इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: आठवीतले मूल
योगेश पाठक
किशोरावस्था ही रोमांचक असते. या वर्षांमध्ये मुलांचे व्यक्तिमत्व एखाद्या कळीचे फूल होते तसे उमलते, पण त्याबरोबरच या वर्षांमध्ये मुलं ताण, गोंधळ, आणि अनिश्चितताही अनुभवतात.
त्यांची शारीरिक वाढ होत असते. ती स्वतःचेच निरीक्षण करत असतात. आपल्या आणि मित्रांच्या वाढीकडे त्यांचे लक्ष वेधले जाते. बहुतेक मुली आता पौगंडावस्थेत असतात आणि त्यांची उंची वेगाने वाढत असते. मुलगेही त्यांच्या एखादे वर्षच मागे असतात. मुलगे आणि मुली, दोघांनाही त्यांच्या शरीराबद्दल काहीशी लाज वाटू शकते, किंवा स्वप्रतिमेबद्दल ते थोडे बेचैन असू शकतात. त्यांना मधूनमधून स्वतःला आरशात न्याहाळायला आवडतं.
स्वतःच्या दिसण्याबद्दल बेचैनी, मनोवस्थेतील चढाव-उतार, खाजगीपणा जपण्याची इच्छा, इतरांशी कळत-नकळत तुलना करत असणे, इतरांची दादागिरी सहन करणे, इंटरनेट व मोबाईल फोनसारखी प्रलोभने, या सर्व गोष्टींमुळे मुलांचे किशोरावस्थेतील आगमन काहीसे गुंतागुंतीचे होत असते.
त्यांच्यातील अनेकजण या वयात अजून शारीरिक साहसे किंवा धडपड करायला उत्सुक असतात. उदा. मैदानी खेळ, सायकलिंग, गिर्यारोहण. अशातच काहींची बौद्धिक प्रगती थोडीशी मंदावत चालल्याचेही आढळते. शरीरातील संप्रेरकांमुळे येऊ घातलेले बदल, भावनिक उतारचढाव, शारीरिक वाढ या सर्वांमुळेही औपचारिक शालेय शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते.
पण त्याच वेळेस शाळेचा अभ्यासक्रम मात्र वाढत असतो. अनेक वेगवेगळ्या संकल्पनांचे एकत्रीकरण, विषयांमधील वाढत चालली काठिण्यपातळी, शिक्षणातील औपचारिकपणा, वाढलेल्या अपेक्षा, आणि एकंदरीत रुंदावत जाण्याऱ्या ज्ञानकक्षा, या सर्व गोष्टींचा ते अनुभव घेत असतात.
उदा. भाषा शिक्षणात ते साहित्याचा रसास्वाद, पुस्तक परीक्षण, कथालेखन, निबंधलेखन, नाट्यलेखन, घटनाक्रमाचे वर्णन करणे, प्रक्रिया लिहिणे, असे उपक्रम करतात. या सर्वात त्यांच्या वैयक्तिक विचारपद्धतीचे/शैलीचे प्रतिबिंब पडलेले असते.
गणितात अनेक अमूर्त संकल्पना, उदा. संच, घातांक, श्रेणी व सरासरी, भूमिती, बीजगणित, सांख्यिकी, हे सर्वच आता अभ्यासक्रमात आलेले असते.
इतिहासात त्यांना राष्ट्राच्या प्रवासातील एखादा दीर्घ कालखंड खोलवर अभ्यासण्याची संधी मिळते. उदा. भारताच्या बाबतीत ब्रिटिशकालीन पारतंत्र्य, अनेक राज्यांचे/संस्थानाचे एकत्र येऊन राष्ट्र तयार होणे, औद्योगिकरणाची सुरुवात, इत्यादी.
भौतिकशास्त्रात त्यांना न्यूटनच्या नियमांवर आधारित तांत्रिकी, विद्युत, चुंबकत्व, अणूची रचना, आणि रसायनशात्राचा पाया, हे सर्व शिकायचे असते. भौतिक आणि जीवशास्त्रातही देकार्तीय, reductionist पद्धतीने शिकणे चालू राहते. वनस्पती आणि प्राणी ह्यांच्या शरीर रचनेतील वेगवेगळ्या प्रणाली/संस्था अभ्यासल्या जातात.
आठवीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी
आधीच्या इयत्तांमध्ये सांगितलेले संकल्पनांचे एकत्रीकरण व त्या सूत्रांमध्ये बांधणे आठवीतही चालू रहावे. उदा.
-
भूगोलातील ३ मुख्य संकल्पना – हवामान, भूशास्त्र, आणि समुद्र – यांचा अभ्यास आत्तापर्यंत नीट झाला नसेल तर तो यावर्षी सुरु व्हावा. या तिघांमधील आंतरसंबंधांची प्राथमिक ओळख व्हावी. यांचा आपल्या ग्रहावरील जैविक घटकांशी काय संबंध आहे (आत्ता व पूर्वी) याकडे लक्ष वेधले जावे.
-
एखाद्या प्रदेशातील जमिनीचा वापर अभ्यासणे, नकाशावाचन करणे या कौशल्यांचा वापर करून, मूळ नैसर्गिक भूचित्र व त्यात मानवाने केलेले वेगवेगळे फेरफार, हे स्थित्यंतर समजून घ्यावे.
-
एखादा ऐतिहासिक कालखंड बघताना त्यात तेव्हाची नैसर्गिक भूचित्रे व प्रदेश, नैसर्गिक संसाधनांचे शोषण आणि दोहन, जमीनवापरातील बदल (उदा. शेतीमुळे), औद्योगिकरणामुळे समाज/संस्कृतीवर होणारा परिणाम, या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास व्हावा.
-
यावर्षी पुन्हा एकदा परिसंस्था व जैवविविधता यांचा जास्त खोलवर अभ्यास होऊ शकतो. पारिस्थितिकीमधील मुख्य संकल्पना जास्त सविस्तरपणे मांडता येतील. त्यांचे उपयोजन करता येईल.
-
प्राणी आणि वनस्पतींच्या शरीरामधील वेगवेगळ्या प्रणाली, उदा. पेशी, इंद्रिये, शरीरसंस्था यांचा संबंध जीवांचा इतिहास व उत्क्रांती यांच्याशी जोडला जावा.
-
यावर्षी मानवी लोकसंख्येचा प्राथमिक अभ्यास सुरु होऊ शकतो. शालेय अभ्यासक्रमात जेव्हा आपण लोकसंख्येबद्दल बोलतो, तेव्हा लोकसंख्येची वाढ, जनगणना, जन्म व मृत्यूदर, साक्षरतेचे प्रमाण, लोकसंख्येतील स्त्री:पुरुष गुणोत्तर अशा संकल्पनांची चर्चा होते. शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून खालील मुद्देही अभ्यासले जावेत: वाढणाऱ्या लोकसंख्येचा पर्यावरण/परिसंस्था/जैवविविधता यांच्यावर होणारा परिणाम, मानवी उपभोग आणि त्यांचे तंत्रज्ञानावर असलेले अवलंबित्व जेव्हा वाढत जाते तेव्हा निर्माण होणारी पर्यावरणीय आव्हाने.