कसे शिकायचे आहे : इयत्ता दुसरी
योगेश पाठक
दुसरीसाठी कृतींचे सात मुख्य पुंज खाली दिले आहेत.
पालक व निसर्ग-शिक्षक यांनी शालेय वर्षाच्या सुरूवातीस भेटावे. शाळेचे वार्षिक वेळापत्रक, गावाचे वार्षिक वेळापत्रक (उदा. ऋतू, सुट्या, सण, शेतकाम, सुगीचा व इतर हंगाम), तज्ज्ञांची उपलब्धता, या सर्वांचा विचार करून, या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षणाचे एक वार्षिक वेळापत्रक आखावे.
खालील कृती उदाहरणादाखल दिल्या आहेत. पालक व शिक्षक यातून काही कृती कमी करू शकतात, त्या बदलू शकतात, किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन कृती व उपक्रम यांचा अंतर्भाव करू शकतात.
कृतीपुंज १: निसर्गाचे घटक
-
वाऱ्याची नोंदवही किंवा फलक: एका नोंदवहीमधे किंवा वर्गातील फलकावर रोजचे स्थानिक वाऱ्याचे प्रमाण/वेग व दिशा हे मुलांनी निरीक्षण करून लिहावे. प्रत्यक्ष वेग मोजता आला नाही तर शिक्षकाच्या साहाय्याने एक साधारण मापन-श्रेणी तयार करावी. (उदा. ० - पडलेला वारा, १ - हलका वारा, २ - कमी वेगवान वारा, ३ - जास्त वेगवान वारा, ४ - वादळ). या नोंदी दर आठवड्यात एकदा वर्गात वाचून चर्चा करावी.
-
पवनमापी: यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पवनमापी मुलांना समजावून द्यावेत – शक्यतो वर्गात आणून दाखवावेत. कागदी कप आणि काड्या वापरून साधा पवनमापी वर्गात यातर करावा (याची कृती बहुधा इंटरनेट वर मिळेल)
-
पावसाचे जलचक्र: एखादे त्रिमितीय मॉडेल किंवा मोठे चित्र काढून मुलांना जलचक्र समजावून द्यावे. ढगांमधून पाऊस नक्की केव्हा व कसा पडतो ते सांगावे.
-
प्रयोग – बाटलीतले जलचक्र: एक स्वच्छ व पारदर्शक बाटली घेऊन त्यात बाष्पीभवन, संक्षेपण, आणि पर्जन्यनिर्मिती कशी होते त्याचे उदाहरण द्यावे. (याची कृती बहुधा इंटरनेट वर मिळेल)
-
पावसाचे मापन: पर्जन्यमापीची वर्गात ओळख करुन द्यावी. मुलांनी स्वतःच एक साधा पर्जन्यमापी तयार करावा. तो मोकळ्या जागी (उदा. गच्चीवर किंवा अंगणात) ठेवून वर्षभर रोज पडणाऱ्या पावसाचे मापन करावे, नोंदी ठेवाव्या. वर्षातून ४-५ वेळा या नोंदींची वर्गात चर्चा करावी.
-
वर केलेले पावसाचे मापन आणि वाऱ्याचे मापन यांची संगती लावता येते आहे का ते पहावे. असे कुठले दिवस आहेत जेव्हा पाऊसही जास्त होता आणि वाऱ्याचा वेगही जास्त होता? वादळ म्हणजे काय – त्याचे प्रकार कोणते? कुठले दिवस वादळाचे होते?
-
इथे बर्फ पडते! : स्थानिक प्रदेशात दर हिवाळ्यात बर्फ पडत असेल, तर पावसाप्रमाणे वरील शक्य त्या कृती बर्फवृष्टीसाठीही कराव्या.
कृतीपुंज २: नद्या
-
नदीचा प्रवास: शिक्षकांनी चिकणमाती/प्लास्टिक/कागदाचा लगदा व पाण्यापासून नदीचे एक त्रिमिती प्रारूप करावे. यासाठी नदीविषयक काही लेख अभ्यासावे लागतील. वर्गात या प्रारूपाच्या आधारे ‘नदीचा प्रवास’ यावर चर्चा करावी. उगमस्थानी नदी कशी दिसते, तिचा प्रवाह वेगवान असतो का? पुढच्या सपाट भागात तिचा वेग कसा बदलतो, प्रवाहाची कुठली रुपे दिसतात, गाळ कसा वाहून आणला जातो व कसा साचतो? शेवटी समुद्राला मिळताना खडी/मुख/त्रिभुज प्रदेश कसे निर्माण होतात व त्यांची वैशिष्ट्ये काय? या सगळ्याची माहिती सोदाहरण द्यावी. स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, व काही मुख्य जागतिक नद्यांची नावे व त्यांचा प्रवास याची उजळणी करावी. यासाठी नकाशे, स्लाईड्स ही साधनेही वापरावीत.
