पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: बालवाडी
योगेश पाठक
या लेखापासून आपण इकोयुनिव्हचे पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे इयत्तेनुसार विणू या. बालवाडीपासून सुरवात करू.
प्रथम, आजच्या बालवाडीच्या अभ्यासक्रमात काय अंतर्भूत आहे ते पाहू या.
-
बोटे, हात, पाय, इत्यादी स्नायूंच्या हालचाली व त्यावर आधारित कौशल्ये, हस्त-नेत्र समन्वय साधायला लावणाऱ्या वेगवेगळ्या कृती.
-
मुक्तपणे हवे ते खेळणे
-
गोष्टी ऐकणे. यात परीकथा, साहसकथा, पुराणकथा, नीतिकथा, आणि इतर अनेक प्रकारच्या कथा असू शकतात.
-
मूल स्वतःही आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी सांगते.
-
गाणी ऐकणे
-
एकत्र गाणी म्हणणे. ही गाणी अनेक प्रकारची असतात: बडबडगीतं, बालगीतं, गाण्यातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी, निसर्गाबद्दलची गीतं, मजेशीर, हसविणारी गाणी, कविता, प्रार्थना, इत्यादी.
-
आपण छोटे व मोठे दैनंदिन आयुष्यात काय-काय काम करतो याबद्दल बोलणे (उदा. आन्हिके, घरकाम, कार्यालयीन काम, खेळ, स्वयंपाक, स्वछता, करमणूक, झोप, इत्यादी)
-
नियम पाळायला शिकणे
-
वाचणे - याची सुरुवात प्रथम अक्षरे न शिकता श्रवण व दृश्य पद्धतीनं होऊ शकते
-
पायाभूत अंकगणित - उदा. संख्या मोजणे, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या कृती
-
अनेक प्रकारच्या शारीरिक कृती, व्यायाम व खेळ
-
शक्य असल्यास बागकाम व स्वयंपाक
-
वयानुरूप योग्य अशा सहली
-
नृत्य, नाटक, आणि कठपुतळी - आस्वाद घेणे व स्वतः करणे
-
पंचेंद्रियांतून जग अनुभवणे: अनेक दृश्ये व जागा बघणे, रंगांचा अनुभव घेणे, चित्रे काढणे-रंगविणे, अनेक गोष्टींचा वास घेणे, अनेक पृष्ठभागांचा खरखरीतपणा/ गुळगुळीतपणा स्पर्श करून बघणे, अनेक गोष्टींची चव घेणे, संगीत ऐकणे, संवाद ऐकणे, दृक्श्राव्य माध्यमे अनुभवणे (उदा. छोटे व्हिडीओ, सिनेमा)
-
अनेक वेगवेगळे खेळ खेळणे
अनेक शाळांमध्ये आता बालवाडीच्या अभ्यासक्रमात लेखन, पुढच्या पातळीचे वाचन, पुढच्या पातळीचे गणित, हे सर्व अंतर्भूत केले असते. हे करताना बऱ्याच प्रमाणात बालवाडीतील मुलाची सर्वसामान्य क्षमता उल्लंघली जाते. पण अनेक पालकांना हे हवे असते, कारण आपले मूल शिक्षणात ‘पुढे’ जावे असा त्यांचा आग्रह असतो.
वर उल्लेखलेला अभ्यासक्रम वापरून अनेक पालक मुलांची शिक्षणप्रक्रिया घरीसुद्धा चालवत असतात.
मला असं वाटतं की एखाद्या मुलास असा कुठलाही अभ्यासक्रम नसेल, परंतु
-
घरी आणि शेजारी मुलांची चांगली जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती असतील
-
अनेक समवयीन मित्रमैत्रिणी असतील
-
त्याच्या/तिच्या पालकांना शिक्षणप्रक्रियेत रस असेल
-
खेळायला भरपूर स्वातंत्र्य व संधी असेल
तर त्या मुलाची एकंदर प्रगती बालवाडीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाएवढीच होऊ शकते. म्हणजेच अशा मुलाला बालवाडीच्या पातळीचे वाचन, अंकगणित, स्नायुविकास, गोष्टी सांगण्याची क्षमता, पंचेंद्रियांच्या माध्यमातून शिकण्याची क्षमता हे सर्व जवळपास तेवढेच विकसित होऊ शकते. तसे बघितले तर मुले बालवाडीत रोज ३-४ तासच जात असतात. बाकीची शिक्षणप्रक्रिया ही घरीच होत असते.
