इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: सातवीतले मूल
योगेश पाठक
वय वर्षे ९ ते १२ या वयात ‘स्वतंत्र’ व्हायची जी धडपड मुलांमध्ये चालू असते, ती पूर्णत्वास जाते सातवीत. पालकांवरचे अवलंबित्व बऱ्याच प्रमाणात कमी होऊन ती आता आपल्या पालकांकडे फक्त वेगवेगळ्या गोष्टींसाठी परवानगी मागण्यासाठी येतात.
या वयात त्यांचे खेळांचे वेड वाढते, त्यांची शारीरिक वाढ आता जास्त वेगाने होत असते, आणि त्यांच्यातली काही पौगंडावस्थेकडे झुकत असतात.
आधीच्या वर्षांमध्ये आकाराने वाढत असणाऱ्या त्यांच्या मेंदूचे आकारमान आता स्थिर होत आलेले असते. पण नवीन विषय, आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटना, आणि शिक्षणात येणारी वेगवेगळी प्रारूपे, यामुळे मेंदूत नवीन जोडण्या प्रत्यही होत असतात, तो समृद्ध होत असतो. कार्यकारणभाव, वस्तुनिष्ठ विश्लेषण, वादविवाद यात ही मुलं हळूहळू तयार होत असतात. त्यांच्या शिक्षणविषयांत याचे प्रतिबिंब पडलेले दिसते.
संगणक, मोबाईल, व्हिडीओ गेम्स, असे तंत्रज्ञानाधारीत छंद, किंवा यंत्रे उघडणे, समजावून घेणे, नवीन यंत्रसदृश वस्तू बनविणे, या गोष्टीही साधारण या वयातच सुरु होतात.
ही मुलं संवेदनशीलसुद्धा असतात. ती आपल्या आजूबाजूच्या समाजास समजून घेण्यास, काहीतरी योगदान देण्यास उत्सुक असतात (त्यांना तशा संधी मिळायला हव्यात). ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, मानवी हक्क, हे विषय उत्साहाने शिकतात, प्रश्न विचारतात.
सातवीतल्या मुलांमध्ये, काटेकोरपणा, टापटीप, पुढाकार घेण्याची आवड, वेगवेगळ्या संकल्पनांची जोडणी करता येणे, नवीन प्रश्न विचारणे, आपल्या कल्पना/विचार हे बहुशाखीय प्रकल्पातून व्यक्त करणे, शेकडो पानांची मोठी पुस्तके वाचण्याची क्षमता, असे अनेक गुण वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. याला आपण ‘पौगंडावस्थेआधीची प्रगल्भता’ असे म्हणू शकू. अनुभवी शिक्षकांना या टप्प्यावरची ही प्रगल्भता समजून येत असते, त्याला ते योग्य तो आकार देत असतात.
विज्ञानात त्यांचा शालेय अभ्यासक्रम आता वाढू लागलेला असतो. पण विज्ञान बहुशः देकार्तीय ‘रिडक्शनिस्ट’ पद्धतीनेच मांडले जात असते. माहितीवर भर असतो. उदा. प्राणी आणि वनस्पतींचे वर्गीकरण. या पातळीवर अन्नग्रहण, पचन, पोषण, वेगवेगळ्या प्रजातींची जीवनचक्रे, निसर्गातील द्रव्यांची वेगवेगळी चक्रे हेसुद्धा अभ्यासले जात असते.
इतिहासात एका विशिष्ट कालखंडाचा थोडा खोलवर अभ्यास ही मुलं करत असतात, पण मुख्यतः सामाजिक-राजकीय दृष्टिकोनातून. राज्यशास्त्रात त्यांना देशाची घटना, नागरिकांचे हक्क व जबाबदाऱ्या यांची ओळख होत असते.
भूगोलात या पातळीवर मुलं अनेक महत्वाच्या संकल्पना अभ्यासत असतात – हवामान, भूशास्त्र, नैसर्गिक संसाधने, पृथ्वीवरील मानवी जीवन, इत्यादी.
सातवीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी
निसर्ग शिक्षणासाठी जो सर्वसमावेशक दृष्टिकोन आधीच्या इयत्तांमध्ये सुरु झाला होता, तो सातवीतही सुरु रहावा. सातवीसाठी काही विशेष घटक हे असू शकतात:
-
यावर्षी निसर्गाचा इतिहास पुन्हा एकदा अभ्यासला जावा, विशेषतः पृथ्वीची जडणघडण आणि पृथ्वीवरील सुरुवातीचे जीवन.
