top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: पाचवीतले मूल 

​योगेश पाठक 

दहा वर्षाच्या मुलांना स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या समाजाबद्दल नव्याने जाणीव होत असते.

बौद्धिकदृष्ट्या ही मुलं एखादा पाठ किंवा आकलनाचा विषय दिल्यास त्यातील मुख्य संकल्पना समजू शकतात, ती व्यक्त करू शकतात. एखाद्या विषयावरील आपली मतं किंवा विचार स्पष्टपणे मांडणारा निबंध ते लिहू शकतात. गणितात, ती शाब्दिक गणितं सोडवू शकतात आणि मापनाच्या एककांचे रूपांतर आणि हिशोब करू शकतात. ती अपूर्णांक, मापनश्रेणी, आलेख, आणि भूमितीतील काही संकल्पना समजू आणि वापरू शकतात. 

 

शारीरिकदृष्ट्या त्यांची ताकद वाढलेली असते. स्वनियंत्रण, सुसूत्रता, आणि समतोलही आधीच्या इयत्तेपेक्षा वाढलेला असतो. बऱ्याच मुलांना या वयात कुठलाना कुठला खेळ खूप आवडायला लागला असतो. काहींच्या बाबतीत खेळाऐवजी अजून कुठलंतरी नैपुण्य असेल. उदा. कला, छंद, किंवा विज्ञान/गणितातील विशेष बौद्धिक क्षमता. इथे विज्ञान हा शब्दही व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. उदा. घरातील वेगवेगळ्या वस्तू-प्रक्रिया यातील विज्ञानासंबंधीचे कुतूहल, प्रत्येक यंत्र कसे काम करते याचे कुतूहल, भौतिक, रसायन, अवकाशशास्त्र, भूशास्त्र, निसर्गविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, किंवा इतर कुठली शाखा. 

 

स्टॅम्प, नाणी, रंगीत दगड, क्रिकेटपटूंचे फोटो गोळा करणे, किंवा इतर काहीतरी गोळा करणे हे छंद या वयातच बहरतात. हे सर्व ‘स्व’ च्या बदलत्या, नवीन प्रतिमेमुळे असते: माझ्या आवडत्या गोष्टी, नावडत्या गोष्टी, शरीरातील नवीन ताकद, नवीन क्षमता, हे सर्व यात येते. मुलं शाळेतील आणि परिसरातील गटांमध्ये या आवडीनिवडीनुसार जोडली जात असतात. त्यांना प्रत्येक दिवशी त्या गटांमध्ये सामील व्हायचे असते. 

 

पाचवीतील  मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी

 

या वयात मुलांना विज्ञान-शाखांची अतिशय प्राथमिक पण औपचारिक ओळख होत असते. उदा. भूशास्त्र, अवकाशशास्त्र, कदाचित पारिस्थितिकीसुद्धा.  त्यांना या टप्प्यावर समजलं पाहिजे की, पृथ्वी हा विश्वातील एक विशेष ग्रह आहे, कारण इथे जीवन आहे. जीवनाला निरंतर जगता येईल अशी विशेष परिस्थिती इथे आहे. ज्यांच्यावर जीवन आहे असे इतर ग्रह अजूनही सापडलेले नाहीत. 

 

जीवावरण, जैवभौगोलिक प्रदेश, भूचित्र, परिसंस्था, आणि अधिवास या महत्वाच्या संकल्पना आता प्राथमिकरीत्या समजून घेता येतील. अन्नसाखळी, अन्नजाळे, हवामानाचा परिसंस्थेवरील  परिणाम, सामायिक नैसर्गिक संसाधने प्रजाती कशा वाटून घेतात, आणि मानवी व्यवहारांचा या सगळ्यावर काय परिणाम होतो तेही प्राथमिकरीत्या अभ्यासायला हवे. 


हवा, पाणी, अन्न, वस्त्र, आणि निवारा, या पाच मूलभूत गरजांच्या अंगाने आपण निसर्ग-माणूस संबंधांचा शोध घेऊ शकतो. मानवप्राण्याने भूतकाळात या गरजा कशा भागवल्या?  आज त्या गरजा  कशा भागवल्या जातात? याची चर्चा व तुलना या इयत्तेत प्राथमिकरीत्या सुरु करता येईल. माणसाने निर्माण केलेल्या वेगवेळ्या संस्था-प्रक्रिया-पद्धती, वेगवेगळी गुंतांगुंतीची जाळी समजून घ्यायला हवीत (उदा.: पाणीपुरवठा किंवा वाहतूक). ही मोठाली जाळी चालू राहावी म्हणून कुठल्या औद्योगिक प्रक्रिया सदैव सुरु असतात याचा बोध व्हावा. या प्रक्रियांतून किती द्रव्य, किती ऊर्जा प्रवास करते, किती वाया जाते, कचरा वा प्रदूषण नक्की कसे होते हे समजून यावे. आणि हे सर्व होत  असताना, माणसा-माणसामध्ये तरी संसाधनांच्या उपलब्धतेची  समानता आहे का, यावर बोट ठेवले जावे. 

 

या पातळीवर मुले आपले राष्ट्र व  त्याची नैसर्गिक संसाधने हेही थोडेफार समजून घेऊ शकतात. राष्ट्रातील नैसर्गिक परिसंस्थांची विविधता (उदा.  नद्या, वने, वाळवंटे, पर्वत) आणि संसाधनांची विविधता ही चांगल्या नकाशांच्या आधारे दाखविता येईल. प्रत्येक परिसंस्थेत वैशिष्ट्यपूर्ण अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती आणि परिसंस्थेचे स्थानिक स्वरूप हे दर्शविता येईल. उदा. अन्नाच्या बाबतीत स्थानिक बियाणांची विविधता आणि त्यांचा स्थानिक भूगोल व हवामानाशी संबंध जोडता येईल. 

 

आता मुलांना सद्य मानवी संस्कृतीबद्दल थोडी समज आलेली असते. याचे उपयोजन करून आजच्या पर्यावरणीय समस्यांची त्यांना ओळख करून देता येईल. उदा. कचरा, प्रदूषण, जमीन वापरातील  वेगाने होणारे बदल, प्राण्यांच्या अधिवासांची होणारी क्षिती, प्रजातींचा निर्वंश, जागतिक तापमानवाढ व हवामानबदल, इत्यादी. 

 

तिसरीच्या वर्गात सांगितलेल्या दोन गोष्टी – उत्क्रांतीची गोष्ट आणि निसर्ग-माणूस संबंधांची गोष्ट – या पुन्हा सांगितल्या तरी चालतील. त्यात जास्त सविस्तर माहिती आता देता येईल. त्यांचा वरील मुद्द्यांशी संबंध जोडता येईल.

bottom of page