कसे शिकायचे आहे : इयत्ता पाचवी
योगेश पाठक
पाचवीसाठी कृतींचे पाच मुख्य पुंज खाली दिले आहेत.
पालक व निसर्ग-शिक्षक यांनी शालेय वर्षाच्या सुरूवातीस भेटावे. शाळेचे वार्षिक वेळापत्रक, गावाचे वार्षिक वेळापत्रक (उदा. ऋतू, सुट्या, सण, शेतकाम, सुगीचा व इतर हंगाम), तज्ज्ञांची उपलब्धता, या सर्वांचा विचार करून, या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षणाचे एक वार्षिक वेळापत्रक आखावे.
खालील कृती उदाहरणादाखल दिल्या आहेत. पालक व शिक्षक यातून काही कृती कमी करू शकतात, त्या बदलू शकतात, किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन कृती व उपक्रम यांचा अंतर्भाव करू शकतात.
कृतीपुंज १: पृथ्वी आणि जीवसृष्टीची कथा
प्रकल्प - पृथ्वीची कालरेषा : सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कागद किंवा कापडावर पृथ्वीच्या इतिहासाचा कालक्रम दर्शवणारे एक मोठे भित्तिचित्र (म्युरल) तयार करावे . यात पृथ्वी आणि चंद्राची निर्मिती, भूगर्भीय काळातील प्रमुख टप्पे (उदा. पॅलिओझोइक, मेसोझोइक, सेनोझोइक) आणि प्रत्येक काळातील वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी यांचा समावेश असावा. यातून पृथ्वीचा अफाट इतिहास आणि जीवसृष्टीचा उत्क्रांती-क्रम हा एकमेकांच्या सहयोगातून व सर्जनशील पद्धतीने, दृश्य स्वरूपात मांडला जाईल.
प्रकल्प - आपण कुठून आलो – 'होमो सेपियन्स'चा कालक्रम: मानव उत्क्रांतीचा कालक्रम दर्शवणारे एक मोठे भित्तिचित्र विद्यार्थी एकत्र मिळून तयार करतील; यात मानवाशी जवळचे नाते असलेल्या सर्व कपी प्रजाती (hominids) आणि सर्व मानव-सदृश कपी (hominin) च्या उदाहरणांचा समावेश असेल. हा प्रकल्प आधीच्या प्रकल्पासारखाच असेल, परंतु यात 'होमो सेपियन्स'पर्यंतच्या प्रवासाचा अधिक तपशीलवार कालक्रम मांडला जाईल. यात आपले आणि इतर काही होमिनिन यांचे एकाच काळात अस्तित्वात असणे यावर विशेष भर दिला जाईल.
डार्विन आणि वॉलेस यांच्यावरील नाटक (जर इयत्ता ३ मध्ये हे केले नसेल तर): डार्विन आणि वॉलेस यांची जीवनकथा व त्यांच्या कार्याची ओळख करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे नाटक स्वतः लिहावे. यात डार्विनचा 'बीगल' जहाजावरील प्रवास आणि वॉलेसचा आशियातील काळ (ज्या दरम्यान त्यांनी उत्क्रांतीविषयक शोध लावले), तसेच त्यांनी एकमेकांशी पत्राद्वारे केलेला संवाद, इतर शास्त्रज्ञ व लोकांसमोर मांडलेले कार्य इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो.
"भूगर्भशास्त्र आणि मी" - खडक संग्रह: भूगर्भशास्त्रातील थोड्या अमूर्त संकल्पना आणि वस्तू गोळा करण्यातील मुलांची आवड यांचा मेळ घालता येईल. विद्यार्थ्यांना खडकांचा छोटा संग्रह करण्यास प्रोत्साहित करता येईल. या प्रत्यक्ष कृतीतून त्यांना विषय समजण्यास मदत होईल. वर्गात ते खडकांचे मूलभूत प्रकार आणि भूरूपे (उदा. पर्वत, मैदाने) ओळखायला शिकतील. आपल्या संग्रहाचा वापर करून ते एक छोटे "संग्रहालय" किंवा मार्गदर्शक पुस्तिका तयार करू शकतात. यात प्रत्येक खडकावर नाव/माहितीची चिठ्ठी लावता येईल आणि तो खडक कसा तयार झाला असावा, याचे स्पष्टीकरण देता येईल.
