कसे शिकायचे आहे : बालवाडी
योगेश पाठक
या लेखापासून आपण निसर्गशिक्षण कसे शिकायचे / शिकवायचे आहे याचे उदाहरण म्हणून काही शैक्षणिक कृती बघू या. या कृती हरितात्म शिक्षणविचाराचे पहिले तीन स्तंभ – म्हणजे, ‘हेतू’, ‘मूल समजून घेताना’, आणि ‘काय शिकवायचे आहे’ – यांवर आधारित आहेत.
पालक व निसर्ग-शिक्षक यांनी शालेय वर्षाच्या सुरूवातीस भेटावे. शाळेचे वार्षिक वेळापत्रक, गावाचे वार्षिक वेळापत्रक (उदा. ऋतू, सुट्या, सण, शेतकाम, सुगीचा व इतर हंगाम), तज्ज्ञांची उपलब्धता, या सर्वांचा विचार करून, या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षणाचे एक वार्षिक वेळापत्रक आखावे.
बालवाडीपासून सुरुवात करू. बालवाडीसाठी कृतींचे पाच मुख्य पुंज खाली दिले आहेत. अर्थात खालील कृती उदाहरणादाखल दिल्या आहेत. पालक व शिक्षक यातून काही कृती कमी करू शकतात, त्या बदलू शकतात, किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन कृती व उपक्रम यांचा अंतर्भाव करू शकतात.
कृतीपुंज १: स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबाचे, आणि परिसराचे निरीक्षण व मनन (नैसर्गिक संसाधनांच्या संदर्भात)
-
"माझे कुटुंब/आमच्या घरी...” : आपल्या घरातील मोठ्यांची मुलाखत घ्या / त्यांच्याशी गप्पा मारा आणि दुसऱ्या दिवशी वर्गाला सांगा. कोण-कोण आहे तुमच्या कुटुंबात? पाळीव प्राणी आणि गुरे-ढोरे पण आहेत का? त्यांना नावेही आहेत का? कुटुंबातील प्रत्येक जण रोज काय आणि किती खाते? त्यांना काय खायला आवडते? ते रोज किती पाणी पितात? तुम्ही पाणी कुठून आणता? जेवण तयार करण्यासाठी काय काय लागते? तुमचे घर कसे आहे? किती मोठे आहे? कशापासून बांधले आहे? हे घर बांधायच्या आधी त्या जमिनीवर काय होते?
-
माझा परिसर: आपल्या परिसरात फिरून आणि मोठ्यांना प्रश्न विचारुन खालील माहिती गोळा करायची आहे व वर्गात सांगायची आहे: माझ्या परिसरातील पाऊस, वारा, बर्फ, सूर्यप्रकाश, ढग, ऋतू. दिवसाचे चक्र – सूर्य केव्हा उगवतो, केव्हा डोक्यावर येतो, केव्हा मावळतो. रात्रीचे चक्र – चंद्र केव्हा उगवतो/दिसू लागतो, केव्हा मावळतो, चंद्राच्या कला म्हणजे काय, तारे व ग्रह. परिसरातले ऋतू – उन्हाळा, हिवाळा, पावसाळा.
कृतीपुंज २: निसर्ग निरीक्षण
-
माझ्या परिसरातील निसर्ग १: घराजवळ मोठ्या माणसांबरोबर फिरायला जा. तसेच शाळेजवळ शिक्षकांबरोबर फिरायला जा. आपल्या जवळ काही नैसर्गिक जागा आहेत का? तिथे जमीन कशी आहे? माती कशी आहे? परिसरात काही पाण्याची ठिकाणे आहेत का – तळे, ओढा, नदी, विहीर, समुद्र? अजून या गोष्टीही बघा: झाडे-झुडपे, गवत, सस्तन प्राणी, पक्षी, कीटक, उभयचर प्राणी, साप-सरडे. या अशा सहलींमध्ये पंचेंद्रिये वापरणे महत्वाचे – नैसर्गिक वस्तूंचा वास, स्पर्श, तिचे नीट निरीक्षण करणे, खाण्यायोग्य गोष्ट असेल तर चव. निसर्गात या सर्व गोष्टींची विविधता आहे का याबद्दल वर्गात गप्पा मारा. काही झाडे, पक्षी, कीटक यांच्या याद्या करा. काहींची चित्रे काढा.