मग बालवाडीत जाण्याचा नक्की फायदा काय असतो?
-
बालवाडीचे शिक्षण हे शिक्षणप्रक्रियेस एक प्रकारची रचना व क्रम देते
-
बालवाडीचे शिक्षण मुलांना समाजात मिसळायला, इतरांशी जमवून घ्यायला शिकविते, जे घरी साध्य होईलच असे नाही. बालवाडीत ते नियम व व्यवस्था यांचे महत्व जाणू शकतात (उदा. शाळेतील नियम). शाळा हे सामाजिक सहकार्याचे एक प्रतीक असते. शाळेत मुक्त खेळाबरोबरच काही नियमांनी बांधलेले खेळही असतात. हे सर्व पुढच्या आयुष्यासाठी पायाभूत आहे.
-
बालवाडी शिक्षणात मूलभूत वाचन आणि अंकओळख याची चांगली तयारी होते. हा पुढील सर्व शिक्षणाचा पाया असतो. यांनतर जेव्हा ते पहिलीत जातात तेव्हा ते वाचन व अंक-ओळख याबाबतीत कच्चे राहण्याची शक्यता कमी होते.
-
शाळेतील गोष्टी ऐकण्या-सांगण्याची प्रक्रिया, त्यातील अभिव्यक्ती व अनुभूती हे सर्व जास्त सामुदायिक व समृद्ध असू शकते.
आता घरीच मुलांना शिकविणारे पालक म्हणतील की शाळेत पाठवायचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत – आणि हे बहुधा खरे आहे. असो.
जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की अनके दशके बालवाडी शिक्षणासंबंधी जी चर्चा झाली ती मुख्यतः ‘कसे’ शिकवायचे, कुठली शिक्षणतंत्रे वापरायची यासंबंधी होती. ‘काय’ शिकायचे याचा सर्वंकष पुनर्विचार अभावानेच आढळतो. त्यामुळे बालवाडीतील मुख्य अभ्यासक्रम अनेक दशके तसाच राहिलेला आहे (जो या लेखाच्या सुरुवातीस दिला आहे).
विशेषतः निसर्गशिक्षण बालवाडीत जोरकसपणे, आग्रहाने घेतले जात नाही. अभ्यासक्रमातील एक महत्वाचा मुद्दा म्हणून निसर्गाचा विचार गांभीर्याने केला गेलेला नाही. बालवाडीतील काही शैक्षणिक कृतींमध्ये नैसर्गिक पदार्थ वापरले जातात (उदा. पाने, फुले, दगड) पण इथे निसर्गाचा केवळ एक भांडार म्हणून विचार केला असतो.
इकोयूनिव्हमध्ये आम्ही मानतो की पर्यावरणाच्या सर्वंकष दृष्टिकोनाची ओळख ही बालवाडीपासूनच व्हायला हवी. पालक या शिक्षणाचे मुख्य संयोजक असायला हवेत, आणि शिक्षकांनीही याबाबतीत महत्वाची भूमिका घ्यावी.
‘निसर्ग : आपणा सर्वाना एकत्र बांधणारे जाळे’ ही संकल्पना बालवाडीच्या अभ्यासक्रमात केंद्रस्थानी असावी असे आम्ही सुचवितो. इतर महत्वाची सूत्रे म्हणजे निसर्गातील विविधता, निसर्गाचे सौन्दर्य, निसर्गाचे निरीक्षण, निसर्ग अनुभवणे, आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांबद्दल समजून घेणे.
‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना बालवाडीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.
