभ्यासता येईल. तसेच निसर्गाच्या सेवा (Nature’s services), नैसर्गिक साधनांच्या मर्यादा (Bio-environmental limits), कुठल्याही मानवनिर्मित वस्तूचे जीवनचक्र (Life cycle analysis) अशा संकल्पना असतील. यानंतर निसर्ग-समरस अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात कुठले बदल अपेक्षित आहेत यावर वेगवेगळे विषय असतील. उदा. परिसंस्थांचे पुनरुज्जीवन, पर्यायी व साधे तंत्रज्ञान, त्यावर आधारित नवीन उत्पादने, वेगवेगळ्या ऊर्जास्त्रोतांचा तौलनिक अभ्यास, नैसर्गिक संसाधने चिरकाल टिकावी यादृष्टीने त्यांचे व्यवस्थापन, इ.  या अभ्यासक्रमाचे स्वरूप आंतरशाखीय असेल (अर्थशास्त्र, जीवशास्त्र, परिसंस्थाशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल, इ.) ही पदवी घेतल्यावर विद्यार्थी खालील नोकरी-व्यवसाय करू शकतात: वेगवेगळ्या सरकारी खात्यातील प्रशासक/कर्मचारी, शिक्षक , पर्यावरण पत्रकार, वैज्ञानिक, वकील, सामाजिक संस्था, Corporate Sustainability Officer, निसर्ग-स्नेही वस्तू/सेवा पुरविणारे उद्योजक, परिसंस्था पुनरुज्जीवन, इ.

(इ). प्रौढांचे पर्यावरण शिक्षण

 

आधी सांगितल्याप्रमाणे, आत्ता-आत्ता पर्यंत, पर्यावरणाचे कुठलेही औपचारिक शिक्षणच दिले जात नव्हते. ही दरी लवकरात लवकर बुजविण्यासाठी पर्यावरणीय समस्या, निसर्ग-माणूस संबंध, सर्वंकष दृष्टिकोनाचे काही पैलू याची सर्वसामान्य माणसाला ओळख करून देणे आवश्यक आहे. यासाठी “प्रौढ (पर्यावरण) साक्षरतेचा” कार्यक्रम तयार करावा लागेल.

 

एक धोरण म्हणून सरकारने जास्तीत जास्त लोकांना पर्यावरण साक्षर करायला हवे. यासाठी सर्व विद्यापीठात पर्यावरण साक्षरतेचा कोर्स प्रौढ शिक्षण म्हणून घेता येईल. परिसरातील सर्व लोकांनी हा (मोफत) कोर्स शिकावा यासाठी जागृती करावी लागेल. वर मांडणी केलेल्या निसर्ग-माणूस संबंध, निसर्ग-विज्ञान, सर्वंकष दृष्टीकोन, पर्यावरणीय समस्या, निसर्ग-समरस अर्थव्यवस्था, निसर्गाचे पुनरुज्जीवन आदि विषयांचा यात अंतर्भाव व्हावा.

पदवीपर्यंत शिक्षण न झालेल्यांसाठी एक “बेसिक” कोर्स व पदवी शिक्षण झालेल्यांसाठी थोडा जास्त विस्ताराने अभ्यासक्रम तयार करता येईल. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थाही  असा कोर्स चालविण्यात सहभागी होऊ शकतील. सामान्य जनतेला हा कोर्स शिकण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी प्रशासक व कर्मचारी, शिक्षक यांनी सर्वप्रथम हा कोर्स शिकावा व शिक्षक बनण्याचे ट्रेनिंगही घ्यावे. 

(ई). व्यावसायिक पर्यावरण शिक्षण

 

वरील कोर्स हा या विषयाची एकंदरीत माहिती किंवा ज्ञानाचा पाया निर्माण करेल. परंतु निसर्गाधीष्टीत काम किंवा व्यवसाय ज्यांना करायचे असेल त्यांच्याजवळ विशिष्ट कौशल्ये हवीत. या कौशल्यांचे शिक्षण मिळावे म्हणून वेगवेगळे कोर्सेस महाविद्यालये, ITI, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, नगरपालिका/ग्रामपंचायत, यांच्या पातळीवर चालू करता येतील. अशा नोकऱ्या-व्यवसायांची व कोर्सची काही उदाहरणे:

 

१. ऊर्जा वापर विश्लेषक (Energy Use Analyst): कुठल्याही मोठ्या संस्थेला किंवा कंपनीला आपला एकंदरीत ऊर्जा वापर नक्की किती आहे व तो कसा कमी केला जाऊ शकतो याची कायम नोंद व विश्लेषण करायचे असेल तर असा एक पूर्णवेळ कर्मचारी ठेवता येईल. हेच कौशल्य असलेले इतर काही जण ऊर्जेचे लेखापरीक्षण (Energy Audit) स्वतंत्रपणे एक सल्लागार म्हणून करू शकतील. यासाठी असलेल्या कोर्समधे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार, ती ऊर्जा बनविण्यासाठी किती द्रव्य-ऊर्जा खर्च करावे लागते याचा ताळेबंद, वहनात व रुपांतरणात वाया जाणाऱ्या ऊर्जेचा अभ्यास इ. विषय असतील.

