top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता सहावी

योगेश पाठक 

या वयाची मुले घटना-संकल्पना-संस्था-प्रणाली या सगळ्यांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने, पूर्वग्रह न बाळगता पाहू शकतात. ती अभ्यासविषयात आता अजून थोडी जास्त जटिलता हाताळू शकतात, जास्त माहितीचे ग्रहण करू शकतात. निरीक्षण करणे, मोजमाप करणे, विश्लेषण करणे या क्षमता आता चांगल्या मूळ धरू लागल्या असतात.  

‘पृथ्वी’ या महा-संस्थेतील अनेक भौगोलिक, हवामानशास्त्रीय, ऐतिहासिक किंवा  वैज्ञानिक संकल्पना आता मुलांना प्राथमिक स्वरूपात शिकविता येतात. मानवी संस्कृतींची समज आता त्यांना येत असते. या संकल्पनांचे एकत्रीकरण, सुसूत्रीकरण, संकलन करण्यात निसर्गशिक्षक महत्वाची भूमिका बजावू शकतात. 

 

इकोयूनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना सहावीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.

  • पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. पृथ्वीचा कललेला आस. त्यांचा परिणाम. वार्षिक चक्र व ऋतू. 

  • स्थानिक हवा व हवामान. हवेची वेगवेगळी परिमाणे - तापमान, दाब, वारा, बाष्प, पाऊस.   

  • आपल्या राष्ट्राचे वार्षिक हवामान व ऋतू. 

  • उपग्रहाने पाठविलेली हवामान-छायाचित्रे व चित्रफिती समजावून घेणे, निकटच्या काळातील हवामान बदलाची नोंद व अंदाज करणे. 

  • वातावरण

    • मुख्य थर 

    • वायूंचे प्रमाण - आत्ता असलेले 

    • वायूंचे प्रमाण - प्राचीन काळातील (पृथ्वीवर जीवन असायच्या आधी व नंतर) 

    • ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, आणि मिथेन यांचे वातावरणातील प्रमाण व मानवी हस्तक्षेपामुळे होणारा  असमतोल 

    • प्रदूषण, हरितगृह वायूंचे उत्सर्जन 

    • ओझोनचा थर, तो कमी झाल्यावर उद्भवलेले संकट, व त्यावर मानवजातीने केलेली कृती 

  • वनस्पती व प्राणी यांच्या स्थानिक प्रजाती स्थानिक हवेतील दैनंदिन बदलांना कसे सामोरे जातात? ऋतूंप्रमाणे होणाऱ्या हवामान बदलांना कसे सामोरे जातात? हवामानाचा परिसंस्थांवर परिणाम. 

  • ऋतूंनुसार (पावसाळा, उन्हाळा) स्थानिक जलस्रोतांवर होणारे परिणाम. पाण्याचे प्रवाह व त्यांचा परिसंस्थांवर परिणाम. 

  • पृथ्वीवरील तापमानाचे पट्टे, त्यांचा वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांशी संबंध. तापमानाचा परिसंस्थांवर परिणाम. 

  • पृथ्वीवरील तापमान पट्ट्यांमुळे तयार होणारे सागरी प्रवाह. त्यांचा सागरी जीवनाशी संबंध. 

  • पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणचे वार्षिक सरासरी तापमान. 

  • जागतिक तापमानवाढीचा पुरावा. 

  • सागरी परिसंस्था (किनारा, सागरी पृष्ठभाग, आणि पृष्ठभागाखाली काही अंतरावरच असलेले सागरी जीवन): वनस्पती, प्राणी, अन्नसाखळ्या 

  • सागरी परिसंस्था (वाढत जाणाऱ्या खोलीनुसार): वनस्पती, प्राणी, अन्नसाखळ्या 

  • (वरील सर्व संकल्पना वेगवेगळ्या नकाशांच्या साहाय्याने दाखविल्या जाव्यात) 

  • सागरी कांदळवन परिसंस्था 

  • ऊर्जा 

    • ऊर्जेचे स्रोत: यांचे केंद्रित आणि वितरीत असे वर्गीकरण करावे (म्हणजे, जास्त एंट्रॉपी व कमी एंट्रॉपी असलेले). अक्षय व मर्यादित साठे असलेले असे दुसरे वर्गीकरण. अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये त्यांची ऊर्जानिर्मितीची प्रक्रिया, वेग, मर्यादा यांचा ऊहापोह व्हावा. 

    • सूर्य - पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूळ स्रोत 

    • ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर. त्यात काही ऊर्जा वाया जाणे व कार्यक्षमता.