प्रकल्प - 'बायोम'ची पेटी: 'बायोम' (विशिष्ट हवामान व जीवसृष्टी असलेला प्रदेश) ही संकल्पना आणि हवामानाचा परिसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी हा त्रिमितीय मॉडेल बनवण्याचा उपक्रम उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांचे गट एखाद्या विशिष्ट बायोमचा (उदा. टुंड्रा, वर्षावन, गवताळ प्रदेश किंवा वाळवंट) अभ्यास करतील आणि एका पेटीत ठेवता येईल असे त्रिमितीय मॉडेल तयार करतील. यात त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राणी, तसेच हवामान आणि तिथल्या प्रजाती संसाधनांचा वापर कसा करतात, याचे दृश्य वर्णन असेल. यांचे प्रदर्शन सर्वांसाठी भरवता येईल.
कृतीपुंज २: काळाच्या ओघात निसर्ग-माणूस संबंध
प्रकल्प - "पाषाणयुगीन हत्यारांपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत" - कालरेषा: या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना मानवी समाज आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचा इतिहास कसा विकसित होत गेला, हे समजण्यास मदत होईल. विद्यार्थी गटांमध्ये काम करुन एक कालरेषा तयार करतील ज्यामध्ये पाषाणयुगाचे तीन टप्पे, ताम्र/कांस्य युग, लोहयुग, शेतीचा काळ आणि औद्योगिक युग (१९५० पूर्वी आणि नंतर) यांची तुलना केली जाईल. या प्रत्येक कालावधीसाठी, ते अन्न-पाणी, हत्यारे, घरे, वस्त्या आणि ऊर्जेचे स्रोत यांची माहिती मिळवून त्यांची चित्रे काढतील; तसेच या बदलांचा पर्यावरण आणि मानवी गरजांवर कसा परिणाम झाला, यावर चर्चा करतील. पृथ्वीवरील विविध ठिकाणी हे बदल कसे घडले, याचा भौगोलिक दृष्टिकोन शिक्षक यात समाविष्ट करू शकतात.
प्रकल्प - "माझ्या ताटाचा प्रवास" – एक ऐतिहासिक तुलना: प्राचीन आणि आधुनिक अन्न उत्पादनाची तुलना करणे, आजच्या शहरातील अन्नप्रणालीमधील गुंतागुंत व संसाधनांचा मोठा वापर यावर हा प्रकल्प प्रकाश टाकेल. विद्यार्थी एखादा सामान्य खाद्यपदार्थ निवडतील (उदा. त्यांच्या परिसरातील कोणताही प्रकारचा ब्रेड, भात/तांदूळ किंवा भाजी). शिकारी-अन्नसंकलक मानव किंवा सुरुवातीच्या काळातील शेतकरी तो पदार्थ कसा मिळवत असत आणि आज आपण तो कसा मिळवतो, याची ते माहिती घेतील. प्रत्येक पद्धतीमध्ये समाविष्ट असलेले तंत्रज्ञान, साहित्य, ऊर्जा आणि जमिनीचा वापर यांची तुलना करणारा 'फ्लो चार्ट' तयार करुन त्याचे सादरीकरण ते तयार करतील.
प्रकल्प - "कपडे धुणे" - भूतकाळ आणि वर्तमानकाळ: या प्रकल्पद्वारे विद्यार्थ्यांना कपड्यांसारख्या मानवी गरजांचा विकास आणि त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेता येईल. लोक पूर्वी कपडे कसे धूत असत (उदा. नदीचे पाणी वापरणे, रिठ्यापासून बनवलेला साबण वापरणे) आणि आजच्या पद्धती (वॉशिंग मशीन, डिटर्जंट्स) कशा आहेत, याची विद्यार्थी तुलना करतील. ते यात वापरले जाणारे तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पाणी यांचा वापर तसेच आधुनिक डिटर्जंट्सचा निसर्गावर होणारा परिणाम यावर चर्चा करतील. वरीलप्रमाणेच तुलनात्मक चित्र इथही काढता येईल. शक्य असल्यास, जिथे अजूनही पारंपरिक पद्धतीने कपडे धुतले जातात अशा नद्या किंवा ओढ्यांच्या ठिकाणी सहल आयोजित करा, त्या लोकांशी बोला.