-
नदीला भेट: शक्यतो नैसर्गिक स्वरूपात असलेली, प्रदूषित न झालेली नदी बघण्यास अभ्यास सहल न्यावी. या सहलीत खालील निरीक्षणे करावी: नदीत किती पाणी आहे? ‘नदीचा प्रवास’ मध्ये हा नदीचा कुठला टप्पा आहे? नदीत जलद व कमी वेगाचे प्रवाह दिसतात का? ऋतूंप्रमाणे नदीत व तिच्या पात्रात काय फरक होतात, नदीभोवती कुठली झाडे/झुडूपे/गवते/शैवाल आहेत, नदीत व नदीभोवती कुठले प्राणी राहतात? या भागात माणूस व नदी यांचे संबंध कसे आहेत? नदीचे मानवी कृतींमुळे प्रदूषण होत आहे का?
-
नदीचा नकाशा: वर पाहिलेल्या किंवा दुसऱ्या स्थानिक नदीचा आपल्या प्रदेशातील नकाशा काढा. नदीशेजारचा भूभागही त्यात येऊ दे.
कृतीपुंज ३: प्राण्यांची हालचाल व स्थलांतर
-
हालचाल आणि गती: स्थानिक निसर्गातील कीटक, साप, सरडे, बेडूक, पक्षी, व सस्तन प्राणी यांची हालचाल बघा, त्यांची गती मोजा, नोंदी ठेवा व शक्य झाल्यास त्यांच्या हालचालीची रेखाचित्रे काढा.
-
कीटक बघू या: बहिर्वक्र भिंग घेऊन कीटकांना त्यांच्या नैसर्गिक जगात जवळून बघा. त्यांचे चालणे-वागणे याच्या नोंदी करा.
-
पक्ष्यांचे स्थलांतर (अभ्यास सहल) : आपल्या भागात स्थलांतर करून येणारे पक्षी दिसतात का, स्थलांतर म्हणजे काय, याबद्दल वर्गात बोलणे करावे. जिथे स्थलांतरित पक्षी दिसतात अशा ठिकाणी पक्षीतज्ज्ञांबरोबर अभ्यास सहल न्यावी. त्यांचे निरीक्षण करावे. आपल्या भागातील पक्षी स्थानिक स्थलांतर करतात का ते शोधावे.
-
पक्ष्यांचे स्थलांतर (वर्गातील कृती): स्थानिक भागातील पक्षी जे नियमित स्थलांतर करतात (उदा. अन्न मिळायला एका ठिकाणी जाणे, व रात्री झोपायला वेगळ्या ठिकाणी येणे) त्याचा नकाशा काढा.
-
सखोल निरीक्षण व रेखाचित्र: मुलांना नैसर्गिक गोष्टी उदा. पानातील रेघा/शिरा, किंवा कीटकांच्या पंखावरील रेषा यांचे रेखाचित्र काढायला सांगावे.
कृतीपुंज ४: निसर्गातील झाडे व प्राण्यांचे एकमेकांवर अवलंबून असणे (स्थानिक)
-
प्राण्यांचे परस्परांवर अवलंबून असणे – अभ्यास सहल: स्थानिक परिसंस्थेतील परस्परावलंबनाची उदाहरणे द्यावीत व दाखवावीत. यात अन्नसाखळ्याही चालतील.
-
आपल्या भागातील अन्नजाळे : स्थानिक परिसरातील प्राणी व वनस्पती यांची उजळणी करा. वेगवेगळ्या अन्नसाखळ्या काढा व त्यापासून एक अन्नजाळे तयार होत आहे का ते बघा.
-
चित्रवही / फोटो अल्बम / स्केचबुक : परिसरातील परस्परावलंबनाची उदाहरणे जमवून त्या प्राण्यांची चित्रे किंवा फोटो एक वहीत चिकटवा व माहिती द्या.
-
परस्परावलंबन – नाटक : शिक्षकाने एक छोटे नाटक लिहावे, ज्यात वेगवेगळी मुले स्थानिक प्राणी व वनस्पतींच्या भूमिका करतील. यात परस्परावलंबन निसर्गात कसे दिसते त्याची उदाहरणे असतील.
-
एकत्रीकरण : निसर्गाचे मोठे जाळे नक्की आहे तरी कसे, यावर स्थानिक / राष्ट्रीय/ जागतिक पातळीवरील उदाहरणे घेऊन चर्चा करा.
