top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: सहावीतले मूल 

​योगेश पाठक 

स्वतःची आणि समाजाची नव्याने ओळख होण्याची प्रक्रिया, जी अकराव्या वर्षाच्या आधीच चालू झालेली असते, ती आता थोडी भरात आलेली असते.  या वयातल्या मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित होऊ लागले असते. तरीही, ती बऱ्याच बाबतीत आपल्या पालकांवर अवलंबून असतात. मित्र-मैत्रिणींशी मैत्री आता अजून घट्ट होऊ लागली असते. विशेषतः त्यांचे खास मित्र-मैत्रिणींचे गट होत असतात. 

बौद्धिकदृष्ट्या, या वयाच्या मुलांना आपण घटना-संकल्पना-संस्था-प्रणाली या सगळ्यांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने, पूर्वग्रह न बाळगता पहायला प्रोत्साहन द्यायला हवे. ती अभ्यासविषयात आता अजून थोडी जास्त जटिलता हाताळू शकतात. पुर्वीपेक्षा जास्त माहितीचे ग्रहण करू शकतात. 

याचे एक उदाहरण म्हणजे इतिहासाचा अभ्यास. सहावीतली मुलं ‘संस्कृती’ ही संकल्पना समजू शकतात, इतिहासातील एखाद्या संस्कृतीचे उदयास येणे, भरास येणे, व लय पावणे हा प्रवास समजून घेऊ शकतात. त्या संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये सांगू शकतात. ही मुलं अनेक संस्कृतींचा प्राथमिक अभ्यास करू शकतात. त्यांचे इतिहासातील स्थान समजून घेऊ शकतात. इतिहास संशोधनाची प्रक्रिया, पद्धती, व तंत्रे (उदा. पुराणवस्तू अवशेष शोधणे) हेसुद्धा ती समजू शकतात. 

भूगोलात, ती आपल्या मापन व विश्लेषण क्षमतांचा वापर करून पृथ्वी, तिचे हवामान, खंड, भूशास्त्र, आणि समुद्र यांची जास्त नेमकी माहिती करून घेऊ शकतात. ‘पृथ्वी’ या गुंतागुंतीच्या, जटिल महा-संस्थेतील अनेक सुटे भाग, अनेक भौगोलिक व हवामानशास्त्रीय संकल्पना आता मुलांना प्राथमिक स्वरूपात सांगता येतात.  

भौतिकशास्त्रात मुलांना यांत्रिकीतील मूलभूत संकल्पना, ऊर्जा व द्रव्य यांची वेगवेगळी रूपे, त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास या वर्षी करायचा असतो. जीवशास्त्रात सजीवसृष्टीचे वर्गीकरण हा एक मुख्य विषय असतो. 

सहावीतील  मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी

सहावीतील मुलास वस्तुनिष्ठ दृष्टिकोन तयार करणे, माहितीचे विश्लेषण करणे, आणि अनेक संकल्पना समजून घेणे यासाठी प्रोत्साहन दिलं जात असतं. ही सर्व प्रक्रिया किंवा संकल्पनांचे जाळे एक नवीन शैक्षणिक पाया (किंवा पायावरील नवीन थर) तयार करीत असते. पण यात एक काळजी आहे ती अशी की, या सर्व संकल्पना जर चांगल्या सूत्रांमध्ये बांधल्या नाहीत, बांधता आल्या नाहीत तर हे सर्व ‘शिक्षण’ कोरडे व परीक्षार्थी होत जाते. 

पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टीकोन समजलेले निसर्गशिक्षक इथे संकल्पनांची सुयोग्य अशी गुंफण करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. 

  • ऊर्जा, तिचे नैसर्गिक आणि मानव-केंद्री प्रकार, ऊर्जेचे रूपांतर, माणसाने नैसर्गिक ऊर्जेचा वेगवेगळ्या काळात कसा वापर करून घेतला, त्याचे परिणाम व दुष्परिणाम (मानवावर व निसर्गावर), त्यामुळे होणारे जमीनवापरातील बदल व प्रदूषण, हे एक सूत्र. या पायामुळे पुढील शिक्षणात ऊर्जेबद्दल सर्वंकष विचार, चर्चा, व कृती करणे शक्य होईल. 

  • द्रव्य, त्याचे निसर्गातील आणि मानवनिर्मित जगातील विविध प्रकार, आपल्या फायद्यासाठी मानवाने निसर्गातील द्रव्य कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने मिळविले, वापरले, व त्याचे निसर्गावर काय दुष्परिणाम झाले. उदा. जमीनवापरातील बदल, कचरा, ऊर्जासघन जीवनसाहिली व उद्योग, हे अजून एक सूत्र. 

  • जल आणि जमीन ह्या नैसर्गिक संसाधनांवर मानवाप्रमाणेच इतर प्रजाती व परिसंस्था यांचाही हक्क आहे. त्यांचे शोषण हे निसर्गाच्या पुनर्भरण करण्याच्या प्रक्रियेस धक्का पोहोचविते. 

  • शेती हेसुद्धा एक महत्वाचे सूत्र होऊ शकते. त्यादृष्टीने यावर्षी शेतीचा प्राथमिक पण सर्वंकष अभ्यास व्हावा: स्थानिक, राष्ट्रीय, व जागतिक पातळीवरील शेतीचा इतिहास, स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील शेतीच्या पद्धती व त्यांचे गुणदोष (विशेषतः निसर्गाच्या दृष्टिकोनातून), शेतीचा मानवी समाज, संस्कृती, राजकारण, अर्थकारण, यांच्याशी संबंध, आणि निसर्गस्नेही शेती. 

  • मानवी समाजातील वेगवेगळे व्यवसाय हेही एक सूत्र असू शकतं. त्यांचा निसर्ग आणि परिसंस्था यांच्याशी संबंध तपासला जावा. 

  • प्राचीन संस्कृतींचा विलय, त्याचा पर्यावरणीय ऱ्हासाशी संबंध, याची ओळख.  

  • परिसंस्थांचे आरोग्य हेही एक महत्वाचे सूत्र. यात तर वरील अनेक संकल्पना बांधता येतील. 

  • या वर्गात जैवविविधतेचा अभ्यास, सजीवांचे वर्गीकरण, आणि निसर्गातील निरीक्षणांची नोंद ठेवणे, हे सर्व जास्त औपचारिकपणे सुरु करता येईल. 

 

तसेच या इयत्तेत क्षेत्रभेटी, कृती, पद्धतशीरपणे करणे यावर जास्त भर असावा. निसर्गातील नोंदी, प्रजातींचे निरीक्षण व वर्गीकरण, निसर्गातील पदार्थ व ऊर्जा यांचा मानवाकडून केल्या जाणाऱ्या वापराच्या नोंदी, हे सर्व सुरु व्हावे. 

सहावीच्या पातळीवर संकल्पनांची सुसूत्र बांधणी, भरपूर क्षेत्रभेटी आणि निसर्ग निरीक्षण झाल्यास वरच्या इयत्तांमध्ये जेव्हा याच मुद्द्यांची उजळणी होईल तेव्हा मुलांना फायदा होईल. 

bottom of page