top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : निसर्ग शिक्षणासाठी मूल समजून घेताना: दहावीतले मूल 

​योगेश पाठक 

आधी सांगितल्याप्रमाणे किशोरावस्थेची सुरुवात म्हणजे शारीरिक परिपक्वता येणे, स्वतःची शारीरिक प्रतिमा तयार होणे, समवयीन मुलांमध्ये मिसळता येणे, स्वतःची मते बनविणे/मांडणे, आणि व्यक्तिमत्व उमलत जाणे. 

माध्यमिक शाळेला सरावलेली ही मुलं आता अभ्यासाचे नियोजन थोडे चांगले करू शकतात. त्यांच्यापैकी काही जण ‘दहावीनंतर पुढे काय?’ याचाही विचार करत असतात. वेगवेगळे पर्याय त्यांच्या मनात घोळत असतात. त्यापैकी काही पर्याय त्यांना आवडत असतात व ते ‘का’ याचेही कारण ते देऊ शकतात. अशी सर्व मते बनवण्यासाठी त्यांना वेळ दद्यायला हवा. 

रसायनशास्त्रात अनेक नवीन संकल्पना, भौतिकीमध्ये विद्युत/प्रकाश/उष्णता आदी ऊर्जेची स्वरूपे, अशा त्यांच्या विज्ञानातील ज्ञानकक्षा रुंदावत असतात. धातुशास्त्र, कार्बनी रसायने, असे अवघड, माहितीप्रधान विषयही त्यांना आता समजू शकतात. 

जीवशास्त्रातील काही नवीन विषय असतात प्राणी/वनस्पतींचे वर्गीकरण (जास्त खोलात जाऊन), सूक्ष्मजीवशास्त्र, आणि जीवन प्रक्रिया.  पेशींची रचना, जीवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशा नवीन उपशाखांशी त्यांची आता ओळख होते. 

पारंपरिक अभ्यासक्रमात डार्विनचा सिद्धांत, उत्क्रांती यांचा अभ्यास दहावीच्या टप्प्यावर होतो. पण इकोयुनिव्हच्या पर्यावरण शिक्षणविचारात मात्र उत्क्रांतीचा अभ्यास हा पायाभूत मानला आहे आणि आधीच्याच इयत्तांमध्ये त्याची ओळख व्हावी असे सुचविले आहे. 

भूगोलाचा अभ्यास आता जास्त सर्वसमावेशक होऊ लागलेला असतो. आधीच्या इयत्तांमधल्या संकल्पनांचा पाया वापरून, काही भौगोलिक प्रक्रिया जास्त खोलात जाऊन बघता येतात. उदा. भूरूपे, क्षरण, हवामान, भूचित्रे, जैवभौगोलिक प्रदेश, मानवी वस्त्या, व्यापार, आणि अर्थ-भूगोल. 

इतिहासाचा अभ्यासही असाच एकात्मिक केला जाऊ शकतो. आपल्या किंवा दुसऱ्या एखाद्या देशाचा इतिहास व संस्कृती यांचे विविध ताणेबाणे लक्षात घेता येतात. उदा. कला, धर्म, पारंपरिक ज्ञान-विज्ञान, ज्ञानप्रसार, वैज्ञानिक प्रगती, शिक्षण, वाहतूक, संपर्क व माध्यमे, खेळ, प्रवास, करमणूक, शासन व प्रशासन, सामाजिक उतरंड व भेदभाव, लष्कर व लढाया, वसाहतवाद, इत्यादी. पुरातत्वशास्त्र व सांस्कृतिक वारसा यांचाही अभ्यास केला जातो. महत्वाचे म्हणजे पारंपरिक समजूतींची चिकीत्सा होऊ शकते. 

अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना असलेले कुतुहल, आर्थिक स्वातंत्र्याची ओढ, काही वेळा कुटुंबास पैशाची गरज,  यामुळे काही किशोरवयीन मुले या वयातच थोडाफार  रोजगार कमवू लागतात / कमवू शकतात. 