कृतीपुंज ५: प्रजातींचे वर्गीकरण व नमुने गोळा करणे
-
क्षेत्रभेट – वनस्पतींचे वर्गीकरण व गट ओळखणे: वर्गीकरणाची ओळख. स्थानिक वनस्पतींचे नमुने (विशेषत: पाने) गोळा करावीत. त्यांच्यातील साम्य व फरक यावर वर्गात चर्चा करावी. मुख्य गट समजावून घ्यावेत. (उदा. संयुक्त व साधी पाने असलेली, बोरासारखी फळे असलेली, काकडीसारखी फळे असलेली, एक किंवा अनेक बी असलेली)
-
क्षेत्रभेट – प्राण्यांचे वर्गीकरण व गट ओळखणे: स्थानिक प्राण्यांचे (सर्व गटातील) निरीक्षण करावे. त्यांच्यातील साम्य व फरक यावर वर्गात चर्चा करावी. मुख्य गट समजावून घ्यावेत.
-
प्राथमिक चर्चा – झाडे व प्राणी यांचे वर्गीकरण कसे करतात: प्राण्यांचे, वनस्पतींचे गट म्हणजे नक्की काय? वर्गीकरण म्हणजे काय? फळ्यावर झाड-फांद्या सदृश चित्र काढून झाडांचे गट-उपगट दाखवावे. तसेच एक चित्र प्राण्यांचे गट-उपगट यांचे दाखवावे.
-
झाडे-प्राणी यांचे नमुने/प्रतिकृती ठेवल्या असतील अशा संग्रहालयास क्षेत्रभेट : परिसरातील शुष्क वनस्पति संग्रहालय ( वनस्पतींच्या वाळवलेल्या नमुन्यांचे संग्रहालय) किंवा पक्षी/प्राणी यांचे भूसा भरलेले नमुने / प्रतिकृती, फुलपाखरे / कीटक यांचा संग्रह मुलांना दाखवावा. नमुने गोळा करणे हे शास्त्रीय अभ्यास आणि वर्गीकरण यासाठी का महत्वाचे आहे ते सांगावे.
-
निसर्ग अभ्यासक आणि त्यांचे काम: स्लाइड शो द्वारे स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील निसर्ग अभ्यासकांचे कार्य समजून घ्यावे (विशेषत: संशोधन किंवा प्रजातींचे संरक्षण करणारे). शक्य झाल्यास स्थानिक निसर्ग अभ्यासकास भेटावे व त्यांचे काम त्यांच्याकडूनच समजून घ्यावे. त्यांचे संग्रह बघावेत.
कृतीपुंज ६: निसर्ग-माणूस संबंध (स्थानिक)
मासेमार बांधवांचे जीवन:
-
स्थानिक मासेमार वस्तीला भेट द्या. त्यांचे काम रोजचे जीवन जाणून घ्या.
-
मासे कसे पकडतात, स्वच्छ करतात, विकतात, ते बघा/ विचारा.
-
वरील प्रक्रियांची चित्रे काढा.
जंगलातील कंद-मुळे, पाने, फळे गोळा करणारे:
-
निसर्गातून कंद-मुळे, पाने, फळे गोळा करणाऱ्या स्थानिक लोकांचे जीवन समजून घ्या. ते काय-काय गोळा करतात, कुठल्या ऋतूत गोळा करतात, त्यासाठी जंगलात कुठे जावे लागते?
-
जंगलातील नैसर्गिक ऐवज योग्य त्या मर्यादेत घेतला जावा म्हणून त्यांचे काही नियम/शिस्त आहे का?
-
त्यांच्या मदतीने जंगलातील कंद-मुळे, पाने, फळे, बिया गोळा करून एक छोटे प्रदर्शन भरवा.
धनगरांचे जीवन:
-
शेळ्या/मेंढ्या/गायी/म्हशी पाळणाऱ्या स्थानिक धनगर कुटुंबास भेट द्या. त्यांचे दैनंदिन जीवन समजून घ्या.
-
त्यांना त्यांच्या प्राण्यांबद्दल प्रश्न विचारा. त्यांचे आपल्या प्राण्यांशी कसे नाते आहे?
-
धनगराच्या आयुष्यातील एक दिवस, यावर एक गोष्ट लिहा.
-
शक्य झाल्यास कळप कसा हाकला जातो हे समजून घेण्यासाठी एक प्रयोग करा. उदा. अनेक चेंडू एकत्र पुढे सरकवणे. यातून माणूस आणि त्याचे पाळीव प्राणी यांचे संबंध काही प्रमाणात समजून येतील.
स्थानिक शेतकऱ्यांचे जीवन:
-
शेतावर जाऊन तेथील ऋतूंनुसार होणाऱ्या पीक-पाण्याच्या प्रक्रिया समजून घ्या.
-
शेती पाऊस, जमीन, खत यावर कशी अवलंबून असते ते समजून घ्या.
-
शाळेत आल्यावर ऋतूंनुसार होणाऱ्या शेतीच्या प्रक्रियांचे एक कॅलेंडर तयार करा.
