top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : मूल समजून घेताना: चौथीतले मूल

​योगेश पाठक 

नऊ वर्षाचे मूल हळूहळू स्वतंत्र होत असते आणि स्वतःचा दिनक्रम स्वतः ठरवू शकत असते. उदा. मित्र-मैत्रिणीकडे रात्री झोपायला जायचे किंवा कुठल्यातरी शिबिराला जायचे बेत याच वयात ठरतात. ही मुलं शाळा आणि घराजवळच्या सामाजिक गटात आपले स्थान शोधू पहात असतात. त्यांना अगदी जवळचे एक-दोन मित्र किंवा मैत्रिणी असू शकतात. तरीही, ते आपल्या पालकांवर अनके गोष्टींसाठी अवलंबून असतात. 

बालकथा-परीकथांमधल्या रम्य काल्पनिक जगामधून ती थोडी बाहेर येत असतात. वास्तव जग आणि त्यातील घटनांचा जास्त थेट आणि संवेदनशीलतेने अनुभव घेत असतात. त्यांना संकटे, युद्धे, मृत्यू अशा गोष्टींबद्दल प्रश्नही पडत असतात. 

शारीरिकदृष्ट्या काही जणांची वाढ वेगाने होत असते आणि काही जण पौगंडावस्थेकडे झुकत असतात. त्यांचे स्नायू जास्त सशक्त होत असतात आणि त्यांना आपल्या शरीराची ओळख होऊ लागली असते. या वयात स्वच्छ राहणे, नखे-केस नियमितपणे कापणे, आरोग्याच्या सवयी इत्यादीवर भर दिला जातो. 

बौद्धिकदृष्ट्या, मुलं आता जास्त जटील विषय हाताळू शकतात. ती शिकविण्याकडे जास्त लक्ष देऊन आणि जास्त वेळ ऐकू शकतात. वर्गाभ्यास व स्वाध्याय यात जास्त वेळ लिखाणकाम करू शकतात. आठ वर्षाच्या मुलांपेक्षा त्यांची ज्ञानग्रहणक्षमता, विचारक्षमता जास्त असते. वस्तूंच्या किंवा संकल्पनांच्या गटांतील साम्य आणि फरक ती व्यवस्थित सांगू शकतात. प्रयोगाची आखणी करणे, निरीक्षणे करणे व लिहिणे, तर्क चालविणे आणि निष्कर्ष काढणे हे सर्व ती आता करू शकतात. ती शास्त्रीय आकृत्याही काढू शकतात. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची जोडणी करून घटनांचा क्रम, एखाद्या कालखंडात होत गेलेले बदल आणि कल ही मुलं सांगू शकतात.  

चौथीतली मुलं नकाशे नीट वाचू शकतात आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांना आपण बागकामात आधीपासून सामील करून घेतले असेल तर चांगलेच, पण या वयात ती बी पेरणे, झाडे लावणे, तण काढणे, इत्यादी कृती नीट करू शकतात. 

चौथीतील  मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी

निरीक्षण आणि वर्गीकरणाची क्षमता असल्याने या वयाच्या मुलांना निसर्गविज्ञानाची प्राथमिक पण औपचारिक ओळख  करून देता येईल.  विज्ञानाच्या पारंपरिक पाठ्यपुस्तकात देकार्तीय, reductionist परिमाण वापरलेले असते. निसर्गविज्ञानाचा पाया मात्र सर्वंकष दृष्टिकोनावर आधारलेला असावा. हा दृष्टिकोन मुलांपर्यंतही पोचावा. 

सजीव-निर्जीव गोष्टींचे वर्गीकरण करताना माणसाने दोन्हींच्या जीवनचक्रात केलेले फेरफार मुलांना समजायला हवे. उदा. मृदा नैसर्गिक स्वरूपात कशी सावकाश क्षरण पावत असते, व मानव आपल्या कार्यासाठी निसर्गातून मृदेचा कसा वापर करतो – शेती, कुंभारकाम, बांधकाम, इत्यादी. 

उत्क्रांतीबद्दल प्राथमिक ओळख मुलांना आधीच्या  इयत्तांमध्ये झालेली आहे ती वाढवावी. त्या पायावर आधारित अशी वनस्पती व प्राण्यांच्या वर्गीकरणाची प्राथमिक ओळख या वयात  व्हावी. त्यांची शरीर रचना, अवयव समजून यावेत. मानवी शरीर रचना ही त्यात यावीच. यात कृती म्हणून किडे, फुलपाखरे, पक्षी यांचे निरीक्षण व वर्गीकरण करता येईल. याचप्रमाणे पाळीव प्राणी व इतर सजीव यांची निरीक्षणे त्यांचे शरीर व सवयी यांपुरती मर्यादित नसावीत, त्यांचा संबंध परिसंस्था, जीवनचक्र, उत्क्रांती, जैवविविधता, अन्नसाखळ्या, या सर्वांशी जोडला जावा. 

या वयाच्या मुलांना राज्य किंवा राज्यातील काही जिल्हे एवढ्या मोठ्या भूभागाचा एकंदर अवकाश व त्यातील विविधता समजू शकते. म्हणून, आधीप्रमाणेच या भूभागावर नैसर्गिक परिसंस्था – उदा. नद्या, वने, आणि कुरणे – त्यांना काढायला मदत करावी. तसेच यांचा स्थानिक मानवी जीवनाशी संबंध जोडावा. उदा. शेती, अर्थव्यवस्था व उद्योग, निसर्ग-केंद्री व्यवसाय. 

अजून काही संकल्पना या इयत्तेत औपचारिकरित्या सांगता येतील: अन्न व अन्नव्यवस्था, पाणी व पाणीपुरवठा व्यवस्था, कपडे, घरबांधणी, शेती, आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक संसाधने (द्रव्य/ऊर्जा). हे विषय फक्त मानवी फायद्याच्या दृष्टिकोनातून न शिकविता त्यांचा निसर्गाशी संबंध, आणि मानवी उपभोगाचा निसर्गावर होणारा परिणाम हे समजून यावे. 

याचे एक उदाहरण म्हणजे  घरबांधणीसाठी वापरला जाणारा कच्चा माल (उदा. लाकूड, वाळू, सिमेंट, विटा, काच, चुना). हे सर्व कोठून येते, त्यांची निर्मिती प्रक्रिया काय, त्यात ऊर्जा किती वापरली जाते, प्रदूषण किती व कुठे होते, या सर्वाचा निसर्गावर काय परिणाम होतो, याची चर्चा प्राथमिक स्वरूपात केली जावी. काही निसर्गस्नेही पर्याय मुलांच्या लक्षात आणून दिले जावेत, ते बघता-हाताळता यावेत.  

bottom of page