top of page
पर्यावरणीय संकल्पनांचे जाळे: इयत्ता पहिली

योगेश पाठक 

इकोयूनिव्हच्या ‘पर्यावरणीय संकल्पनांच्या जाळ्या’तील खालील संकल्पना पहिलीच्या अभ्यासक्रमात असायला हव्यात.

  • नदी किंवा ओढा कसा वाहतो? त्यांच्या प्रवाहात जे वेगवेगळे प्राणी असतात त्यांचे काय होते? 

  • खूप जोरात वारा आला तर धूळ का उडते?

  • पाऊस पडला तर मातीचे काय होते? चिखल कसा असतो?

  • आपले सगळे पाणी येते कुठून? आपण पाण्याचे काय काय करतो?

  • मातीचे वेगवेगळे प्रकार. माणूस मातीपासून कायकाय करतो? 

  • पावसाचे पाणी कुठे जाते? ओढे कुठून सुरु होतात, कुठे संपतात? नद्या कुठून सुरु होतात, कुठे संपतात? समुद्र कुठून सुरु होतो, कुठे संपतो?

  • खूप जोरात पाऊस पडला तर काय होते? पूर म्हणजे काय?

  • समुद्रात लाटा कश्या तयार होतात? त्या किनाऱ्यावर येतात तेव्हा त्यांचे काय होते? 

  • झाडाची एकंदर बाह्य रचना 

  • झाड वाऱ्यात कसे  हलते-डोलते?

  • झाडाच्या फांद्या कशा सुरु होतात, कशा वाढतात?

  • झुडुपांसाठी : वरील सर्व मुद्दे 

  • गवत : बाह्य रचना, गवत वाऱ्यात कसे  हलते-डोलते? गवताच्या लाटा. 

  • प्राण्यांचे शरीर कसे दिसते, त्यांचे अवयव : सस्तन, पक्षी, कीटक, उभयचर, साप-सरडे 

  • प्राण्यांची गती, ते कसे चालतात, धावतात, उडतात, लपतात, थांबतात : सस्तन, पक्षी, कीटक, उभयचर, साप-सरडे 

  • प्राणी आपला तोल कसा सांभाळतात, माणूस कसा सांभाळतो? 

  • कुठले प्राणी (मोठ्या) माणसांपेक्षा जास्त/कमी  शक्तिमान आहेत? कुठले प्राणी छोट्या मुलांपेक्षा जास्त/कमी शक्तिमान आहेत? कसे? 

  • प्राणी झोपतात का? कसे, कुठे? झाडे झोपतात का? 

  • वेगवेगळ्या ऋतूंमध्ये प्राणी आणि झाडे काय करत असतात? ते ऋतूंसाठी तयारी कशी करतात? काय बदल करतात? 

  • पाळीव आणि नैसर्गिक/जंगली प्राणी यांच्यात फरक काय? आपल्या परिसरात कुठले पाळीव प्राणी आहेत? जगात इतरत्र कुठले पाळीव प्राणी असतात? पाळीव प्राणी आपल्याला काय देतात? त्या बदल्यात आपण त्यांना काय देतो? पाळीव प्राणी जंगलातही सापडतात का? त्यांचे कुणी भाऊबंद जंगलात असतात का? 

  • प्राणी आणि झाडे बघू शकतात का? वास घेऊ शकतात का? चव घेऊ शकतात का? ऐकू शकतात का? त्यांना स्पर्श जाणवतो का? त्यांच्या आणि आपल्या संवेदना यांच्यात काय फरक आहे? 

  • प्राण्यांच्या बाळांबद्दल: सस्तन, पक्षी, साप-सरडे, उभयचर, कीटक यांची मुले 

  • प्राण्यांची बाळं एकमेकांशी आपल्यासारखी खेळतात का? ती काय खातात? दूध पितात का? 

  • प्राणी एकमेकांशी संवाद कसे साधतात? त्यांची भाषा असते का? 

  • आपण एखाद्या झाडाचे वेगवेगळे भाग कसे वापरतो? उदा. नारळ किंवा कडुलिंबाचे झाड. 

  • आपण प्राण्यांचा कसा वापर करून घेतो (पाळीव आणि जंगली): अंडे, मांस, कातडे-पिसे, संरक्षण, इतर 

  • वनस्पती, प्राणी, आणि मानव निसर्गातील हवा, पाणी, माती, हे कसे वाटून घेतात? 

  • माझा परिसर: त्यातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित जागा. त्यांच्यात ऋतूंप्रमाणे होणारे बदल. 

 

पहिलीच्या अभ्यासक्रमात या सर्व संकल्पना अतिशय प्राथमिकरीत्या मांडायचा प्रयत्न करावा. त्या शिकविण्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र मिळून अनेक शैक्षणिक कृती तयार करू शकतात. अशा सर्व कृतींचे स्वरूप स्थानिक निसर्ग/परिसंस्था, स्थानिक भूरूपे, स्थानिक हवामान यानुसार बदलेल. (इकोयूनिव्हतर्फे नमुन्यादाखल काही शैक्षणिक कृती प्रकाशित केल्या जातील). 

वरील संकल्पना पालकांनाही निसर्गाबद्दल जास्त डोळसपणे विचार करण्यास भाग पाडतील. शहरी भागात राहणारे पालक व मुले यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचे आहे.

bottom of page