इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: नववीतले मूल
योगेश पाठक
नववीतले मूल किशोरावस्था प्रत्यही जगत असते. मुलांचे व्यक्तिमत्व आता कुटुंबापेक्षा स्वतंत्र असे विकसित होऊ लागले असते. समवयीन मुलांमध्ये मिसळता येणे हे त्यांच्यासाठी आता खूप महत्वाचे असते. शालेय अभ्यास, क्रीडा यात भाग घेत असताना त्यांना आपली बलस्थाने आणि मर्यादा, दोन्ही कळू लागलेले असतात.
आपल्या आजूबाजूच्या मानवी समाजातील घडामोडींबद्दल ते आता जास्त जागरूक होऊ लागलेले असतात. सामाजिक पटलावरील राजकारण, धर्म, शहरी व ग्रामीण भागातील फरक, वर्ण/जाती भेद, आर्थिक विषमता, या सर्वांबद्दल ते थोडा विचार करू लागले असतात. अशा विषयांची चर्चा होत असताना, ते आपले मित्र, शिक्षक, आई-वडील यांच्यासमोर मते आग्रहाने मांडत असतात, वाद-विवाद करत असतात. त्यांना गटांमध्ये स्पर्धा करायला आवडतं, आपला विजय साजरा करायला आवडतो आणि पराभव झाल्यास तो का झाला याच्या कारणांची चर्चा करायलाही आवडतं.
भाषेचा अभ्यासक्रम आता व्याकरण, शब्दसंपदा, व साहित्य यात अजून पुढे गेला असतो. बहुतांश मुले आता दोन किंवा तीन भाषा औपचारिकरीत्या शिकत असतात. त्यांना या भाषांमध्ये वाचावे व लिहावे लागते, गटासमोर सादरीकरणही करावे लागते. संभाषण, पत्रलेखन, भाषांतर हे सर्व पैलू किशोरवयीन मुलांच्या भाषाकौशल्यात असतात.
इतिहास, समाजशास्त्र, आणि राज्यशास्त्र, या विषयात त्यांनी देशातील गुंतागुंतीचे सांस्कृतिक ताणेबाणे समजून घ्यावे. विकास व आधुनिकता यांचा समाज व संस्कृती यावर कसा परिणाम होत गेला हेसुद्धा त्यांनी लक्षात घ्यावे. भौतिक विकासाचे सर्व पैलू – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, सामाजिक बदल, पायाभूत सुविधा, शेती, औद्योगिकीकरण, संगणक क्रांती, प्रशासन व्यवस्थेतील बदल – हे सर्व सुलभ स्वरूपात तरी या मुलाच्या शिक्षणप्रक्रियेत असावेत.
भूगोलात, हवामानव्यवस्थेतील सूक्ष्म प्रक्रिया, भूशास्त्र, महासागर, यांचा अभ्यास ही मुले करत असतात. हे शिकताना आधीच्या इयत्तांमधील मूलभूत संकल्पनांचा उपयोग होतो. भूगोलाचे व्यापार, अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, प्रवास, दळणवळण आणि संपर्काची साधने यांच्याशी असलेले संबंध प्राथमिक स्वरूपात अभ्यासले जातात. नकाशावाचन, नकाशांचे नवीन वेगवगळे प्रकार समजून घेणे, नकाशे काढणे, ही कौशल्ये नववीतील मुले जोपासू शकतात.
भौतिकशास्त्रात अनेक नवीन संकल्पनांची त्यांना ओळख होते: यांत्रिकी, विद्युत, प्रकाश, उष्णता, व यांच्याशी संबंधित नियम व समीकरणे. रसायनशास्त्रात रासायनिक समीकरणे, पदार्थांचे रासायनिक गुणधर्म, हे अभ्यासले जातात. माहिती तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशी नवीन दालनेही मुलांसाठी खुली होतात.
निसर्गविज्ञानात नवीन पारिस्थितीकीय संकल्पनांचा अभ्यास आता होऊ शकतो. उदा. द्रव्य व ऊर्जा यांचे प्रवाह. सूक्ष्मजीव, उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या संकल्पना, अनुकूलन, वर्गीकरण, आणि प्राण्यांच्या प्रमुख वर्गांची जीवनचक्रे.
नववीतील मुलांच्या निसर्गशिक्षणासाठी
इतर विषयांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या वरील संकल्पना निसर्गाशी जोडून आपण एक सर्वंकष दृष्टिकोन नववीतील मुलास देऊ शकतो. त्यांचे वैचारिक क्षितिज वाढेल असा प्रयत्न करू शकतो. उदा.:
-
इतिहास व समाजशास्त्र यातील अनेक विषयघटक हे निसर्ग-माणूस संबंधाच्या इतिहासाशी जोडले जावेत (आपल्या देशाच्या परिप्रेक्ष्यात). त्यानंतर निसर्ग-माणूस संबंधांवर आधुनिक विकास, औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा, यांचा काय परिणाम होत आहे याची चर्चा होऊ शकते. जमीनवापर या सर्वामुळे कसा बदलत आहे तेही बघितले जावे. आधुनिक विकासाची गती आणि निसर्गातील बदलांची गती याची तुलना व्हावी. निसर्गाचा विध्वंस नक्की कसा होत आहे ते समजून यावे.
-
नववीत अर्थशास्त्राची औपचारिक ओळख होत असते. सद्य अर्थशास्त्रातील चुकीची गृहीतके व तर्कशास्त्र कसे काम करते हे त्यांना समजून घेता यावे. (उदा. “माणसाच्या गरजा अनंत व विविध आहेत”). आधुनिक अर्थशास्त्राची नक्की कोणाला व कशी मदत होते आहे याची चर्चा व्हावी.
-
उपजीविकांचा अभ्यास करण्यासाठी हे चांगले वर्ष आहे. अनेक वेगवेगळे व्यवसाय आणि त्यातून होणारे उत्पन्न याचा अभ्यास व तुलना व्हावी. निसर्ग-केंद्री, सम्यक तंत्रज्ञानावर आधारलेले व्यवसाय कुठले, त्यांतून उपजीविका करीत येईल का याची माहिती मिळावी. आधुनिक ज्ञानाधारित समाजव्यवस्थेत जे व्यवसाय आहेत त्यांच्याशी वरील व्यवसायांची तुलना व्हावी. भांडवल व उच्च तंत्रज्ञान यांची भूमिका कळावी.
-
औद्योगिकीकरण व माहिती तंत्रज्ञानातील क्रांती यांचा खालील गोष्टींवर होणारा विविधांगी, खोल परिणाम समजून यावा: आपला समाज, मानवी संबंध, उपभोग, कचरा, प्रदूषण, विषमता. याबाबत गटांमध्ये चर्चा व्हावी.
-
‘शहरीकरण’ या विषयाची ओळखही यावर्षी करून देता येईल – त्याची कारणे, परिणाम, शहरी-ग्रामीण असमानता.
-
वरील शिक्षण अनुभवाने समृद्ध होण्यासाठी, नववीतील मुलांनी अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष भाग घ्यावा, रोजगार मिळवावा. व्यावसायिकांच्या मुलाखती घ्याव्या. साध्या पण उपयोगी वस्तू किंवा सेवा विकायचा प्रयत्न करावा, छोटा उद्योजक व्हावे. अशा उपक्रमातून निसर्ग-समाज-अर्थव्यवस्था यांतील संबंध प्रत्यक्ष समजून येण्यास मदत होईल.