कसे शिकायचे आहे: मूल्यांचा शोध घेणारी शिक्षणप्रक्रिया
योगेश पाठक
या लेखापासून आपण इकोयुनिव्हच्या ‘हरितात्म’ शिक्षणविचाराचा अखेरचा व चौथा स्तंभ, म्हणजे ‘कसे शिकायचे / शिकवायचे आहे’ ते जाणून घेऊ.
मला वाटते की मानवाचे प्रत्येक मूल, मग त्याचा जन्म कुठल्याही देशात व समाजात झाला असो, खालील अंतर्गत ऊर्मींच्या व बाह्य प्रभावांखाली मोठे होत असते.
-
अनेकविध गरजांची उतरंड: माणसाच्या गरजा नक्की किती व कोणत्या याबद्दल बराच उहापोह होऊ शकतो. तूर्तास आपण मास्लो याने सांगितलेली “गरजांची त्रिकोणी उतरंड” प्रमाणभूत मानू.
-
आधी आखून दिलेल्या मार्गाने चालणे: कुटुंब, नातेवाईक, भोवतालचा समाज यांनी सांगितलेले रीती-रिवाज पाळणे, त्यांनी सांगितलेली कर्तव्ये करणे, समाजाने आखून दिलेल्या चाकोरीत जीवन-प्रवास करणे, वेगवेगळे पण सर्वमान्य अनुभव घेणे. माध्यमे, जाहिराती, करमणुकीची साधने, सद्य शिक्षणप्रक्रिया यांचाही खूप मोठा प्रभाव आपल्या विचारांवर व निर्णयांवर असतो.
-
जिज्ञासा: निसर्ग व निसर्गातील घटना याबद्दलचे कुतूहल मानवात अंगभूतच आहे. यातूनच निसर्गाचे नियम शोधून काढण्याचा प्रयत्न झाला आणि विज्ञान जन्माला आले. मानवी समाजाचे चक्र नक्की कसे फिरते, या जगात इतरत्र निसर्ग कसा आहे, कुठले देश, समाज व संस्कृती आहेत याबद्दलही माणसास कुतूहल असते.
-
मूल्यांचा शोध: गरजा, रीती-रिवाज आणि कुतूहल यातून कुटुंबाची, सद्य समाजाची मूल्ये कळून येतात. त्याचा स्वतःच्या मूल्यांवर प्रभाव पडतो. पण जीवन जगण्याचा माझा व्यक्तिगत मूल्यसंच कोणता हे व्यक्ती पूर्ण आंधळेपणे स्वीकारत नाही. त्यात ‘स्व’ ने केलेला थोडाफार तरी विचार असतोच. म्हणजेच, प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मूल्ये कुठली याच्या शोधात असते, किंवा असा शोध घेण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त केले जाऊ शकते.
तरीही, मनुष्याने घेतलेले बहुतांश निर्णय व कृती यांवर गरजांची उतरंड आणि सामाजिक-आर्थिक रीति-रिवाज पाळण्याचे बंधन याची मोठी छाप पडलेली स्पष्टपणे दिसते. यामुळेच समाजाच्या मूल्यव्यवस्थेचा जो गाभा असतो, त्यात बदल होत नाही, किंवा झाला तरी खूप हळूहळू होतो.
पण हेही खरे आहे की मानवी जिज्ञासा आणि ‘स्व’ची मूल्ये शोधण्याची धडपड याला जर खतपाणी मिळाले, तर वरील चित्र बदलू शकते. जिज्ञासा मानवास ज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रात घेऊन जाते. मूल्यांचा शोध हा निर्णयप्रक्रियेत नवीन विचाराचे स्फुल्लिंग जागवू शकतो.
योग्य ती शिदोरी मिळाल्यास मनुष्य गरजांचा श्रेणी-त्रिकोण आणि रीती-रिवाजांची चाकोरी यापलीकडे जाऊन नव्या वाटा धुंडाळू शकतो.
निसर्ग-मानव संबंधांकडे बघण्याचा सर्वंकष दृष्टिकोन हे असेच एक वेगळे मूल्य. ‘इकोयुनिव्ह’च्या हरितात्म शिक्षणप्रकीयेचा मुख्य हेतू हा आहे की विद्यार्थ्यास हे मूल्य शोधता यावे, समजून घेता यावे, व स्वतःच्या पध्दतीने अंगीकारता यावे.
या मूल्याची जाण आली तर नैसर्गिक संसाधनांचा निरंकुश उपभोग, चंगळवाद, भौतिक वाढीमागे धावणे, संपत्तीनिर्मितीला नको तेवढे प्राधान्य देणे, झापडबंद स्पर्धा, हे समाजास आणि व्यक्तीस घट्ट धरून राहिलेले प्राधान्यक्रम आपोआप गळून पडतील. गरजांच्या संपूर्ण श्रेणी व्यवस्थेचेच पुनर्मूल्यांकन होईल.
