top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : मूल समजून घेताना: तिसरीतले मूल

​योगेश पाठक 

आठ वर्षाच्या मुलांची भाषेची जाण आता अजून वाढलेली असते – वाचन, श्रुतलेखन, संभाषण, अशा सर्व बाबतीत. खरंतर या टप्प्यावर त्यांच्यातल्या अनेकांना वाचनाची गोडी लागते आणि ते लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचा फडशा पाडायला सुरुवात करतात, मग त्या परीकथा असोत की साहसकथा, डिटेक्टिव्ह कथा अथवा कॉमिक्स. योग्य ते मार्गदर्शन व वातावरण मिळाले तर ते घरी किंवा शाळेत दोन किंवा जास्त भाषा सहज समजून घेऊ शकतात आणि बोलू शकतात. 

गणितात आता तीन ते पाच आकडी संख्यांशी ते खेळत असतात, त्यांची बेरीज-वजाबाकी करत असतात. त्यांना घड्याळातली वेळ सांगता येते, भौतिक राशी मोजता येतात (उदा. लांबी-रुंदी किंवा वजन), आणि ते जमा-खर्च ठेवू शकतात. या वयात त्यांची भौमितिक आकार व संबंधित संकल्पना यांच्याशी प्राथमिक ओळख होत असते.  

ही मुलं निसर्गातील घटनांचे निरीक्षण करू शकतात, काही वैज्ञानिक प्रयोग करू शकतात, आणि आपली निरीक्षणे नोंदवू शकतात. संकल्पना, घटना, वस्तू, किंवा वस्तूंचे गट या सर्वांमध्ये ते साम्य-फरक इत्यादी सांगू शकतात. ती प्राथमिक वर्गीकरणही करू शकतात. ती स्वतः सोपे प्रयोग तयार करू शकतात, तर्कबुद्धी लावून निष्कर्ष काढू शकतात. 

शारीरिकदृष्टया त्यांचे आता स्वतःवर जास्त चांगले नियंत्रण आलेले असते. ती आपले लक्ष जास्त चांगले केंद्रीत करू शकतात — मग कृती कुठलीही असो: अभ्यास, खेळ, धावणे, दोरीच्या उड्या मारणे, टेकडी चढणे, वगैरे. अनेक वेगवेगळ्या खेळांची त्यांना आता माहिती असते, त्यांना या सर्व खेळांचे नियम समजून घ्यायला आवडतं, आणि खेळायला तर आवडतंच!

सामाजिकदृष्ट्या त्यांना गटातील कृती आणि खेळ आवडत असतात. अनेकांचा एक ‘आपला’ असा गट तयार होतो आणि या गटात ते वर्गात आणि वर्गाबाहेर मिसळतात. एकमेकांशी सहकार्य आता वाढीस लागते, एकमेकांच्या वस्तू वापरणेही वाढते. गटास दिलेले काम किंवा गटाला आलेली समस्या यावर एकत्र मिळून काम करणे आता जमत असते.   

तिसरीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी  

हे ते वय असतं जेव्हा मुलांना लांबलचक गोष्टी खूप आवडत असतात. त्यांना अभ्यासविषयही गोष्टींच्या स्वरूपात ऐकलेला/वाचलेला आवडेल असे वाटून, इथे दोन गोष्टींची कल्पना मांडत आहे – निसर्गाच्या इतिहासाची गोष्ट, आणि निसर्ग-माणूस संबंधांची गोष्ट. हे विषय गोष्टीरूप करून मुलांना ऐकवता येतील किंवा पुस्तके/कॉमिक्स/व्हिडिओच्या स्वरूपातही पोचविता येतील. 

१. उत्क्रांतीची गोष्ट, जैव विविधतेची गोष्ट: या पृथीवर जीवन सुरु कसं झालं, पूर्वी इथे कुठले जीव होते, आता कुठले जीव आहेत, त्यांच्यात एवढी विविधता कशी आली याची गोष्ट. यात माणसाची उत्क्रांतीही आली. 

२. माणसाचा निसर्गाबरोबर प्रवास कसा सुरु झाला, शेती व त्यावर आधारित संस्कृती कशा सुरु  झाल्या, त्याची गोष्ट. अन्न-संकलक, धनगर, शेतकरी, आणि आजचा औद्योगिक मानव हा प्रवास का आणि कसा झाला त्याची गोष्ट. ‘विकासा’च्या मागे न लागता निसर्गस्नेही जीवनशैली जगणारे समाज अजून आहेत का, त्यांची गोष्ट. 

या वयात मुलांना आपल्या परिसराची भौगोलिक समज आलेली असते. माझा परिसर, माझे गाव/उपनगर/छोटे शहर, कदाचित तालुका/जिल्हा यांच्या भौगोलिक जाणीवा तयार होत असतात. त्यांना आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, नकाशा मनसोक्त पाहता यावा, अभ्यासता यावा. कोऱ्या नकाशात त्यांना निसर्ग-माणूस संबंधांशी निगडित माहिती भरता यावी.  परिसराची भूशास्त्रीय माहिती, हवामान, व्यवसाय, त्यांचा निसर्गाशी संबंध, सामाजिक-सांस्कृतिक माहिती या सर्वांवर नकाशाच्या संदर्भात चर्चा व्हावी. 

ही संधी घेऊन अजून एक करता येईल: नैसर्गिक भूचित्रांच्या (ecological landscapes) सीमा आणि परिसरातील प्रशासकीय विभाग हे एकमेकांशी जुळतात की नाही, निसर्ग नकाशात कसा दाखवावा, याबद्दल बोलावे. इथे ‘परिसंस्था’ या संकल्पनेची प्राथमिक ओळख करून देणे क्रमप्राप्त आहे. नैसर्गिक परिसंस्थांनाही एक इतिहास असतो, उदा. नदी प्राचीन आहे, मानवी वसाहती नदीच्या किनाऱ्याने होत गेल्या, हे सांगता येईल. 

थोडक्यात, या वयात मुलांना खालील संकल्पनांची प्राथमिक पण औपचारिक ओळख करून देता येईल: निसर्गाचा इतिहास, निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास, मानवी संस्कृती आणि तिचा निसर्गाशी संबंध (उदा. वने, कुरणे, पाणी, जमीन), आणि हे सर्व नकाशात पाहणे-दाखविता येणे. 

हे मुद्दे गोष्टीरूपात, मुलांना कंटाळा न येता वाचायला-ऐकायला आवडेल अशा स्वरूपात, शक्य तेवढे अनुभविक शिक्षणातून देणे योग्य. 

 

bottom of page