top of page
कसे शिकायचे आहे : इयत्ता तिसरी

 

योगेश पाठक

 

 

तिसरीसाठी कृतींचे चार मुख्य पुंज खाली दिले आहेत.
 

पालक व निसर्ग-शिक्षक यांनी शालेय वर्षाच्या सुरूवातीस भेटावे. शाळेचे वार्षिक वेळापत्रक, गावाचे वार्षिक वेळापत्रक (उदा. ऋतू, सुट्या, सण, शेतकाम, सुगीचा व इतर हंगाम), तज्ज्ञांची उपलब्धता, या सर्वांचा विचार करून, या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षणाचे एक वार्षिक वेळापत्रक आखावे.


खालील कृती उदाहरणादाखल दिल्या आहेत. पालक व शिक्षक यातून काही कृती कमी करू शकतात, त्या बदलू शकतात, किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन कृती व उपक्रम यांचा अंतर्भाव करू शकतात.

 

 

कृतीपुंज १: गोष्ट – जैवविविधता आणि उत्क्रांतीची

 

वर्गातील चर्चा आणि तक्ते पाहणे – अगदी सुरुवातीची पृथ्वी: पृथ्वीच्या सुरुवातीची कालरेषा मुलांना दाखवून पृथ्वीवरील समुद्र, कवच, आणि वातावरण यांची निर्मिती कशी झाली त्याबद्दल चर्चा करावी.

 

वर्गातील चर्चा – जीवन कसे सुरू झाले: पृथ्वीवर जीवन सुरु होण्याच्या ज्या वेगवेगळ्या शक्यता सांगितल्या गेल्या आहेत त्या चित्रे/प्रारूपे याद्वारे वर्गात दाखवाव्या. साधी शरीररचना असलेले जीव कसे उत्क्रांत झाले व त्यांच्यापासून जास्त जटिल शरीररचना असलेले जीव कसे उत्क्रांत झाले याबद्दल ढोबळ मानाने चर्चा करावी.

 

वर्गातील चर्चा – जीवनाची कालरेषा:  पृथ्वीवरील जीवनाची एकंदर कालरेषा मुलांना दाखवावी. त्यातील वेगवेगळे कालखंड, त्यावेळचे जीव (वनस्पती व प्राणी) यांची उदाहरणे द्यावी, चित्रे दाखवावीत.

 

क्षेत्रभेट – ह्याचे वय काय? : अनेक झाडे असलेल्या ठिकाणी जा (शक्यतो अपुष्प व सपुष्प दोन्ही), सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, कीटक या सर्वांना बघा आणि प्रथम हा प्रश्न विचारा की ते (त्यांचा गट किंवा प्रजाती) पृथ्वीवर कधीपासून आहेत? त्यांचा पृथ्वीवरील कालखंड आणि कपी व मानव यांचा कालखंड याची तुलना करा. वर्गात आल्यावर सगळे मिळून एक मोठा तक्ता तयार करा – जीवनाची कालरेषा: यात दिसलेले सर्व सजीव आणि त्यांच्या कालखंडाची सुरुवात दाखवा.

 

वर्गातील चर्चा – उत्क्रांती: उत्क्रांतीची संकल्पना २-३ विशिष्ट गटांची उदाहरणे घेऊन समजावून द्या उदा. मासे, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, किंवा पक्षी. उत्क्रांती ही एक दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया आहे आणि ती अजूनही चालू आहे हे अधोरेखित करा.

 

डार्विन आणि वॉलेस यांच्यावर एक नाटक: डार्विन आणि वॉलेस यांच्या जीवनातील मुख्य टप्पे, त्यांचे उत्क्रांती या विषयातील योगदान याची वर्गात चर्चा करा. काही मुलांना या सर्व माहितीवर आधारीत एक छोटे नाटक  लिहायला सांगा. त्यात डार्विनचा दक्षिण अमेरिकेतील प्रवास किंवा वॉलेसचा आग्नेय आशियातील प्रवास यातील प्रसंग, त्यांनी उत्क्रांतीसंबंधित आपली अनुमाने कशी काढली, काय माहिती गोळा केली, काय निष्कर्ष काढले, त्यांनी ते कधी व कुठे सादर केले, हे प्रसंग असू शकतात.