यामुळेच, “कसे शिकायचे आहे” या प्रक्रियेचा भर विद्यार्थ्यास वरील मूल्य शोधता व जाणता येईल आणि त्याचे स्वतःच्या आयुष्यात कसे उपयोजन करता येईल यावर हवा.
हे ओघानेच आले की अशी शिक्षणप्रक्रिया ज्ञानरचनावादाला अनुसरून हवी. विद्यार्थ्यास योग्य ते अनुभव समरसून घेता येतील अशी ही प्रक्रिया हवी. शाश्वत सह-अस्तित्व ‘का’ हवे याची ज्ञाननिर्मिती प्रथम व्हावी आणि त्यानंतर ते ‘कसे प्रत्यक्षात आणता येईल’ ते शोधता यावे.
‘इकोयुनिव्ह’च्या हरितात्म शिक्षणप्रकीयेसाठी अजून एक महत्त्वाचे: निसर्ग-माणूस संबंधांच्या सर्वंकष दृष्टिकोनाचे मूल्य हे पालक व शिक्षक यांनाही समजलेले असावे. त्यांनी हे मूल्य शिक्षणप्रकीयेत कसे आणता येईल याचा मुळापासून व साकल्याने विचार करावा. शिक्षणप्रकिया या दोघांनीही एकत्र मिळून सांभाळायची आहे.
मूल्याधारीत, ज्ञानरचनावादी, आणि शिक्षक-पालक या दोघांनी एकत्रितपणे चालविलेल्या अशा या शिक्षणप्रक्रियेतील प्रत्येक वर्ग-तास, शैक्षणिक सहल, व इतर अनुभव खालील मुद्यांना धरून असावा:
-
राष्ट्रीयत्व, वर्ण, जात, धर्म, लिंग, आणि सामाजिक-आर्थिक स्तर यांच्याशी निगडित कोणतेही पूर्वग्रह, रूढीवादी कल्पना, गृहितके आणि भेदभाव हे शैक्षणिक कृतीत असू नयेत.
-
शैक्षणिक कृती शक्य तितक्या स्थानिक परिसंस्था आणि स्थानिक निसर्ग-मानव संबंधांवर आधारित असाव्यात. इतर राष्ट्रीय किंवा परदेशी संदर्भांचे अतिरिक्त ज्ञानसुद्धा हळूहळू दिले जावे, जेणेकरून शिक्षणाचा अनुभव समृद्ध होईल.
-
ज्ञानरचनावादी शिक्षणाची विविध तंत्रे वापरली जावी. उदा.: विद्यार्थ्याने आधीच मिळवलेल्या ज्ञानाची संरचना तपासणे/वापरणे/सुधारणे, वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती, परस्पर सहकार्य, विद्यार्थांनी एकमेकांकडून शिकणे, विषयतज्ञांची मदत घेणे, शिक्षणप्रकीयेत नवीन तंत्रे वापरणे, आणि विद्यार्थ्याला विषय त्याच्या गतीने शिकण्यास मदत करणे.
-
हरितात्म शिक्षणविचाराचा स्तंभ दुसरा, म्हणजेच विद्यार्थी समजून घेणे, हा शैक्षणिक कृतीची रचना करत असताना लक्षात असू द्यावा. यात विद्यार्थ्यांची मातृभाषा/परिसराची भाषा, त्यांचे वय, स्थानिक कुटुंबव्यवस्था, सामाजिक-आर्थिक स्तर व त्यातील फरक, विद्यार्थ्यांना काय आवडते, कशाचा कंटाळा येतो, त्यांचे प्राधान्यक्रम व स्वप्ने, शिक्षण प्रक्रियेतील एकंदर रस, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.
-
शैक्षणिक कृती विद्यार्थीकेंद्री असाव्यात, त्यांच्या वयास अनुरूप असाव्यात आणि त्यांच्या मातृभाषेत / परिसराच्या भाषेत घेतल्या जाव्यात.
-
शैक्षणिक कृतींमध्ये निसर्ग-विज्ञान, निसर्ग-माणूस संबंध, निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद आणि त्यामुळे होणारी अभिव्यक्ती या सर्वांचा अंतर्भाव हवा.
शेवटी अजून एक महत्वाचे: शाळा आणि पालक या दोघांनी मिळून मधूनमधून या संपूर्ण शिक्षणप्रक्रियेचेच मूल्यांकन व चिंतन करणे आवश्यक आहे. ‘हरितात्म’ चा हेतू शिक्षणप्रक्रियेतून साध्य होत आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे.