top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: हरीतात्म शिक्षणविचाराचा गाभा 

योगेश पाठक 

 

या लेखापासून आपण इकोयुनिव्हच्या पर्यावरण शिक्षण विचाराचा तिसरा स्तंभ – म्हणजे काय शिकायचे आहे / काय शिकवायचे आहे – याचा विचार करू या. सर्वंकष पर्यावरणीय दृष्टी जर शिक्षणात यावयाची असेल तर कुठल्या संकल्पना, कुठले विषय महत्वाचे आहेत? 

यासाठी मानवी मेंदू विषय व संकल्पना शिकतो म्हणजे नक्की काय करतो हे प्रथम पाहावे लागेल. ‘शिकण्या’चे मूळ विज्ञान आहे मेंदूविज्ञान. जरी या अंगाने खूप अभ्यास झाला असला तरी शिक्षणप्रक्रिया मेंदूत नक्की कशी होते याबद्दल अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. 

 

साधारणपणे आपला मेंदू संकल्पना, कौशल्ये, मूल्ये, तत्वे, माहिती, घटना हे सर्व  ‘शिकतो’ म्हणजे परत परत वापरता येणाऱ्या स्मृतींच्या स्वरूपात साठवून ठेवतो. या प्रत्येक साठवणीभोवती ती स्मृती जेव्हा साठविली गेली तेव्हाचा  ‘संदर्भ’ असतो. काही वेळा एखाद्या कृतीच्या पायऱ्यांची स्मृती साठविली जाते. काही वेळा स्मृती ज्या क्रमाने साठविला गेल्या तो क्रम महत्वाचा असतो. अशा अनेकानेक प्रकारच्या स्मृती, त्यांचे संदर्भ, त्यांच्याशी संबंधित कृती, क्रम, यांचे एक मोठे जाळे एकमेकांशी जोडलेल्या मेंदूपेशींच्या स्वरूपात तयार  होणे, म्हणजे ‘शिकणे’. असे दीर्घ कालावधीत  तयार होणारे जाळे अभ्यासणे हा शिक्षण-मेंदूशास्त्राचा मुख्य विषय होता/आहे. पण गेल्या काही वर्षात शिक्षण-मेंदूवैज्ञानिक काही नवीन गोष्टींचाही अभ्यास करत आहेत. या पेशी (शिकलेल्या गोष्टींच्या स्मृती) जेव्हा नवीन संदर्भांना सामोऱ्या जातात तेव्हा त्या का व कशा बदलतात, आधीचे ‘शिकणे’ कसे वापरतात,नवीन परिस्थितीत आधी शिकलेल्या संकल्पना कश्या वापरतात हेही महत्वाचे ठरत आहे. 

एखादी संकल्पना शिकणे म्हणजे 

  • त्या संकल्पनेशी संबंधित असे वेगवेगळे अनुभव एकमेकांशी जोडता येणे 

  • त्या अनुभवांमध्ये काय सारखे आहे व काय वेगळेपण आहे हे शोधता/सांगता येणे 

  • ती संकल्पना स्मृतीत योग्य प्रकारे साठवता येणे व तिचा लागेल तेव्हा पुनर्वापर करता येणे 

  • ती संकल्पना नवीन अनुभव, नवीन प्रश्न यांना सामोरे जाताना वापरता येणे (उपयोजन) 

 

प्रत्येक अनुभवाला त्याचा संदर्भ असतो. त्यामुळे संकल्पनाही अनेक संदर्भांसहीत स्मृतीत साठविल्या जातात. गोष्टी सांगणे/ऐकणे हे शिक्षणतंत्र समृद्ध असे संदर्भ विद्यार्थ्यास देते. म्हणूनच गोष्टीरूपातून शिक्षण देण्याचा अंतर्भाव शिक्षणात – विशेषतः बालवाडी व प्राथमिक शिक्षणात – हवा. 

 

विशिष्ट क्रम किंवा विशिष्ट रचनांच्या स्वरूपात शिकलेल्या संकल्पनाही जास्त चांगल्या शिकल्या जातात. उदा. गणितीय आकडेमोडी व कृती, क्रमिक स्वरूपात शिकलेली माहिती/घटना, किंवा इतर संकल्पना. 

अनुभविक शिक्षण मेंदूतील संकल्पनांची ही जोडणी जास्त चांगली करून देते, म्हणून ते महत्वाचे – भाषा, गणित, व इतर सर्व विषयात. 

 

या सर्वाचा सर्वंकष पर्यावरणीय शिक्षणाशी काय संबंध सांगता येईल? 

  • पर्यावरणीय शिक्षणातही संकल्पना चांगल्या शिकण्यावर भर हवा. त्या वयानुरुप हळूहळू पण पक्क्या शिकता याव्यात. 

  • संकल्पना सादर करताना त्यांना समृद्ध अशा संदर्भांचे कोंदण हवे. हेही समजून यावे की संदर्भ बदलू शकतात पण संकल्पना तीच राहील. 

  • संकल्पनांचे  क्रमही  महत्वाचे. 

  • संकल्पनांचे जाळे जसे जसे विणले जाईल तशी विद्यार्थ्यास एक मूल्यव्यवस्था स्वतःच तयार करता येईल/यावी. या मूल्यव्यवस्थेतून मुलास जग शाश्वत सह-अस्तित्वाकडे कसे नेता येईल याचा मार्ग दिसावा. त्याला जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळावी. 

 

पुढील काही लेखात आपण वयानुरूप कुठल्या पर्यावरणीय संकल्पना शिकता  येतील याचा विचार करू. संकल्पना विणण्याचे मुख्य धागे असतील निसर्ग-सौन्दर्य, निसर्गविज्ञान, आणि निसर्ग-माणूस संबंध. पर्यावरणीय संकल्पना इतर विषयातील संकल्पनांशी (उदा. भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, कला) यांच्याशी जोडता येतील. संकल्पनांचे संदर्भ, आणि त्या शिकण्याचे क्रम याबाबतही काही सूचना केल्या जातील. 

बालवाडीपासून ते बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेत शिकलेल्या पर्यावरणीय संकल्पना, त्यांची एकमेकांशी जोडणी, यातून तयार होईल पर्यावरणीय संकल्पनांचे एक मोठे, समृद्ध  जाळे. हाच असेल इकोयुनिव्हच्या हरितात्म शिक्षणविचाराचा गाभा.

bottom of page