 

वर्गातील चर्चा – जीवाश्मे गोष्टी सांगतात: जीवाश्मे कशी तयार होतात, जीवाश्मांमधून आपल्याला काय समजते याची चर्चा करा. ४-५ जीवाश्मांची उदाहरणे घ्या. शक्य झाल्यास वर्गात जीवाश्मांचे नमुने आणा किंवा ते वस्तुसंग्रहालयात जाऊन बघा.

 

क्षेत्रभेट – पक्ष्यांची उत्क्रांती: पुन्हा एकदा पक्षीनिरीक्षणास चला, पण यावेळेस उत्क्रांतीचा चष्मा लावा. परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती कोणत्या, त्यांचे ‘कुटुंब’ कोणते, या कुटुंबांचे मुख्य निदर्शक (उदा. शरीररचनेतील) कोणते याची पडताळणी करा. वर्गात आल्यावर पक्ष्यांच्या उत्क्रांतीवर सविस्तर चर्चा करा. 

 

वर्गातील चर्चा – डायनोसॉरची गोष्ट: शिक्षकांनी डायनोसॉरची जीवाश्मे/ त्यांचे फोटो / प्रतिरुप तसेच वैज्ञानिक निबंध याआधारे डायनोसॉरचा काळ, तेव्हाची पृथ्वी आणि सृष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर, त्यांचे अन्न, आणि त्यांचे वर्तन या सर्वांवर चर्चा करावी. आपल्या देशात/ राज्यात/ परिसरात कधी डायनोसॉरची जीवाश्मे सापडली आहेत का, त्यांचा काळ कुठला होता, याबद्दल बोलणे करावे. डायनोसॉरची एक काल-रेषा फळ्यावर काढावी. डायनोसॉर लयास का गेले याबद्दलची मते नमूद करावीत. जमल्यास डायनोसॉरची जीवाश्मे/ प्रतिरुप असलेल्या एखाद्या संग्रहालयास भेट द्यावी.

 

मातीकाम – डायनोसॉर: चिकणमातीपासून वेगवेगळे डायनोसॉर बनवा. यासाठी डायनोसॉरचे वेगवेगळे प्रकार व त्यांची नावे असलेले पुस्तक लागेल किंवा इंटरनेटवर ही माहिती बघता येईल.

 

वर्गातील चर्चा – माणसाची उत्क्रांती: प्राचीन मानव व त्याचे पूर्वज यांच्या अस्तित्वाबद्दल जीवाश्मे, चिखलात पडलेल्या व नंतर खडकात समाविष्ट झालेल्या पाऊलखुणा, कवट्या, असे अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यांची चर्चा करा, उदाहरणे द्या. इतर कपी (उदा. ओराँगउटान) यांच्याशी मानवाची तुलना करुन शरीर रचनेतील साम्य व फरक समजावून द्या. माणूस प्राचीन कपींपासून उत्क्रांत झाला हे अनुमान व पुरावे यावर चर्चा करा. परंतु उत्क्रांती होत असताना माणसात जे वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले त्यांचीही नोंद घ्या. उदा.: गुंतागुंतीचे ज्ञान मिळविणे व वापरणे, भाषा, अग्नीवर नियंत्रण मिळवणे, अधिवासात बदल घडवण्याची तसेच वस्तूंची निर्मिती करण्याची क्षमता असणे, कल्पनाशक्ती, विश्वास व समज, सहकार्य, स्थलांतर, इत्यादी.

 

आपल्या पूर्वज प्रजाती व आपण – एक नाटक: मुलांना अशी कल्पना करायला सांगा की एक प्राचीन आदीमानव-पूर्व किंवा आदीमानव-सदृश कपी व तिचे मूल हे एका नदी काठावरून चालत आहेत. त्यांच्या पाऊलखुणा तिथल्या चिखलात उमटल्या. चिखलाचे स्तर घट्ट झाल्याने हजारो वर्षात तिथे खडक किंवा घट्ट माती तयार झाली, आणि पाऊलखुणांचे जीवाश्म तिथे तयार झाले. आधुनिक काळात एक शास्त्रज्ञ तिथे जीवाश्म शोधत येते. तिला त्या पाऊलखुणा दिसतात. त्या पाऊलखुणा कोणाच्या असाव्यात, व ते कुठून कुठे, कशासाठी जात असावेत याचा अंदाज बांधायचा ती प्रयत्न करते. या दोन्ही प्रसंगांची गुंफण करणारे नाटक लिहा व सादर करा.