-
मी व माझे कुटुंब
-
माझे घर (विशेषतः ते कशाचे बनविले आहे, इथे आधी काय होते)
-
माझा परिसर
-
माझ्या परिसरातील हवा: पाऊस, बर्फ, वारा, उन्ह, ढग
-
माझ्या परिसरातील ऋतू
-
दिवसाचे चक्र: सूर्योदय, सकाळ, मध्यान्ह, दुपार, सायंकाळ, सूर्यास्त
-
रात्रीचे चक्र: रात्र, मध्यरात्र, उत्तररात्र, चंद्र व त्याचे आकार, तारे
-
आपल्या घरी कायकाय वस्तू आहेत
-
माझ्या परिसरातील नैसर्गिक स्थळे: टेकडी, डोंगर, पठार, सडे, नदी, ओढा, समुद्र, जंगल, इत्यादी
-
माझ्या आजूबाजूची जमीन
-
माती म्हणजे काय?
-
माझ्या परिसरातील पाणी: नद्या, तलाव, ओढे, समुद्र, पाणथळ जागा, इत्यादी
-
झाडे
-
झुडपे
-
रोपटी, हिरवळ, शेवाळे, भूछत्र
-
गवत
-
सस्तन प्राणी
-
पक्षी
-
कीटक
-
उभयचर: बेडूक, कासव, इत्यादी
-
साप
-
झाडाचे जीवनचक्र
-
प्राण्यांची जीवनचक्रे
-
प्राण्यांची घरे
-
माझा समाज / वस्ती
-
माझे खेडे / गाव / शहर (हे कधी सुरु झाले/वसले, इथे पूर्वी काय होते?)
-
आपले अन्न: ते कुठून येते? प्रत्यक्ष निसर्गातून कुठले अन्न येते, शेतात कुठले अन्न पिकते?
-
धान्य, मांस, भाज्या, फळे, इत्यादी : अन्नाचे वेगवेगळे प्रकार
-
आपली पाण्याची गरज. आपण वापरतो ते पाणी कुठून येते?
-
हवा म्हणजे काय आणि ती कुठून येते?
-
झाडाचे वेगवेगळे भाग
-
पाने, फुले, खोड, फळे, मुळे: सर्वांची रचना, वास, चव, रंग, स्पर्श
-
निसर्गातील विविधता: झाडे
-
निसर्गातील विविधता: प्राणी
-
अनेक प्राण्यांसारखे आपणही एक प्राणी आहोत का?
-
प्राणी आणि झाडे यांना जगण्यासाठी काय लागते?
-
निसर्गातले आवाज: वारा, झाडे, पाणी, आणि प्राणी यांचे आवाज
-
माझ्या परिसरातील मोठी माणसे कायकाय काम करतात? त्यांच्या कामात निसर्गाचा सहभाग आहे का?
-
निसर्गात राहणारे, काम करणारे लोक कोण आहेत? कुठे आहेत? त्यांना निसर्गातून काय मिळते? त्यांचे काम ऋतूप्रमाणे बदलते का? निसर्गाचा त्यांचा कामावर का परिणाम होतो?
-
औषधे: ती कुठून येतात? निसर्गात औषधे मिळतात का?
बालवाडीच्या अभ्यासक्रमात या सर्व संकल्पना प्राथमिकरीत्या मांडता येतील. त्या शिकविण्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र मिळून अनेक शैक्षणिक कृती तयार करू शकतात. अशा सर्व कृतींचे स्वरूप स्थानिक निसर्ग/परिसंस्था, स्थानिक भूरूपे, स्थानिक हवामान यानुसार बदलेल. (इकोयूनिव्हतर्फेही नमुन्यादाखल काही शैक्षणिक कृती प्रकाशित केल्या जातीलच).
वरील संकल्पना बालवाडीचा शैक्षणिक अनुभव समृद्ध तर करतीलच, पण पालकांनाही निसर्गाबद्दल जास्त डोळसपणे विचार करण्यास भाग पाडतील. शहरी भागात राहणारे पालक व मुले यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचे आहे.