इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : मूल समजून घेताना: पहिलीतले मूल
योगेश पाठक
पहिलीतले, म्हणजे सहा वर्षाचे मूल, साधारण अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळॆ बदल अनुभवत असते. हे बदल मोठ्यांनी नीट टिपायला हवेत.
-
मुलांचे दुधाचे दात पडायला आणि कायमचे दात यायला सुरुवात होत असते. या प्रक्रियेत मुलांना धास्ती, भीती, दुःख, कुतूहल, आनंद अशा अनेक संमिश्र भावना असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील बाळसे जात असते आणि हात-पाय, इतर अवयव यांची वाढ होत असते.
-
बालवाडीतील छोट्यांपेक्षा यांची धडपड आणि दंगा थोडा जास्त वाढलेला असतो. ही मुलं बिनधास्तपणे आणि सतत जिने चढत-उतरत असतात, घसरगुंडीवर खेळत असतात, झाडांवर, दोरखंडांवर लोंबकळत असतात आणि बागेतील मनोऱ्यांवर चढत असतात. (फक्त आपण त्यांना परवानगी द्यायला हवी). ती दरवाजावर आणि डबल बारवर लटकत असतात, लांब आणि उंच उड्या मारत असतात आणि अनेक कसरती करून बघत असतात. कोलांट्या उड्या या तर त्यांच्या सर्वात आवडत्या. ती बागेत, मैदानांवर आणि टेकड्यांवर सुसाट पळत असतात. त्यांना खूप, खूप मोकळी जागा हवी असते.
-
त्यांची दृष्टी आणि हात यांच्यातली सुसूत्रता वाढत असते. आता ते मातीकाम, बागकाम अशी कामे जास्त चांगली करू शकतात.
-
खेळ आणि गोष्टी त्यांना अजूनही खूप आवडत असतात. पण याबरोबरच वास्तव जगाचे प्राथमिक आकलन होण्यास सुरुवात झाली असते. सहा वर्षाची मुलं एखादी गोष्ट सांगितली जात असताना ‘पुढे काय होणार आहे’ याचे अंदाज बांधू शकतात, तर्क लढवू शकतात. कधीकधी गोष्टीतल्या काल्पनिक जगातली गृहीतके ती वास्तव जगातही जोडू पाहतात.
-
आपल्या वयाच्या मुलांमध्ये मिसळायला त्यांना आवडतं. त्यांना माहित असलेल्या संकल्पना किंवा घडलेल्या घटना ती सविस्तरपणे आणि थोड्या ठामपणे सांगू शकतात. त्यांची भाषा आणि शब्दसंग्रह वाढत असतोच. याच एक कारण म्हणजे शाळेत आता औपचारिक भाषा शिक्षणाला सुरुवात झाली असते.
-
त्यांची ‘अवकाशा’ची म्हणजे जागेची, अंतराची जाणीव वाढत असते. आता ते प्राथमिक स्वरूपाचा नकाशा समजून घेऊ शकतात. इतरांना ‘कुठे कसं जायचं’ याच्या प्राथमिक सूचना देऊ शकतात.
-
त्यांना आकडे, अक्षरे, चिन्ह आता चांगलीच ओळखता येऊ लागलेली असतात. याचं एक कारण म्हणजे शाळेत आता अंकगणित सुरु झालेले असते. ती आकडे मोजू शकतात, घड्याळही बघू शकतात.
-
वैज्ञानिक प्रक्रिया किंवा अनुमान म्हणजे काय हे नीट माहित नसलं तरी या वयाची मुलं साधी अनुमाने निश्चितच बांधू शकतात, निरीक्षणे करू शकतात, माहिती गोळा करू शकतात. या सर्वांच्या आधारे, ती आपल्या पद्धतीने निष्कर्षही काढू शकतात.
-
त्यांचं ‘शिकणं’ अजूनही बरंचसं मोठ्यांच्या अनुकरणातूनच होत असतं. तरीही स्वतःचा दृष्टिकोन बनविणे, शिकण्याची वेगवेगळी तंत्रे आत्मसात करणे, या टप्प्याच्या ती जवळ येत असतात.
पहिलीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी
-
सहाव्या वर्षाच्या आसपास मुलाला स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जी नवीन समज येत असते त्यात विस्तारित निसर्ग शिक्षणही हवेच. मुलांचे निसर्गअनुभव आणि कृती यात वरील प्रक्रियेचे प्रतिबिंब असावे.
-
निसर्गातील वस्तू/प्राणी/वनस्पती यांची रचना, जडणघडण, त्यांची हालचाल, त्यांची गती, त्यांचा समतोल या सर्वांचे मुलांनी ढोबळ मानाने, व शक्य झाल्यास सूक्ष्म निरीक्षण करावे. इतर प्राण्यांची व स्वतःची शरीररचना, आपल्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता, हालचाल, गती, समतोल यांची तुलना करावी. यातलं काही शिकणं मुद्दामहून होईल, तर बरेचसे आपसूकच.
-
तरीही पुस्तकी ज्ञानावर जास्त भर नसावा. ही मुलं अजूनही बालवाडीप्रमाणेच खेळ आणि गोष्टींतून शिकत असतात. ज्ञानप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी खेळ व गोष्टी चालूच रहाव्यात. खरं सांगायचं तर सहा वर्षाची मुलं अजून नवीन खेळ स्वतः शोधत असतात, त्यासाठी तुलनेने जास्त वेळही देत असतात. आणि त्या प्रक्रियेत समृद्ध होत असतात.
-
तत्वज्ञानाच्या प्रदेशातील काही संकल्पना – म्हणजे जगाची निर्मिती, जन्म, मृत्यू, ईश्वर – या वयाच्या मुलांच्या संभाषणात काही वेळा आढळतील, पण या संकल्पनांची खोली त्यांना समजेलच असे नाही. तरीही, या वयात निसर्गाची चक्रे, निसर्गाचा भव्य पट आणि रचना, निसर्गाचे सूक्ष्म-भव्य-रौद्र सौंदर्य या व अशा संकल्पना मुलांना या वयातही अनुभवता याव्यात – प्रत्यक्ष आणि जमल्यास तत्त्वज्ञानाच्या प्राथमिक चष्म्यातून.
-
या वयात निसर्गाचा अनुभव एक व्यक्ती म्हणूनच नव्हे तर गटाच्या स्वरूपातही घ्यावा. निसर्गात काय दिसले, काय सापडले, काय वाटले, याची गटाबरोबर देवाणघेवाण व्हावी.
-
या वयात स्नायूंमध्ये जो सूक्ष्म विकास होत असतो त्यामुळे मुले अजून जास्त चित्रकला, मातीकाम, आणि इतर कला शिकत असतात. या सर्व कला-कौशल्यांमध्ये आपण निसर्ग आणू शकतो – निसर्गातले पदार्थ, निसर्गातले रंग, निसर्गातल्या वस्तू, आणि निसर्गाचे इतर ज्ञान.