 

वर्गातील चर्चा – प्रजाती नामशेष होणे: प्रजाती नामशेष होणे म्हणजे काय? नैसर्गिकरीत्या अनेक प्रजाती पूर्वी नामशेष झाल्या आहेत का? किती वेळा? ते का झाले? ते होण्यासाठी किती कालखंड लागला? मानवी कृतींमुळे प्रजाती संपत आहेत का? उदा. वुली मॅमथ सारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार, भारतातील चित्ता.

 

ज्यांची प्रजाती पृथ्वीवरून संपली आहे अशा प्रमुख प्रजातींची चित्रे काढा: वुली मॅमथ, डोडो, गुलाबी डोक्याचे बदक अशा ७-८ प्रजातींची माहिती द्या व मुलांना त्यांची चित्रे काढायला सांगा. वर्गात एक पृथ्वीचा गोल आणून हे प्राणी पृथ्वीवर दिसत होते तेव्हा ते कुठल्या प्रदेशात रहात होते ते दाखवा.

 

 

 

* कृतीपुंज २: माणसाची कहाणी : भाग १ – निसर्ग आणि माणूस – सुरुवातीचे दिवस

 

वर्गातील चर्चा – मानवांमधील परस्परसहकार्य: कल्पना करा की एक लाख वर्षापूर्वी राहणारे तुम्ही ५ मानवांचा एक गट आहात – विशीतले एक जोडपे, त्यांच्यासोबत ३ वर्षांचे बाळ, १ वृद्ध व्यक्ती आणि १ किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी (बहुधा त्याचे आईबाप पूर्वीच मृत्यू पावले आहेत). जोराचा पाऊस आणि पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांपासून, श्वापदांपासून, कीटकांपासून, विषारी सापांपासून, परजीवींपासून वाचण्याचे ते कसे प्रयत्न करतील यावर विचार आणि चर्चा करा. मानवी अधिवासाचे व सवय मूळ कशात आहे? यावर चर्चा करा उदा. शिजवलेले/भाजलेले अन्न, घरे, कपडे, स्वच्छता, स्वच्छ पाणी, अग्नी, वेगवेगळी अवजारे-हत्यारे यांचा प्राचीन मानवास कसा उपयोग झाला? परस्परसहकार्य आणि भाषेने प्रगती आणि जगण्यास कशी मदत केली यावर चर्चा करा.

 

क्षेत्रभेट, प्रात्यक्षिक आणि चर्चा – भाषेबद्दल: क्षेत्रभेटीदरम्यान, शक्य तितक्या पक्ष्यांचे आणि सस्तन प्राण्यांचे आवाज ऐका आणि त्यांची नोंद करा. वर्गात परत आल्यावर, इतर पक्ष्यांचे (अधिक प्रगत ध्वनी काढू शकणारे) आणि कपींचे ध्वनिमुद्रित केलेले आवाज ऐका. या सर्व ध्वनींच्या रचनेवर चर्चा करा - त्यांचे प्रकार, शब्दसंग्रह आणि अर्थ, विविधता, त्यांच्या भाषा म्हणून काही मर्यादा, परस्पर सहकार्यातील त्याचा उपयोग इत्यादी. हे ध्वनी प्राचीन मानवाच्या आवाजासाठी एक प्रेरणा ठरले असतील का? त्यांचा पुढे भाषा म्हणून कसा विकास झाला असेल? यावर चर्चा करा.

 

छोटे प्रात्यक्षिक - इतर मानवसदृश कपींबरोबरचे सहअस्तित्व (प्राथमिक, निएंडरथलचे उदाहरण घेऊन): अनेक मानवसदृश कपींची उत्क्रांती एकाच वेळी झाली आणि ती केवळ मानवापुरती मर्यादित नव्हती, हे निदर्शनास आणा. इतर मानवसदृश कपींच्या जीवाश्मांचे पुरावे दाखवा. निएंडरथल आणि मानवाचे पृथ्वीच्या भूभागावरील वितरण नकाशांच्या आधारे दाखवा. मानवाशी संभाव्य संघर्षांच्या संदर्भात निएंडरथलवर अधिक तपशीलवार चर्चा करा.