    • तंत्रज्ञान व ऊर्जा यांच्यातील संबंध 

    • माणूस निसर्गातील वेगवेगळे ऊर्जास्रोत स्वतःच्या फायद्यासाठी कसे वापरतो, त्याचे निसर्गावर कसे परिणाम होतात (उदा. जमिनीचा अतिरिक्त वापर, प्रदूषण) 

    • राष्ट्रीय पातळीवरील ऊर्जानिर्मितीचा  एक आढावा: कोळसा/खनिज तेल/खनिज वायू यांचा पुरवठा, तेलशुद्धीकरण कारखाने, जलविद्युत प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प व लघुरूपातील स्थानिक निर्मिती, पवन ऊर्जा प्रकल्प व लघुरूपातील स्थानिक निर्मिती, विद्युतपुरवठ्याचे जाळे, इत्यादी 

    • ऊर्जानिर्मिती व वितरण यासाठी जी महाकाय पायाभूत व्यवस्था लागते तिची द्रव्य व ऊर्जा यांची गरज 

  • द्रव्य: 

    • निसर्गातून मानव कुठली तयार द्रव्ये मिळवतो: माती, खडक, पाणी, अनेक खनिजे, खनिज तेल, कोळसा, लाकूड, डिंक, पाने, फुले, मुळे, फळे व इतर अनेक नैसर्गिक पदार्थ 

    • रसायने (मानवनिर्मित) 

    • निसर्गातून मिळालेले द्रव्य मानवपयोगी वस्तू व पदार्थ यांच्यात रुपांतरीत  करणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया: त्यातून निर्माण होणारे अतिरिक्त पदार्थ, कचरा, व प्रदूषण. त्याचा नैसर्गिक परिसंस्थांवर होणारा परिणाम (उदा. नद्या)

    • औद्योगिक उत्पादने वापरली जाण्याआधी, वापरत असताना, आणि वापरल्यानंतर त्यांच्यामुळे होणारा कचरा व प्रदूषण (उदा. वेष्टने, डिझेल जनरेटर मधून होणारे प्रदूषण, जुन्या वस्तू कचऱ्यात फेकल्या जाणे)

    • वस्तूंच्या पुनर्वापरामधील संधी व आव्हाने 

  • मृदा व पाणी ही नैसर्गिक संसाधने आपण इतर प्रजाती, नैसर्गिक परिसंस्था व इतर मानव यांच्याबरोबर सामायिकरीत्या वापरायला हवीत याची जाणीव. नैसर्गिक संसाधनांची क्षिति ज्या वेगाने होत आहे, तो वेग निसर्गाच्या पुनर्भरण करायच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे, हे समजून घेणे. 

    • मातीचे घटक 

    • मातीची निर्मितीप्रक्रिया 

    • नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे होणारे मातीचे क्षरण. त्याचा परिसंस्थांवरील परिणाम. 

  • शेती आणि अन्नव्यवस्था यांचा इयत्तेनुरूप सविस्तर अभ्यास

    • शेतीचा इतिहास (स्थानिक आणि जागतिक)

    • सध्याची शेतीपद्धत (स्थानिक आणि राष्ट्रीय), त्यातील फायदेतोटे 

    • शेतीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास: राज्य आणि देश यांच्यातील वेगवेगळी पिके, त्यांची वितरणव्यवस्था, नगदी पिके व पारंपरिक पिके, अन्नधान्ये व इतर पिके (उदा. कापूस) 

    • शेतीची ऊर्जा, द्रव्य, व पाणी यांची गरज. उदा. वीज, सिंचन, खते, कीटकनाशके 

    • ऐतिहासिक काळातील व आधुनिक शेतीचा जमीनवापरावरील परिणाम: निसर्गात असलेली जमीन शेतीखाली जाणे 

    • आधुनिक शेतीचा मृदेवरील परिणाम 

    • आधुनिक शेतीचा पाण्याचे नैसर्गिक प्रवाह व परिसंस्था (उदा. नदी) यांच्यावरील परिणाम 

    • शाश्वत सहअस्तित्वासाठी शेती 

    • माणसाचा आहार, समतोल/चौरस आहार, जीवनसत्वे व पोषक द्रव्ये यांची गरज 

    • अन्नातील जैवविविधता व तिचा अभाव 

    • प्रक्रिया केलेले, अति-प्रक्रिया केलेले आधुनिक अन्न, जंक फूड 

    • शाश्वत शेती - जैवविविधता - अन्न यांच्यातील संबंध 

  • मानवी व्यवसाय: पुन्हा एकदा, थोडा जास्त पद्धतशीरपणे अभ्यास 

    • राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नोकरी-व्यवसायांची यादी करणे