निसर्ग स्वच्छ करू या: स्थानिक निसर्गात (उदा. टेकडी, जंगल, तळे/नदी यांचा काठ) इथे जाऊन तेथील मानवनिर्मित कचरा साफ करायला मदत करा. अशा प्रदूषणाचा निसर्गावर काय वाईट परिणाम होतो ते समजून घ्या.
निसर्ग आणि माणसाच्या गोष्टी-गाणी: स्थानिक आदिवासी, जंगलातील कंद-मुळे, पाने, फळे गोळा करणारे समाज, धनगर, शेतकरी, मच्छीमार, या सर्वांकडून १ गोष्ट आणि १ गाणे मिळवा. ती गोष्ट व गाणे आपल्या वर्गात व पालकांना म्हणून दाखवा. शक्य झाल्यास पालक-शिक्षक यांच्या मदतीने या गोष्टींवर आधारित छोटी नाटके बसवा व सादर करा.
कृतीपुंज ७: निसर्ग सौंदर्य
ढग बघू या, त्यांच्या गोष्टी सांगू या: माळरानावर झोपा, ढगांचे खूप वेळ निरीक्षण करा. त्यांचे वेगवेगळे आकार बघून तुमच्या कल्पनेने एक गोष्ट बनवा. ती वर्गाला सांगा.
सूर्योदय/सूर्यास्त बघू या: सूर्योदय/सूर्यास्त जिथून चांगले दिसतील अशा ठिकाणी जा. आकाशाचे, ढगांचे निरीक्षण करा. रंगांच्या छटांचे सौंदर्य बघा, एक रंगीत चित्र काढा.
निसर्गाची छायाचित्रे: निसर्गाची छायाचित्रे काढणाऱ्या एखाद्या स्थानिक छायाचित्रकाराबरोबर निसर्गात फिरा. त्यांना झाडे, फुले, पक्षी, कीटक यांचे फोटो काढताना बघा. ते फोटो कसे आले आहेत ते बघा. त्याबद्दल गप्पा मारा.
निसर्ग-ध्वनी-नकाशा: स्थानिक डोंगर/जंगल/नदी अशा ठिकाणी भेट द्या. डोळे मिटा व निसर्गातून काय-काय आवाज येत आहेत त्यांची मनात नोंद करा. नंतर एक नकाशा काढा व त्यात कुठला आवाज कुठून आला ते अंदाजे दाखवा.
एकत्रीकरण: निसर्ग-मानव संबंध
वर्गात चर्चा करा: माणूस निसर्गावर कुठल्या बाबतीत अवलंबून आहे, कुठल्या बाबतीत नाही? निसर्गावर, त्याच्या आरोग्यावर माणसाचे कुठले चांगले व वाईट परिणाम होतात त्याचा एक तक्ता या चर्चेदरम्यान तयार करा. निसर्ग आणि माणूस यांचे संबंध अजून चांगले होण्यासाठी काय-काय करता येईल याची यादी तयार करा.
कसे शिकायचे आहे: अजून थोडे महत्वाचे..
पाहुणे शिक्षक: स्थानिक निसर्गतज्ञ, शेतकरी, मासेमार यांना निसर्गाबद्दलचे आपले ज्ञान मुलांबरोबर वाटून घेता यावे, म्हणून त्यांना वर्गात जरूर बोलवा.
माझे प्रकल्प, माझे काम: या वर्षात विद्यार्थ्याने निसर्ग शिक्षण घेताना काढलेली चित्रे, जमविलेल्या वस्तू/चित्रे, लिहिलेल्या गोष्टी/गाणी/नाटके, आणि इतर नोंदी या सर्व गोष्टी एका फाइल मधे नीट समाविष्ट कराव्यात. त्यांचे पुन्हा अवलोकन करताना व इतरांना दाखवताना मुलांना अभिमानही वाटेल, उजळणीही होईल, आणि शिक्षणही समृद्ध होईल.
“का?” ची पेटी: वर्गात एक पेटी ठेवा ज्यात निसर्गाबद्दल कुठलाही प्रश्न मुले चिठ्ठीवर लिहून केव्हाही टाकू शकतील. त्यांना या प्रश्नांबद्दल स्वतःच संशोधन करायलाही उद्युक्त करा. वर्गात या प्रश्नांची चर्चा करा, जमेल तशी उत्तरे शोधा व द्या.
इतर शैक्षणिक साधने: वरील कृतींव्यतिरिक्त इतर शैक्षणिक साधने जमेल तशी मुलांना मिळवून द्या. निसर्ग संबंधी पुस्तके, मार्गदर्शक अभ्यासपुस्तिका, इंटरनेट वरील वेबसाईट, विषयतज्ञांशी संपर्क, इत्यादी.