 

क्षेत्रभेट आणि जेवण – प्राचीन मानवाचा आहार: थेट निसर्गातून अन्न गोळा करा आणि ते मूलभूत साधनांचा वापर करून शिजवा. उदा. शेकोटी आणि साध्या कापण्याच्या/वाटण्याच्या साधनांचा व भांड्यांच्या समतुल्य काही साधनांचा वापर करा. शक्यतो, प्राचीन मानवास उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साहित्यापासून ते बनवा. अन्नाची चव घ्या आणि त्याची आजच्या पोषणाशी तुलना करा. प्राचीन मानवाने स्वयंपाकासाठी वापरलेल्या तंत्रांवर चर्चा करा.

 

प्राचीन मानवांची अवजारे/हत्यारे: चिकणमातीचा, दगडांचा, किंवा फांद्यांचा वापर करून प्राचीन मानवांच्या दगडी हत्यारांसारखी अवजारे/हत्यारे बनवा आणि त्यांच्या वापराविषयी चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा - अग्नी आणि त्याचे विविध उपयोग: पुराव्यांच्या आधारे, नैसर्गिक अग्नीचा सुरुवातीचा वापर कसा सुरू झाला, तो कशासाठी वापरला जात होता, प्राचीन मानवांनी अग्नीवर नियंत्रण कधी मिळवले आणि त्याचा वापर कसा विस्तारत गेला, यावर चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा आणि क्षेत्रभेट - वस्त्या आणि जलस्रोतांची भूमिका: परिसरातील नदीजवळ राहणाऱ्या आणि काही बाबतीत नदीवर अवलंबून असलेल्या समुदायांना भेट द्या. ते नदीकडे कसे पाहतात, त्याबद्दल त्यांचे काय मत आहे, नदी त्यांच्यासाठी काय करते, हे विचारा. वर्गातील चर्चेदरम्यान, नदीजवळच्या सुरुवातीच्या प्राचीन मानवी वस्त्यांची कल्पना करा, त्याबद्दल बोला.

 

वर्गातील चर्चा – साधी यंत्रे: वारंवार करावी लागणारी कामे इतर साधने वापरून करण्याची तीव्र इच्छा मानवास असते. कामे सोपी करण्यासाठी प्राचीन मानवाने तंत्रज्ञान विकसित केले. या मुद्यांवर तसेच चाक, तरफ, पूल, रस्ते यांसारख्या सुरुवातीच्या साध्या यंत्रांवर किंवा रचनांवर चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा आणि क्षेत्रभेट - प्राचीन मानवांचा झाडांवर झालेला परिणाम: पाणी गरम करणे आणि स्वयंपाक करणे याला लागणाऱ्या ऊर्जेसाठी मुख्यत: सरपणाचा वापर करणाऱ्या घरांना/समुदायाला भेट द्या. त्यांना दरमहा किती सरपण लागते आणि ते सरपण कुठून मिळवतात याबद्दल विचारा. प्राचीन मानवाचा सरपणाचा वापर किती होता याबद्दल काल्पनिक लोकसंख्येची आकडेवारी ठरवून अंदाज करा. सरपणासाठी कोणत्या प्रकारची झाडे आणि गवत उपयोगी आहेत यावर चर्चा करा. परिसराचे निरीक्षण करा आणि या वनस्पतींची  कुठल्या प्रमाणात तोड केली जात आहे ते पाहा. प्राचीन मानवाचा परिसरातील निसर्गावर काय परिणाम झाला असेल याबद्दल चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा आणि आणि प्रात्यक्षिक – प्राचीन मानवांच्या शिकारीचा प्राण्यांवर झालेला परिणाम: लहान सस्तन प्राणी, मोठे सस्तन प्राणी, पक्षी, मासे यांसारख्या इतर प्रजातींवर शिकारीचा झालेला परिणाम. भूतकाळातील आणि वर्तमानातील लहान सस्तन प्राण्यांच्या शिकारीची, मोठ्या सस्तन प्राण्यांच्या शिकारीची उदाहरणे घ्या आणि त्याचा प्राण्यांच्या लोकसंख्येवर कसा परिणाम होतो, ज्यामुळे ते नामशेष होऊ शकतात, हे स्पष्ट करा.