-
माझ्या परिसरातील निसर्ग २: यात खालीलपैकी एक किंवा अनेक कृती करू शकता:
-
खजिन्याचा शोध: आसपासच्या निसर्गातील विशिष्ट वस्तूंची यादी मुलांना द्या व त्यांना शोधायला मोकळे सोडा.
-
किल्ला करू या: निसर्गातील पाने, काठ्या-काटक्या, व इतर गोष्टी वापरून एक किल्ला करा.
-
-
जीवन-चक्र १: एका झाडाचे नीट निरीक्षण करता-करता बीपासून फळापर्यंत त्याचे जीवनचक्र काय आहे ते प्राथमिकरित्या समजून घ्या: वेगवेगळ्या झाडांच्या जीवनचक्रात काही फरक आहेत का ते सोदाहरण समजून घ्या.
-
जीवन-चक्र २: बेडूक, कुत्रा, गाय या किंवा अशा जवळपासच्या कुठल्याही प्राण्याचे जीवनचक्र काय आहे ते प्राथमिकरित्या समजून घ्या. जीवनचक्रात काही फरक आहेत का ते सोदाहरण समजून घ्या.
-
प्राण्यांची घरे: परिसरास भेट देऊन प्राण्यांची घरे बघा – गावात/शहरात आणि रानात. आपले पाळीव प्राणी, म्हणजे, गाय-म्हैस, घोडा, कुत्रा-मांजर, शेळ्या-मेंढ्या आपला जास्त वेळ कुठे घालवतात, कुठे विश्रांती घेतात, रात्री कुठे झोपतात?
-
झाडाचे वेगवेगळे भाग: झाडे जवळून बघण्यासाठी अभ्यास सहल काढा आणि वर्गात काही नमुने आणून खालील भागांचे निरीक्षण करा, त्याबद्दल गप्पा मारा.
-
पाने: त्यांची रचना, वेगवेगळे प्रकार, वास, चव, रंग, स्पर्श
-
फुले: त्यांची रचना, वेगवेगळे प्रकार, वास, चव, रंग, स्पर्श
-
खोड: त्यांची रचना, आकार, वेगवेगळे प्रकार, चव, रंग, स्पर्श, वास
-
फळे: वेगवेगळे प्रकार, चव, रंग, स्पर्श, त्यांच्या बिया, वास
-
मूळ: उदाहरणे, वास, चव, रंग, स्पर्श
-
वरीलपैकी माणसाने खाण्यायोग्य, व न खाण्यायोग्य/ विषारी अवयवांची उदाहरणे
-
-
निसर्गाचे आवाज: निसर्गात शांतपणे समाधी लावून, वारा, झाडांच्या पानांची सळसळ, पाण्याचे आवाज, प्राण्यांचे आवाज, हे सर्व नीट ऐका. काय-काय ऐकू आले ते शिक्षकांना सांगा.
कृतीपुंज ३: निसर्ग आणि सर्जनशीलता, कल्पकता, गोष्टी सांगणे
-
निसर्गातून कला: एक किंवा अनेक वेळा निसर्गात फिरा. रंगीत किंवा विशेष आकार व रचना असलेली फुले, पाकळ्या, पाने, दगड, माती जमवा आणि कुठलीही एक कलाकृती तयार करा. या वस्तू मुलांनी स्वतःच गोळा करायच्या आहेत.
-
गोष्टींचा तास १: शिक्षकाने प्राणी, वनस्पती, निसर्ग याबद्दलच्या गोष्टी सांगाव्या / वाचून दाखवाव्या.
-
गोष्टींचा तास २: मुलांनी प्राणी, वनस्पती, निसर्ग याबद्दलच्या छोट्या गोष्टी तयार करुन सांगाव्या.
-
कठपुतळी: निसर्गातील वस्तूंपासूनच एकत्र मिळून बाहुल्या तयार करा. निसर्गावरील एक छोटे नाट्य सादर करा. (या कृतीत शिक्षकांनी काही महत्वाचे काम केले तरी चालेल).
-
प्राण्यांचे आवाज: प्रथम प्राण्यांचे आवाज ऐका व मग त्यांची नक्कल करायचा प्रयत्न करा. त्यानिमित्ताने त्या प्राण्याबद्दल अजून माहिती मिळवा.
-
प्रत्येक आठवड्यात चित्र काढणे व इतर कला कृती चालू रहाव्यात व त्यात निसर्ग निरीक्षणातील विषय यावेत.