प्रकल्प - आपली घरे - ऐतिहासिक तुलना: विद्यार्थ्यांनी घरांच्या विविध प्रकारांची सचित्र पोस्टर्स तयार करावीत. यात गुहा, झोपड्यांचे विविध प्रकार, विटा / सिमेंट / लाकूड वापरून बांधलेली गावांमधील घरे आणि शेवटी काँक्रीट, धातू व काच वापरून बांधलेली आधुनिक घरे, उंच इमारती यांचा समावेश असेल. यासंबंधी माहिती गोळा करावी. तज्ञांच्या भेटी घ्यावा. त्यानंतर या चित्रांचे प्रदर्शन भरवावे. प्रत्येक प्रकारच्या घराविषयी आणि त्यांच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल माहिती गोळा करून ती इतरांना द्यावी.
कृतीपुंज ३: आपल्या देशातील नैसर्गिक प्रणाली, मानवनिर्मित जाळी आणि संसाधने
प्रकल्प - "आपल्या देशातील नैसर्गिक प्रणालींचा नकाशा": हा प्रकल्प देशात असलेल्या नैसर्गिक प्रणाली आणि संसाधनांमधील विविधता समजून घेण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांना देशाचा मोठा प्राकृतिक नकाशा काढायला किंवा वापरायला सांगावे. नद्या, जंगले, वाळवंटे आणि पर्वतरांगा यांसारख्या प्रमुख नैसर्गिक प्रणाली दर्शवण्यासाठी ते चिन्हे आणि रंग यांचा वापर करतील. त्यानंतर ते खनिजे, कोळसा किंवा विशिष्ट कृषी पिके यांसारखी महत्त्वाची नैसर्गिक संसाधने कोठे आढळतात हे नकाशावर चिन्हांकित करतील. यावर वर्गात चर्चा करावी.
नैसर्गिक अधिवासांना भेट - जंगल: स्थानिक जंगलाला भेट द्या आणि त्याची रचना, वर्षभरातील हवामान व त्यातील विविध अधिवास यांची सर्वसाधारण माहिती घ्या. विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखा. अन्नसाखळ्या आणि प्रजातींमधील परस्परावलंबित्व समजून घ्या. शक्य असल्यास, तुम्ही पाहत असलेल्या परिसंस्थेचा विस्तार आणि व्याप्ती समजून घ्या, एक कच्चा नकाशा काढा आणि त्यात हे अधिवास दाखवा.
नैसर्गिक अधिवासांना भेट – नद्या किंवा पाणथळ जागा: स्थानिक नदी किंवा पाणथळ जागेला भेट द्या आणि तिची रचना, वर्षभरातील हवामान व त्यातील विविध अधिवास यांची सर्वसाधारण माहिती घ्या. विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखा. अन्नसाखळ्या आणि प्रजातींमधील परस्पर-अवलंबित्व समजून घ्या. शक्य असल्यास, तुम्ही पाहत असलेल्या परिसंस्थेचा विस्तार आणि व्याप्ती समजून घ्या, एक कच्चा नकाशा काढा आणि त्यात हे अधिवास दाखवा.
नैसर्गिक अधिवासांना भेट – गवताळ प्रदेश: स्थानिक गवताळ प्रदेशाला भेट द्या आणि त्याची रचना, वर्षभरातील हवामान व त्यातील विविध अधिवास यांची सामान्य माहिती घ्या. विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखा. अन्नसाखळ्या आणि प्रजातींमधील परस्पर-अवलंबित्व समजून घ्या. शक्य असल्यास, तुम्ही पाहत असलेल्या परिसंस्थेचा विस्तार आणि व्याप्ती समजून घ्या, एक कच्चा नकाशा काढा आणि त्यात हे अधिवास दाखवा.
नैसर्गिक अधिवासांना भेट – वाळवंट: शक्य असल्यास वाळवंटाला भेट द्या आणि त्याची रचना, वर्षभरातील हवामान व त्यातील विविध अधिवास यांची सामान्य माहिती घ्या. विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखा. अन्नसाखळ्या आणि प्रजातींमधील परस्पर-अवलंबित्व समजून घ्या. शक्य असल्यास, तुम्ही पाहत असलेल्या परिसंस्थेचा विस्तार आणि व्याप्ती समजून घ्या, एक कच्चा नकाशा काढा आणि त्यात हे अधिवास दाखवा.