 

व्याख्यान आणि चित्रकला तास - प्राचीन मानवांची कला आणि गुहांमधील त्याचे पुरावे: प्राचीन गुहांची उदाहरणे आणि त्या गुहांमधील कलाकृतींचे प्रात्यक्षिक दाखवा. त्या दृश्यांमध्ये चित्रित केलेल्या घटनांवर, त्या काळात अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या पुराव्यांवर चर्चा करा. विद्यार्थ्यांनी गुहेच्या भिंतींवर पाहिलेल्या कलाकृतींप्रमाणे स्वतःच्या कल्पनाशक्तीने चित्रे काढावीत. अशा गुहा किंवा कातळशिल्पे जवळ कुठे असतील तर तिथे भेट द्यावी.

 

जगभरातील प्राचीन मानवांचे स्थलांतर: जगभरातील प्राचीन मानवांचे स्थलांतर व त्याचे कालखंड नकाशाच्या आधारे दाखवा. इतर मानवसदृश कपींचे पृथ्वीवरील अस्तित्व, वितरण,  आणि त्यांच्या नामशेष होण्यावर थोडक्यात माहिती द्या.

 

व्याख्यान आणि वर्गातील चर्चा: आदिम आणि वर्तमान जनसमूह/जमातींमधील मिथककथा आणि देवत्व, आणि या मिथककथा व देवत्वामध्ये निसर्गाची भूमिका.

 

* कृतीपुंज ३: माणसाची कहाणी : भाग २ -  शिकारी-अन्नसंकलकांपासून शेतकरी, पशुपालक आणि आजच्या औद्योगिक जीवनशैलीपर्यंतचा आपला प्रवास

 

वर्गातील चर्चा – आपले संक्रमण : शिकारी व अन्नसंकलक अवस्थेतून पशुपालक आणि शेतीकडे झालेला आपला संक्रमणकाळ. या संक्रमणातून आपण काय मिळवले आणि काय गमावले? याचा आपल्यावर काय परिणाम झाला? आपल्या लोकसंख्येचे काय झाले? हे संक्रमण कधी आणि कुठे सुरू झाले?

 

वर्गातील चर्चा – प्राण्यांचे पाळीव होणे म्हणजे काय?: पुन्हा पुन्हा करायला लागणारी कामे दुसऱ्याकडून करून घेण्याची जी मानवाची गरज व प्रवृत्ति आहे त्यावर चर्चा करा. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कुत्रे, मेंढ्या, शेळ्या, म्हशी, गाई आणि घोडे हे प्राणी पाळीव कसे झाले असतील त्यावर चर्चा करा. आपल्याला या प्राण्यांकडून काय मिळते आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळते? पाळीव प्राण्यांच्या जीवनाची तुलना त्यांच्याच वन्य बांधवांच्या (जंगली प्रजातींच्या) जीवनाशी करा. काही तुलनात्मक उदाहरणे सादर करा.

 

वर्गातील चर्चा आणि क्षेत्रभेट – जमिनीच्या वापरावरील मानवाचा परिणाम: सर्वप्रथम, जगाच्या विविध भागांत उदयाला आलेल्या प्राचीन गावांवर आणि शहरांवर चर्चा करा. क्षेत्रभेटीसाठी, जवळच्या एखाद्या गावाला भेट द्या आणि तेथील घरे, रस्ते व सार्वजनिक इमारतींनी किती चौरस मीटर जागा व्यापली आहे, याचे मोजमाप करा. त्यानंतर, हेच मोजमाप एखाद्या उपनगरासाठी आणि पुढे संपूर्ण शहरासाठी करा. सदर गाव, उपनगर आणि शहर वसण्यापूर्वी तिथे कोणत्या प्रकारचे नैसर्गिक भूरूप (नैसर्गिक परिसर) अस्तित्वात असावे, यावर चर्चा करा. अधिवास नष्ट झाल्यामुळे इतर प्रजातींवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा - कुळे/जमाती: प्राचीन मानवांनी स्वतःचे संघटन भटक्या किंवा अर्ध-भटक्या जमातींमध्ये कसे केले असावे, यावर वर्गचर्चा करा; त्यानंतर शेतीचा प्रारंभ झाल्यावर अधिक स्थिर वसाहती कशा निर्माण झाल्या, यावरही चर्चा करा. जमातींमधील परस्परविश्वास, जमाती-जमातींमधील अविश्वास आणि त्यांच्यातील संभाव्य परस्परसहकार्यावर, संवादांवर चर्चा करा. मानवी समुदाय आणि गावांमध्ये सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या सामाजिक रूढींवर आणि नियमांवर चर्चा करा.