    • ह्या नोकरी-व्यवसायांसाठी लागणारी कौशल्ये, ज्ञान, व तंत्रज्ञान समजून घेणे 

    • हे नोकरी-व्यवसाय नैसर्गिक संसाधने, जमीन वापर, व परिसंस्था यांच्याशी कसे जोडले आहेत, अवलंबून आहेत ते समजून घेणे 

    • सध्याचे ‘प्राथमिक- द्वितिय- तृतीय’  असे व्यवसायांचे प्रारूप, व त्यातील दोष समजून घेणे (नैसर्गिक संसाधनांचे शोषण व निसर्गाची जमीन बळकावली जाणे)

    • व्यवसायांमधील उत्पन्नाची/पगाराची विषमता 

    • शाश्वत सहअस्तित्वाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय-धंदा कसा असावा: तोंडओळख 

  • संकीर्ण चर्चा: संस्कृती आणि पर्यावरण 

    • संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये 

    • प्राचीन व ऐतिहासिक संस्कृतींचा उदय व ऱ्हास: उदाहरणे 

    • परिसंस्थांचे आरोग्य व पर्यावरणीय समतोल यावर संस्कृतींचे टिकणे कसे अवलंबून असते 

    • हवामान, पाणी, व मृदा यासंदर्भात संस्कृतींपुढील आव्हाने 

    • पर्यावरणीय व नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टिकोनातून प्राचीन संस्कृतींचा ऱ्हास: उदाहरणे 

    • वरील मुद्द्यांच्या आधारे सद्य आधुनिक संस्कृतीवर चर्चा करणे  

  • जैवविविधता, सजीवांचे वर्गीकरण, आणि निसर्गातील निरीक्षणांच्या नोंदी: औपचारिक शिक्षणास सुरुवात 

  • निसर्गात फिरून जास्त खोलवर केलेली निरीक्षणे, प्रजाती वर्गीकरणाच्या नोंदणी, नमुने, माणसाकडून केला जाणारा नैसर्गिक संसाधनांचा वापर नोंदणे. उदाहरणे 

    • वनस्पती, सस्तन प्राणी (उदा. मानव, कुत्रा, मांजर, गाय), पक्षी, बेडूक, यांची वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन या सर्वांचे निरीक्षण 

    • पक्षी आणि सस्तन प्राणी: पुनरुत्पादन व जन्म 

    • वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांची निरीक्षणे व त्यासंबंधी प्रयोग 

    • प्राणी व वनस्पती यांची वैशिष्ट्ये बघून त्यांचे वर्गीकरण करणे 

    • मानव, सस्तन प्राणी, व पक्षी यांच्यातील काही शरीरसंस्थांचा अभ्यास: त्वचा, अस्थी इत्यादी 

    • घरातील पाणीवापर मोजणे 

    • स्थानिक भागात किती जमीन निसर्गाकडे व किती जमीन मानवाच्या अधिपत्याखाली आहे ते मोजणे 

 

या इयत्तेस अनुरूप असणाऱ्या भूगोल, इतिहास, विज्ञान यातील इतर सर्व संकल्पना समांतरपणे शिकवल्या जाव्यातच. उदा. 

  • आकाशगंगा, तारे, सूर्यमाला, ग्रह

  • पृथ्वीचे अक्षवृत्त, रेखावृत्त, दोन ठिकाणांमधील कोनीय अंतर 

  • पृथ्वीचे परिवलन व त्याचे परिणाम: पृथ्वीचा आकार, दिवस व रात्र यांचे चक्र, वारे तयार होणे, समुद्री प्रवाह, इत्यादी. या सर्वांचा सजीव सृष्टीवर होणारा परिणाम - प्राणी व वनस्पती 

  • खडकांचे प्रकार: स्थानिक व प्रादेशिक भागात दिसणारे खडक व त्यांची सविस्तर ओळख. देशाच्या इतर भागात व जगात सापडणाऱ्या मुख्य खडकांची तोंडओळख. 

  • द्रव्याचा अभ्यास: धातू व अधातू. दैनंदिन वापरात असणारे पदार्थ/द्रव्ये, नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांमधील फरक 

  • निवडक संस्कृतींचा अभ्यास, इतिहासातील त्यांचे स्थान. ऐतिहासिक संशोधनाची मुख्य साधने, पुरावणवस्तूंचा अभ्यास याची तोंडओळख. 

bottom of page