-
यावर्षी वातावरण, वारे आणि त्यांचा महासागर व जमीन यांच्याशी अन्योन्यसंबंध, या सर्वांचे महत्व हेही शिकता येईल.
-
उत्क्रांतीशास्त्र, उत्क्रांतीचे वेगवेगळे पुरावे उदा. अनुकूलन, यांचा पुन्हा अभ्यास.
-
पृथ्वीवरील महत्वाच्या परिसंस्था, जैवभोगौलिक प्रदेश, प्रादेशिक जैवविविधता. या सर्वांचा मानवी जीवन व संसाधनांचा वापर यांच्याशी संबंध. जैवभोगौलिक प्रदेशांमध्ये ऋतूनुसार होणारे बदल व त्यांचा मानवी व्यवहारावरील परिणाम.
-
सजीव सृष्टीचे औपचारिकरीत्या वर्गीकरण (आधीपेक्षा थोडे जास्त सविस्तर), स्थानिक प्रजाती, त्यानंतर जिल्ह्यातील/राज्यातील/देशातील प्रजाती, परिसंस्थेनुसार प्रजाती. शास्त्रीय वर्गीकरणाचे फायदे.
-
पाणी आणि माती यांचा शास्त्रीय अभ्यास. उदा. पाण्याचे विशेष गुणधर्म, पाण्याला निसर्ग इतिहासात असलेले महत्व.
-
मूलद्रव्यांची निसर्गातील चक्रे – परिसंस्था व अन्नसाखळ्या यांच्या संदर्भातही.
-
सूक्ष्मजीवशास्त्राची औपचारिक ओळख सुरु व्हावी. परिसंस्था व अन्नसाखळ्या यांच्या संदर्भात सूक्ष्मजीवांकडे कसे बघायचे ते मुलांना समजावे. प्राणी-सूक्ष्मजीव, वनस्पती-सूक्ष्मजीव, माणूस-सूक्ष्मजीव, ह्या आंतरसंबंधांची ओळख व्हावी. माणसांचा परिसंस्थांमधील हस्तक्षेप व सूक्ष्मजीवांचा त्याच्याशी संबंध याची चर्चा व्हावी.
-
अन्नसंकलक, शेतकरी, धनगर, औद्योगिक मानव या सर्व अवस्थांमध्ये नैसर्गिक संसाधने कशी वापरली जातात यावर चर्चा व्हावी. संसाधनाचा वेगाने/अतिवापर केला तर अजैविक व जैविक घटक कसे विनाश पावतात हे समजून घ्यावे.
-
इतिहासात एखाद्या प्रदेश व कालखंडाचा जो सामाजिक-राजकीय अभ्यास चालला आहे त्याच्या कक्षा वाढवून त्यात त्या परिसराचा पारिस्थितिकीय इतिहास, संसाधनांचा वापर/अतिवापर, त्याचा राजकीय/सामाजिक संघर्षाशी संबंध, अशा विश्लेषणाचीही ओळख व्हावी. सामाजिक इतिहास उदा. वेगवेगळे व्यवसाय, किंवा शेतीच्या उत्पन्नाचे वितरण, हे सर्व त्या-त्या काळातील आर्थिक व्यवस्थेशी आणि जैवविविधतेशी जोडता येतात.
-
जेव्हा आपण देशाची घटना, तिचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध, याबद्दल बोलतो तेव्हाही निसर्ग इतिहासाचा, निसर्ग माणूस संबंधांचा, नैसर्गिक संसाधनाच्या वापराचाही उल्लेख हवा. कारण या सर्व गोष्टी चांगला नागरिक होण्याशी संबंधित आहेतच. घटनेत निसर्ग रक्षणाला स्थान आहे का, त्याची अंमलबजावणी होते का यावर प्राथमिक चर्चा व्हावी.
-
वरील सर्व अभ्यासघटक स्थानिक परिसंस्था, स्थानिक जीवन यांच्याशी जोडले जावेत. राष्ट्र व जग यातील योग्य ती उदाहरणेही द्यावीत.
अभ्यास घटकांची एवढी मोठी यादी वाचून असे वाटू शकेल कि १२ वर्षाच्या मुलांना हे सर्व झेपेल का? या वर्षी अशा घटकांची प्राथमिक स्वरूपात ओळख करून देता येईल. नंतरच्या इयत्तांत हेच विषय जास्त सविस्तरपणे हाताळता येतील.