 

व्यापार – एक नाटक: विविध काल्पनिक प्रसंगांच्या आधारे एक नाटिका तयार करा. यातून शिकारी-अन्नसंकलक मानवांमध्ये सुरू झालेला व्यापाराचा प्राथमिक टप्पा दाखवा; तसेच विविध प्रकारच्या अतिरिक्त उत्पादनाच्या आधारे हा व्यापार पशुपालकांपर्यंत आणि पुढे शेतकऱ्यांपर्यंत कसा विस्तारला, हेही दाखवा. यामध्ये 'पैशाच्या' संकल्पनेचा उगम कसा झाला, याचाही समावेश करा.

 

क्षेत्रभेट – गावातील बाजारपेठ: शक्य असल्यास, जवळच्या एखाद्या गावातील बाजारपेठेला भेट द्या आणि तिथे कुठल्या वस्तूंची खरेदी-विक्री होते, ते प्रत्यक्ष पहा. त्यानंतर वर्गात परतल्यावर यावर चर्चा करा.

 

वर्गातील चर्चा - कौशल्ये आणि व्यवसायांची निवड: गावात कुठकुठले व्यवसाय असतात, त्यासाठी कुठली कौशल्ये लागतात यावर चर्चा करा; तसेच या सामाजिक रचनेमध्ये शेतकऱ्याची भूमिका काय असते (त्याला मिळणाऱ्या सेवा आणि तो वाटून देत असलेले अतिरिक्त उत्पादन), यावरही चर्चा करा.

 

कुंभारवाडा/ कुंभारआळीस भेट: 'कुंभारकाम' हे एका कुशल व्यवसायाचे उदाहरण म्हणून बघू या. यासाठी लागणारा कच्चा माल, कामाची प्रक्रिया, तयार होणाऱ्या वस्तू आणि ग्राहक (आजचे व भूतकाळातील) यांवर चर्चा करा. शक्य असल्यास, कुंभारकामात प्रत्यक्ष सहभागी व्हा.

 

वर्गातील चर्चा - सुरुवातीची घरे: प्राचीन ग्रामीण संस्कृती तसेच सिंधूसारख्या मोठ्या संस्कृतींमधील घरांचे प्रात्यक्षिक दाखवा. घरांसाठी लागणारे साहित्य नैसर्गिक घटकांपासून विटांपर्यंत कसे विकसित झाले असावे, याबद्दल विचार करा.

 

वर्गातील चर्चा – टोळ्या आणि राज्यांची सुरुवात: शेतीचे काम, कामांचे/श्रमांचे विभाजन, शेतीतील जास्त मिळालेल्या उत्पन्नाचे रक्षण करण्याची गरज यांसारख्या मुद्द्यांच्या आधारे ही चर्चा करावी.

 

वर्गातील चर्चा – प्राचीन संस्कृतींमधील हस्तकला: मणी तयार करणे, मातीची रंगीत भांडी यांसारख्या कलांचा विकास.

 

प्राथमिक चर्चा - व्यापार: सिंधू संस्कृतीसारख्या संस्कृतींमधील मापे आणि वजने, आर्थिक व्यवहारांची (चलन-आधारित व्यापाराची) सुरुवात व विकास, तसेच इतर संस्कृतींशी चाललेला समुद्री आणि जमिनीवरील व्यापार.

 

प्राथमिक चर्चा - विज्ञान (सुरुवातीचा टप्पा) आणि तंत्रज्ञानाचा विकास: धातूंचा वापर – तांबे, कांस्य, लोखंड, सोने, चांदी.

 

प्रात्यक्षिक - सुरुवातीच्या काळातील वाहतूक: जमीनीवरील, नद्यांमधील, समुद्री आणि बर्फाळ प्रदेशांमधील वाहतूक. सुरुवातीच्या संस्कृतींनी वापरलेल्या संभाव्य वाहतूक साधनांची उदाहरणे दाखवणे (उदा. होड्या, रथ, गाड्या) किंवा त्यांची चित्रे / प्रतिकृती बघणे.

 

वर्गातील चर्चा – प्रमुख नद्यांच्या काठी वसलेल्या प्राचीन संस्कृती: प्राथमिक माहिती - धरणे/जलव्यवस्थापन, शेती, हस्तकला, ​​रीतिरिवाज आणि व्यापार यांची काही उदाहरणे.