नैसर्गिक अधिवासांना भेट – महासागर आणि समुद्रकिनारा: शक्य असल्यास समुद्रकिनाऱ्याला भेट द्या आणि त्याची रचना, वर्षभरातील हवामान व त्यातील विविध अधिवास यांची सामान्य माहिती घ्या. विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखा. अन्नसाखळ्या आणि प्रजातींमधील परस्पर-अवलंबित्व समजून घ्या. शक्य असल्यास, तुम्ही निरीक्षण करत असलेल्या परिसंस्थेचा विस्तार आणि व्याप्ती समजून घ्या, तिचा एक कच्चा नकाशा काढा आणि त्यात विविध अधिवास दाखवा.
प्रकल्प - प्रजाती आणि अधिवास यांचा मेळ: स्थानिक प्रजाती आणि त्यांचे विशिष्ट अधिवास यांच्यातील परस्पर-अवलंबित्व समजून घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. वरील भेटींसाठी निवडलेल्या अधिवासांपैकी एका ठिकाणची एक स्थानिक प्रजाती प्रत्येक विद्यार्थी निवडेल. ते एक अहवाल किंवा माहिती-पत्रक तयार करतील; त्यामधे त्या प्राण्याचे चित्र, त्याचा अधिवास, अन्नसाखळीतील त्याचे स्थान, परस्पर-अवलंबित्व, आणि त्या वातावरणाशी त्याने विकसित केलेली जुळवून घेण्याची पद्धत / अनुकूलन यांचा समावेश असेल. यानंतर वर्गात या सर्व प्रजातींवर चर्चा करावी. अभ्यासक्रमातील 'स्थानिक प्रजाती' आणि 'अधिवास नष्ट होणे' या संकल्पनांशी सांगड घालावी. त्या अधिवासाला असलेल्या धोक्यांवरही चर्चा करावी.
प्रकल्प - "मानवनिर्मित जाळ्यांचा" मागोवा घेणे: मानवनिर्मित पायाभूत सुविधांची व्याप्ती आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेणे हा याचा उद्देश आहे. विद्यार्थी लहान गटांमध्ये अभ्यासासाठी एक मानवनिर्मित जाळे निवडतील (उदा. महामार्ग, रेल्वेमार्ग, सिंचन जाळे, पाणीपुरवठा व्यवस्था, वीज निर्मिती व वितरण, सांडपाणी व्यवस्था, स्थानिक कचरा व्यवस्थापन प्रणाली इत्यादी). नकाश्यांचा वापर करून ते या प्रणालीचा मार्ग शोधतील, शेकी तेढे प्रत्यक्ष निरीक्षण व नोंदी करतील. ती उभारण्यासाठी व तिची देखभाल करण्यासाठी लागणारे साहित्य व ऊर्जा यांविषयी माहिती मिळवतील. तसेच, या जाळ्याचा सामायिक संसाधने आणि जमिनीचा वापर यांवर होणाऱ्या परिणामांबाबतही ते चर्चा करतील.
कृतीपुंज ४: आपली पर्यावरणीय आव्हाने आणि आपली जबाबदारी
प्रकल्प - शाळेचे कचरा-परीक्षण आणि कृती आराखडा: यामध्ये विद्यार्थी शाळेतील कचरा निर्मिती आणि पुनर्वापर याबद्दल शिकतील. यासाठी ते कचऱ्याचे प्राथमिक ऑडिट करतील आणि त्यावर उपाय सुचवतील. एका आठवड्यासाठी किंवा त्याहून अधिक काळ, शाळेतील कचऱ्याचे विविध प्रकारांमध्ये (उदा. कागद, प्लास्टिक, सेंद्रिय कचरा) वर्गीकरण करणे आणि त्याचे वजन करणे ही जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. ते त्यांच्या निरीक्षणांचा तक्ता तयार करतील आणि तो वर्गात किंवा विद्यार्थी-सभेत सादर करतील. अंतिम उपक्रम म्हणून, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, आणि पुनर्प्रक्रिया करणे याबाबत अधिक प्रभावी योजना तयार करण्यास मदत करतील.
