top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : मूल समजून घेताना: दुसरीतले मूल

​योगेश पाठक 

सात वर्षे वयाच्या मुलांच्या बौद्धिक क्षमता साधारणतः अशा असतात : 

  • त्यांना भाषेची जास्त जाण आलेली असते: ती संयुक्त, मिश्र वाक्ये बनवू शकतात आणि समजू शकतात, ते एकमेकांना विनोद सांगतात आणि विनोदी चुटके समजू शकतात. त्यांचा शब्दसंग्रह पहिलीपेक्षा बराच वाढलेला असतो. 

  • गणितात अंक, पाढे, अंकांवरील मूलभूत क्रिया, हे सर्व त्यांना समजत असतं. ते घड्याळात किती वाजले आहेत ते सांगू शकतात.   

  • शाळेत त्यांच्या वर्गात वाचन, आकलन, कविता/गाणी म्हणणे, लिहिणे, सर्जनशील कृती हे सर्व चालू असते.  या मुख्य शैक्षणिक प्रक्रियांशी त्यांची आता चांगलीच ओळख झालेली असते. 

  • आपली मातृभाषा सोडून इतर भाषा त्यांना आता थोड्या प्रमाणात अवगत होत असतात. भाषेचे योग्य व्याकरण, वाक्यरचना याकडे त्यांचे ध्यान असते. 

  • शाळेची व घरातील प्राथमिक शिस्त ते पाळतात — किंवा शिस्तीची त्यांना जाणीव तरी असते. उदा. गृहपाठ 

 

या सर्व बौद्धिक प्रगतीमागे असतो मुलाचा विकसित होणारा मेंदू. मानवजातीने हजारॊ वर्षे जे ज्ञानभांडार गोळा केले आहे ते या मेंदूपुढे आता हळूहळू खुले होत असते.  मानवनिर्मित जगातील विविधता आणि मुलांचे नैसर्गिक कुतूहल यामुळे हा मेंदू आता सतत नवीन गोष्टी समजून घेत असतो. 

 

शारीरिक प्रगती आणि खेळ यांचा विचार केला तर ह्या मुलांना वेगाची आवड निर्माण झालेली असते. ती (पहिलीपेक्षा) जास्त जोरात धावत असतात, कुठल्याही खेळात जास्त “स्कोअर” करायचा प्रयत्न करत असतात, आणि आपल्या नव-विकसित शारीरिक शक्तीमुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत असतात. त्यांना सायकल जोरात चालवायची असते, दप्तर लवकर भरायचं असतं, घरी आल्यावर गृहपाठ पटकन करायचा असतो, आणि लवकर खेळायला जायचं असतं. 

 

सात वर्षाच्या मुलांचे अनेक खेळ आणि गमतीजमती चालू असतात आणि त्यांना रोज त्या सर्व गोष्टी करायच्या असतात. 

 

दुसरीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी  

 

आईबाबांपासून वेगळे चालायला-राहायला शिकणे, आत्मविश्वास, ‘जास्त उंच’-’जास्त भरभर’ जाण्याची ओढ, शब्द, आकडे, आणि इतर चिन्हांच्या स्वरूपात मांडलेला मानवी ज्ञानाचा पसारा उमजू येऊ लागणे, आणि नैसर्गिक कुतूहल…सात वर्षाच्या मुलात ह्या सर्व प्रवृत्तींचे प्रवाह खळखळ वाहत असतात. निसर्ग शिक्षणही या प्रवाहांमधूनच वाहते व्हावे. 

  • निसर्गातील गतिमानता, प्रवाह, वेगवेगळ्या शक्ती यांचे दर्शन त्यांना व्हावे – वारा, वादळे, महासागर, ओढे-नद्या, धबधबे, पाऊस, पडणारा बर्फ, इत्यादी. 

  • त्यांनी निसर्गातील गती, वेग याची समज यावी. उदा: कीटकांचे चालणे, धावणे, उडणे, फिरफिरणे. पक्ष्यांचे उडणे. सस्तन प्राण्यांचे चालणे आणि धावणे, सापांचे सरपटणे. निसर्गातल्या या गतींचा वेग, डौल, समतोल, आणि गती-शरीररचना संबंध त्यांच्या लक्षात यावा.   

  • निसर्ग हे किती मोठे आणि गुंतागुंतीचे जाळे आहे हे त्यांना आता समजावून द्या. वर्गात व गटात अशा कृती ठरवा की त्यांना निसर्गातील जीवांचे निरीक्षण करावे लागेल, काहीतरी गोळा करावे लागेल, प्राथमिक वर्गीकरण करावे लागले, सजीवांची ओळख पटवावी लागेल, आणि ती लक्षात ठेवावीशी वाटेल. 

  • असे वर्गीकरण किंवा सजीवांची ओळख पटविण्यात दुसरीतील मुले तरबेज होतीलच असे नाही, कदाचित हे सर्व त्यांना कंटाळवाणे वाटेल. पण या कृतींतून मुख्य फायदा होतो तो हा की, माणसाने निसर्गाबद्दलचे जे ज्ञानभांडार गोळा केले आहे त्याची समज त्यांना येऊ लागते. त्यांची निसर्गाबद्दलची जिज्ञासा हळूहळू वाढू लागते.  

  • निसर्गावर आधारित एखाद्या व्यवसायाचे त्यांना निरीक्षण करता यावे, त्यातील विविध प्रक्रिया त्यांनी समजून घ्याव्यात. उदा. मासेमारी, फुले किंवा पाने गोळे करणे, धनगर, शेती असे व्यवसाय आणि आणि निसर्ग यातील संबंध – जमीन, पाणी, हवा, ऋतू, अन्न, इत्यादी.  

 

दुसरीतील मुलं खूप कुतूहलाने जगाला सामोरी जात असतात. त्यांच्या न संपणाऱ्या प्रश्नांचे आपण स्वागत करायला हवे.   

bottom of page