 

चर्चा - मध्ययुगीन काळ; राज्ये व साम्राज्ये टिकवून ठेवण्यात लष्कराची भूमिका: त्याचा निसर्गावर होणारा परिणाम (उदा. नौदलासाठी लाकूड, सस्तन प्राण्यांची शिकार, इंधनासाठी लाकडाची गरज) - प्राथमिक चर्चा.

 

चर्चा - आधुनिक वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान: वाफेची इंजिने, वीज, जेट इंजिने, जागतिकीकरण, प्रगत वाहतूक व बांधकाम तंत्रज्ञान, अनेकानेक मानवनिर्मित वस्तू, ऊर्जेचा वापर, माहिती तंत्रज्ञान यांचा आढावा; तसेच प्रदूषण आणि जमीन-वापरातील बदल यांसारख्या निसर्गावरील परिणामांची चर्चा.

 

उदाहरणांसह चर्चा - आधुनिक काळातील शिकारी व अन्नसंकलक समूह, आदिवासी समाज आणि त्यांचे शेतकरी, पशुपालक व औद्योगिक समाजातील मानवाशी असलेले सह-अस्तित्व.

 

माणसाची कहाणी (भाग १ आणि २) सारांश/एकत्रीकरण: हे लेखन, कथा, चित्रे आणि नाटके यांसारख्या मुक्त प्रकल्पांद्वारे करता येईल.

 

* कृतीपुंज ४: भू-जैव आकलन

 

नकाशेविषयक वर्गातील चर्चा आणि क्षेत्रभेट: आपल्या परिसराची, तसेच शहराची आणि जिल्ह्याची मूलभूत भौगोलिक समज वाढविणे. आपल्या परिसराची नीट पाहणी करून वर्गात परतणे आणि परिसराचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करणे.

 

नकाशा वाचन व नकाशाचा अभ्यास यांचा सराव: आपल्या शहराचा आणि जिल्ह्याचा नकाशा वापरून त्यातील वैशिष्ट्ये व माहिती यांवर चर्चा करणे, नकाशात विविध तपशील भरणे इत्यादी.

 

वर्गातील चर्चा – आपली जीवनशैली: यापूर्वीच्या गटातील उपक्रमांच्या आधारे, जिल्ह्यातील भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीचा तेथील जीवनपद्धती, व्यवसाय आणि सामाजिक-सांस्कृतिक बाबींशी असलेला संबंध समजून घेणे व त्यावर चर्चा करणे.

 

वर्गातील चर्चा - परिसंस्थेची संकल्पना (प्राथमिक): परिसंस्थेविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणे.

 

क्षेत्रभेटी - 'परिसंस्था': स्थानिक नैसर्गिक परिसरांना (उदा. तलाव, नदी, डोंगर/पर्वत, जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट, समुद्रकिनारा, महासागर) भेट देणे आणि त्यांना एक 'परिसंस्था' म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करणे.

 

थोडक्यात चर्चा - नैसर्गिक भूप्रदेश / भूचित्र म्हणजे विविध परिसंस्थांची आणि मानवी व्यवहाराखालील जमीन (उदा. शेते, कुरणे) यांची ‘गोधडी’  

 

भूचित्राचा नकाशा: शिक्षक शहर किंवा जिल्ह्याचा मोठा नकाशा वापरून त्यावर नैसर्गिक भूप्रदेश किंवा परिसंस्था दर्शवू शकतात -- हे घटक नकाशाच्या प्रशासकीय सीमांमध्येच बसतील असे नाही.

 

जमीन, पाणी आणि जंगले यांच्याशी मानवाचा असलेला संबंध आणि त्याचा इतिहास (उदा. मानवी संस्कृतीच्या आधीपासून अस्तित्वात असलेली नदी आणि नद्यांच्या काठावर झालेली मानवी वस्ती) यावर प्रकाश टाका – यासाठी प्रामुख्याने जिल्ह्यातील स्थानिक उदाहरणे घेतली जावीत.

 

एकत्रीकरण – वर्गातील चर्चा - स्थानिक पर्यावरणीय इतिहास: स्थानिक गाव / शहर किंवा जिल्ह्याच्या संदर्भात -  उत्क्रांतीची कथा आणि निसर्ग-माणूस संबंधांचा इतिहास यांचा आढावा घेणे.

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by EcoUniv. Proudly created with Wix.com

bottom of page