२. वस्तू जीवनचक्र  विश्लेषक (Product Lifecycle Analyst): वस्तू बनविण्यासाठी, वापरताना, व तिचा वापर संपल्यावर तिची योग्य विल्हेवाट किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या वेळेस जो द्रव्य व ऊर्जा वापर होतो तसेच जे द्रव्य/ऊर्जा वाया जाते त्या सर्वाचा हिशेब ठेवणे व ते कमी करणे म्हणजेच वस्तूचे जीवनचक्र अभ्यासणे. हे कौशल्य आज व भविष्यामध्ये जवळजवळ प्रत्येक उत्पादकाकडे असणे आवश्यक आहे.  यासाठी असलेल्या कोर्समधे उत्पादनाचे घटक (bill of materials), वेगवेगळी घटकद्रव्ये,  उत्पादनाच्या पद्धती व त्यांना लागणारी ऊर्जा, ग्राहक वस्तू नक्की कशा पद्धतीने वापरतात याचा अभ्यास, वस्तूचे वहन करताना लागणारी ऊर्जा व सोडले गेलेले प्रदूषण, पुनर्चक्रीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती इ. सर्व गोष्टींचा अभ्यास असेल.

 

३. परिसंस्था पुनरुज्जीवन समन्वयक (Ecological Restoration Coordinator): सरकारी जमिनी, जनतेच्या सामायिक मालकीच्या जमिनी (उदा. गायराने) किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर परिसंस्था पुनरुज्जीवनाचे अनेक प्रकल्प उभे राहणे निकडीचे आहे, ज्यायोगे जैवविविधता व निसर्गाच्या सेवा यांच्या ऱ्हासाचा प्रचंड वेग थोडातरी कमी होईल. अशा प्रकल्पांना सर्जनशील समन्वयक लागतील. त्यांना परिसंस्थाशास्त्र, भूगोल, हवामान, वनस्पतीशास्त्र, यांचा अभ्यास लागेल. त्या परिसरातील निसर्ग-माणूस संबंधही समजून घ्यावे लागतील. यासाठी समाजशास्त्र, अर्थशात्र, लोकसंख्या, इतिहास, याचाही अभ्यास लागेल. असे समन्वयक तयार करण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचा आंतरशाखीय कोर्स लागेल. प्रकाश गोळे यांनी तयार केलेला, Ecological Society चा गेली १५ वर्षे चालविला जाणारा डिप्लोमा कोर्स हे याचे ठळक उदाहरण आहे.

 

वरील उदाहरणांमध्ये माहितीचे विश्लेषण, समन्वय, व्यवस्थापन, आदि कौशल्ये मोठ्या प्रमाणात लागतील. निसर्ग-समरस अर्थव्यवस्थेत इतर अनेक नोकऱ्या/व्यवसाय असेही असतील की त्यांना शारीरिक श्रम व कौशल्ये दोन्हीची जोड लागेल (vocational). यापैकी काहींसाठी पारंपरिक  शैक्षणिक पात्रता कमी असली तरी चालेल. याची काही उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांसाठी वेगवेगळे छोट्या मुदतीचे कोर्स ITI, स्वयंसेवी संस्था, किंवा महाविद्यालये चालवू शकतात.

 

१. स्थानिक झाडांची रोपे वाढविणाऱ्या रोपवाटिकेत माळीकाम. यासाठी १ महिन्याचा कोर्स करता येईल. 

२. स्थानिक माल व पारंपरिक  बांधकामकौशल्ये वापरून घरे बांधणे तसेच जल व्यवस्थापनासाठी छोटे बांध, विहिरी, तळी, इ.  बांधणे. यासाठी १-६ महिन्याचे विशिष्ट कोर्स करता येतील.

३. सेंद्रीय शेतीतील वेगवेगळी कौशल्ये.

४. अन्नातील स्थानिक जैवविविधता वाढविणे व लांबून आयात केलेले अन्नघटक कमी करणे. पर्यावरणस्नेही उपाहारगृहे, हॉटेल्स, रिसॉर्टमधे अशा कर्मचाऱ्यांची गरज लागेल.

अशा प्रकारचा शिक्षण विषयक  दृष्टीकोन प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी सर्व बाजूंनी छोट्या मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील. यात पर्यावरण तज्ञ तसेच आंतरशाखीय विचार करू शकणाऱ्या अनेक व्यावसायिकांचा, सरकारी कर्मचाऱ्यांचा महत्वाचा सहभाग आवश्यक आहे. केवळ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींवर हे काम सोपवून भागणार नाही.

 

गरज आहे आपल्यातल्या प्रत्येकानेच शिक्षणाकडे, उपजीविकेच्या साधनांकडे व पर्यावरणाकडे एकाच सजग दृष्टीकोनातून बघण्याची !

bottom of page