प्रकल्प - "प्रदूषण पोलीस": विद्यार्थ्यांना प्रदूषणाची मूलभूत माहिती समजून घेण्यास काही साधे प्रयोग करायला द्यावे. उदा. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण तपासण्यासाठी विद्यार्थी साधे प्रयोग करू शकतात. उदाहरणार्थ, धूळ गोळा करण्यासाठी ते शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चिकट कार्ड् ठेवू शकतात आणि त्यातील निरीक्षणांची तुलना करू शकतात. स्थानिक जलस्रोतामधील प्रदूषके तपासण्यासाठी मुले साध्या चाचणी संचांचा वापर करू शकतात. या प्रत्यक्ष कृतीमुळे प्रदूषणाची अमूर्त संकल्पना समजण्यास सोपी आणि मूर्त होते. ध्वनी प्रदूषण – एखाद्या मोबाईल ॲपद्वारे आवाजाची पातळी (डेसिबलमध्ये) मोजली जाऊ शकते आणि सरकारी नियमांनुसार असलेल्या मर्यादित पातळीशी तिची तुलना करावी. या इयत्तेत कोणती साधने किंवा प्रयोग योग्य ठरतील हे ठरवण्यासाठी शिक्षकांनी विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी.
प्रकल्प - "येथे पूर्वी काय होते?" : आपल्या परिसरातील जमीन-वापरात झालेल्या बदलांचा शोध घेणे. विद्यार्थी त्यांच्या घराच्या, शाळेच्या, शेताच्या आणि इतर परिसरातील जमिनीला भेट देतील आणि तेथील ज्येष्ठांच्या मुलाखती घेऊन विचारतील की, "येथे पूर्वी काय होते?" यातून त्यांना हे समजण्यास मदत होईल की, काळाच्या ओघात जमिनीच्या वापरात कसे बदल होतात – जे सहसा मानवाच्या फायद्यासाठी आणि निसर्गापासून दूर जाणारे असतात. याबद्दल वर्गात चर्चा करावी.
प्रकल्प - "संवर्धन योद्धा" संशोधन: पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल, त्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींबद्दल विद्यार्थी माहिती घेतील. यामध्ये अभयारण्ये व वने येथे काम करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांद्वारे केले जाणारे प्रदूषण मापन आणि नियंत्रण, स्वयंसेवी संस्था व व्यक्तींद्वारे केले जाणारे कचरा संकलन, प्रक्रिया आणि पुनर्वापर, तसेच स्थानिक/राज्य/केंद्र सरकारच्या विविध विभागांद्वारे केले जाणारे पर्यावरण संरक्षण कार्य इत्यादींचा समावेश असू शकतो. प्रत्येक विद्यार्थी संवर्धनाच्या एका वेगळ्या पैलूवर संशोधन करू शकेल; उदाहरणार्थ - राष्ट्रीय किंवा राज्य उद्यान, आदिवासी समुदायाची वन संरक्षण पद्धत (उदा. 'देवराई' किंवा पवित्र वनराई), एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे कार्य किंवा सरकारी संस्था. ते त्यांचे निष्कर्ष पोस्टर्स, सादरीकरण किंवा अहवालाच्या स्वरूपात सादर करतील; यामध्ये त्यातील इतिहास, सहभागी व्यक्ती किंवा गट, कार्यपद्धती, त्यांचे कार्य आणि या प्रयत्नांचा चांगला परिणाम यांवर प्रकाश टाकला जाईल.
कृतीपुंज ५: कला आणि निसर्गसौंदर्य
प्रकल्प - "निसर्गातील रचना" स्केचबुक: या वयात, विद्यार्थी निसर्गातील गणितीय व सौंदर्यात्मक पैलू समजून घेऊ शकतात. याची सुरुवात बारीक निरीक्षण करून आणि चित्र काढून होऊ शकते. त्यांनी एक छोटे स्केचबुक घ्यावे आणि त्यात निसर्गातील विविध रचनांची (पॅटर्न्सची) चित्रे काढण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, पानांवरील शिरा, फुलांमधील सममिती, गोगलगाईच्या कवचाचा सर्पिलाकार किंवा कोळ्याच्या जाळ्याची गुंतागुंतीची रचना यांचे ते निरीक्षण करू शकतात. या कृतीतून त्यांना निसर्गातील नाजुक, सहज लक्षात न येणाऱ्या तपशीलांमधील सौंदर्य नक्कीच बघावयास मिळेल.