हा सर्व एकात्मिक स्वरूपाचा अभ्यास, अनुभव, आणि भाषा/गणित/विज्ञान/अर्थशास्त्र यातील जास्त प्रगत संकल्पना या सर्वांचा उपयोग एका वेगळ्या प्रकारेही होतो: विद्यार्थ्यास स्वतःचा एक व्यक्ती, एक व्यक्तिमत्व, नागरिक, म्हणून शोध घेता येतो. यातूनच पुढे विद्यार्थ्यास काही ज्ञानशाखा विशेष आवडू शकतात. ११ वी, १२ वी, व महाविद्यालयीन पातळीवर हा शोध असाच सुरु ठेवण्याची मुभा, त्यासाठी वेळ, व वेगवेगळ्या संधी सर्वांना मिळायला हव्यात. 

दहावीतील मुलांच्या निसर्गशिक्षणासाठी 

इकोयुनिव्हच्या निरीक्षणाप्रमाणे, दहावीचा आत्ताचा अभ्यासक्रम निसर्गाचे महत्व आणि निसर्ग-माणूस संबंध यावर पुरेसा जोर देत नाही.  

हे एक महत्वाचे वर्ष आहे – कदाचित हे सर्वात महत्वाचे वर्ष आहे – जेव्हा, आधीच्या सर्व इयत्तांमधील निसर्गशिक्षणाच्या पायाची उजळणी व्हायला हवी, ते शिक्षण नवीन एकात्मिक अभ्यासाशी जोडले जावे, आणि मानवजातीचा ‘विकास’ निसर्गाच्या मर्यादित साधनांच्या व मूल्यवान परिसंस्थांच्या परिप्रेक्ष्यात बघितला जावा. 

आम्ही असे सुचवितो की, दहावीत निसर्गशिक्षणाच्या एकात्मिक विचारावर भर दिला जावा. खालील व तत्सम विषयांवर माहितीचे, विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे, वर्गात चर्चा व्हाव्यात:

  • मानवी ऊर्जावापराचा इतिहास 

  • निसर्गातून मानवाने जमीन, पाणी, व वनस्पती-प्राणी यांचा कसा वापर केला. त्यात काय योग्य, काय अयोग्य आहे. 

  • आत्ताच्या औद्योगिक व्यवस्थेकडून आपण पुढे कुठे प्रवास करत आहोत, कुठे जायला हवे. 

  • भूरूपे, हवामान, सागर, अनेकानेक परिसंस्था व जैवविविधता यांच्याकडे निसर्गाचा वारसा म्हणून कसे बघायचे

  • आधुनिक विकासाचा या वारश्यावर काय परिणाम होत आहे?

  • आपण पर्यावरणीय आणीबाणीत राहतो आहोत का? 

  • आर्थिक विषमता आणि पर्यावरणीय प्रश्न यांचा काय संबंध आहे?

  • पर्यावरणाच्या ज्वलंत प्रश्नांवर आपल्याकडे काय उत्तरे आहेत? 

  • आजच्या अर्थव्यवस्थेत उपजीविकांचा संपूर्ण पट कसा आहे? काय ठेवले, काय बदलले पाहिजे? बेकारीच्या प्रश्नाचे काय? 

  • वरील सर्व प्रश्न कुठल्या ज्ञानशाखा हाताळतात?

  • गेल्या ५० वर्षात आपण पर्यावरणीय समस्या सोडविण्याचा काय प्रयत्न केला आहे? (स्थानिक, राष्ट्रीय, व जागतिक उदाहरणे)

  • पर्यावरणीय चळवळींचे समाजास योगदान काय? (स्थानिक, राष्ट्रीय, व जागतिक उदाहरणे) 

  • पर्यावरणीय मूल्ये व नीती काय असावी, पर्यावरणीय कायदे कसे असावेत, पर्यावरणीय न्याय कसा दिला जावा? 

 

थोड्या सुलभ स्वरूपात खालील विषयांचीही ओळख करून देता येईल. 

  • पर्यावरणाचे अर्थ-केंद्री, संस्था-केंद्री, जैव पर्यावरणीय, व हरित समाजवादी दृष्टिकोन काय आहेत? आपल्या आजूबाजूला हे दृष्टिकोन असणारी माणसे कसे काम करत आहेत? 

  • पर्यावरणीय प्रश्न सोडविण्यासाठी काही नवीन, सर्जनशील, उद्यमशील कल्पना येत आहेत का? 

  • मानवी स्वास्थ्य, आनंद, विकास, व प्रगती, याबद्दल काही नवीन, मूलभूत  विचार करण्याची जरूर आहे का? 

bottom of page