कृतीपुंज ४: मानवी समाज आणि निसर्ग
-
झाड लावू या : एक बी व एक छोटे रोप घेऊन झाडे लावा. ते झाड जगवण्याचा प्रयत्न करा. पुढची अनेक वर्षे त्या झाडाकडे पुन्हा पुन्हा या.
-
बागेत चला: एक सार्वजनिक व एक खाजगी अशा उद्यानास भेट द्या. काय काय दिसले याबद्दल वर्गात गप्पा मारा.
-
शेत बघू या: शेतात जा, निरीक्षण करा, प्रश्न विचारा. पेरणी/लावणी या कामांमधे भाग घ्या.
-
आपण घरी कुठल्या वस्तू वापरतो. मोठ्यांशी बोला, व वस्तूंची यादी करा. वर्गात येऊन सांगा व चर्चा करा.
-
सामुदायिक जीवन: घरी मोठ्यांशी गप्पा मारा. माहिती मिळवा. वर्गात येऊन ती सांगा, चर्चा करा.
-
माझे गाव/शहर : इथे (या संपूर्ण परिसरात) आधी काय होते? शेती कधी सुरू झाली? घरे कधी बांधली? शाळा व इतर इमारती कधी बांधल्या?
-
घरातली/ गावातली मोठी माणसे काय-काय काम/व्यवसाय करतात? त्यांच्या कामात निसर्गाचा काय संबंध येतो?
-
निसर्गाशी जोडलेले लोक: आपल्या आजूबाजूस असे लोक राहतात का, की ज्यांचे काम निसर्गाशी जोडले आहे, ज्यांचा रोजगार निसर्गातून येतो? त्यांच्याबद्दल मोठ्यांकडून समजून घ्या. जमल्यास त्याच्या घरी जाऊन त्यांना भेटून या व त्यांच्या कामाचे निरीक्षण करा. निसर्गातून त्यांना काय मिळते? निसर्गाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो? कुठला ऋतू चालू आहे याचा त्यांच्या कामावर, जगण्यावर काही परिणाम पडतो का?
-
निसर्गाशी संबंधित चाली-रीती आणि सण-उत्सव, अन्नपदार्थ, मौज-मजा: आपल्या आजूबाजूला काही स्थानिक चाली-रीती, सण-उत्सव, अन्नपदार्थ, मौज-मजा दिसते का, की जिचा निसर्गाशी, ऋतूंशी संबंध आहे?
-
कृतीपुंज ५: आपल्या गरजा, आपले जगणे
-
आपले अन्न: मोठ्यांशी सविस्तर बोलून, घरात नीट निरीक्षण करुन हे समजून घ्या, व नंतर वर्गात चर्चा करा.
-
आपण रोज जे अन्न खातो ते कुठून येते?
-
त्यातले किती/कुठले अन्न आपण थेट निसर्गातून मिळवितो, आणि कुठले शेतीमधून येते, कुठले कारखाना व दुकानातून, कुठले अन्न इतर कुठूनतरी येते?
-
आजूबाजूचे लोक जे अन्न खातात त्यात सर्वसाधारणपणे थेट निसर्गातून येणारे अन्नपदार्थ कुठले आहेत?
-
आपण कुठले अन्नधान्य/ मांस/ भाज्या/ फळे खातो?
-
आपली औषधे कुठून येतात? औषधे निसर्गात मिळतात का?
-
-
हवा आणि पाणी: वर्गात चर्चा करा.
-
आपली पाण्याची गरज: आपल्याला कशा-कशासाठी पाणी लागते?
-
आपण रोज वापरतो ते पाणी कुठून येते?
-
आपल्याला हवा कशा-कशासाठी लागते? हवा म्हणजे काय? ती कुठून येते?
-
-
प्राणी आणि आपण: वर्गात चर्चा करा.
-
आपणही इतर प्राण्यांसारखे एक प्राणीच आहोत का?
-
जगण्यासाठी प्राणी आणि झाडे यांना काय लागते?
-
वरील कृतीपुंजांत दिलेल्या व अशा इतर कृती वेगवेगळ्या स्थानिक, सांस्कृतिक व सामाजिक-आर्थिक संदर्भानुसार बदलता येतील. या व अशा इतर कृतींतून ‘हरितात्म’ शैक्षणिक प्रगती, चिकित्सक विचार, आणि निसर्गाशी एक नाते जोडले जाणे, हे सर्वच घडून येईल.