"परिसंस्थेचा आवाज" - रचना: परिसंस्थेचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थी तेथील वेगवेगळे आवाज ऐकू शकतात आणि त्या अनुभवाचे सर्जनशील रचनेत रूपांतर करू शकतात. उदा. संपूर्ण वर्गाने एखाद्या नैसर्गिक ठिकाणी (उदा. टेकडी, जंगल, गवताळ प्रदेश किंवा तलाव) जाऊन पाच मिनिटे (किंवा जास्त वेळ) शांत बसावे. त्यानंतर, ऐकलेल्या आवाजांचे प्रतिनिधित्व करणारी चिन्हे काढून ते एक "ध्वनी-नकाशा" तयार करतील (उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ, भुंग्याचा किंवा मधमाशीचा गुणगुणणारा आवाज). शक्य असल्यास, हे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी कोणीतरी त्यांना मदत करावी. वर्गात परतल्यावर, या ध्वनी-नकाशाचा वापर करून ते एखादी छोटी संगीत रचना तयार करू शकतात किंवा त्या आवाजांचा समावेश असलेली वर्णनात्मक कथा किंवा कविता लिहू शकतात.
"माझ्या राज्याची/देशाची निसर्गदृश्ये/भूचित्रे" - कला दालन: आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या विविध नैसर्गिक परिसंस्थांचे सौंदर्य समजून घेऊन ते कलात्मक अभिव्यक्तीद्वारे इतरांना दाखवित येईल. विद्यार्थी त्यांनी अभ्यासलेल्या नैसर्गिक परिसंस्थांपैकी एकाची (उदा. स्थानिक पर्वत रांगा, नद्या, जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंट, समुद्रकिनारा आणि महासागर) निवड करतील आणि त्याचे कलात्मक चित्रण करतील. ते कोणत्याही माध्यमाचा (चित्रकला, कोलाज, नैसर्गिक साहित्यापासून बनवलेले शिल्प) वापर करू शकतात; परंतु त्या विशिष्ट निसर्गदृश्याचे सौंदर्य, रंग आणि पोत आपल्या स्वतःच्या शैलीत टिपणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प झाल्यावर इतरांसाठी याचे प्रदर्शन भरविता येईल.
प्रकल्प - "साहित्यातील निसर्ग" : विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाला अनुसरून अनेक पुस्तके – कादंबऱ्या, कथा, नाटके, कविता, कॉमिक्स – उपलब्ध करून दिली जावीत. या पुस्तकांमध्ये या वर्षीच्या अभ्यासक्रमातील घटकांशी – जसे की अधिवास, विशिष्ट अधिवासांवर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजाती, नैसर्गिक परिसंस्था, मानव-निसर्ग संबंध, मानवनिर्मित जाळे, तसेच आपले अन्न/निवारा/वस्त्र/पाणी आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध इत्यादी – असलेले दुवे शोधण्याचा प्रयत्न करावा. मुलांनी त्यांना आवडणारे भाग अधोरेखित करावे. त्यानंतर, तो विशिष्ट भाग वाचण्यासाठी आणि तो तुम्हाला का आवडला हे सांगण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांसोबत एक सत्र आयोजित करा.
प्रकल्प - “चित्रांमधील निसर्ग”: निसर्गाचे चित्रण करणारी अनेक निसर्गचित्रे (लँडस्केप्स) असलेल्या एखाद्या चित्र-संग्रहालयाला भेट द्या. तसेच, वर्गात निसर्गाचे चित्रण असलेल्या जगप्रसिद्ध चित्रांचे व लघुचित्रांचे 'स्लाईड शो'द्वारे सादरीकरण करा. या चित्रांचा संबंध अभ्यासक्रमातील विविध घटकांशी—जसे की विशिष्ट प्रजाती, मानव-निसर्ग संबंध, अधिवास आणि परिसंस्था—जोडण्यासाठी वर्गात चर्चा घडवून आणा.
एकत्रीकरण: तसेच, वर्षाच्या शेवटी एक एकत्रित उपक्रम राबवावा. या उपक्रमातून या गोष्टीवर भर दिला जावा की, पृथ्वी हा जीवसृष्टीला आधार देणारा एकमेव माहित असलेला ग्रह आहे आणि आतापर्यंत आपल्याला असा दुसरा कोणताही ग्रह माहित नाही. अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असावी? हा उपक्रम विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व सादर केलेल्या नाटकाच्या स्वरूपात, एखाद्या प्रकल्पाच्या स्वरूपात किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना मांडलेल्या आहेत अशा भाषणांच्या स्वरूपात असू शकतो. यात परिसरातील एखाद्या ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञांशी संवाद साधणे किंवा त्यांना आमंत्रित करणे यांचाही समावेश करता येईल, जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन समजून घेता येईल.