top of page
कसे शिकायचे आहे : इयत्ता पहिली

 

योगेश पाठक

 

पहिलीसाठी कृतींचे पाच मुख्य पुंज खाली दिले आहेत.
 

पालक व निसर्ग-शिक्षक यांनी शालेय वर्षाच्या सुरूवातीस भेटावे. शाळेचे वार्षिक वेळापत्रक, गावाचे वार्षिक वेळापत्रक (उदा. ऋतू, सुट्या, सण, शेतकाम, सुगीचा व इतर हंगाम), तज्ज्ञांची उपलब्धता, या सर्वांचा विचार करून, या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षणाचे एक वार्षिक वेळापत्रक आखावे.


अर्थात खालील कृती उदाहरणादाखल दिल्या आहेत. पालक व शिक्षक यातून काही कृती कमी करू शकतात, त्या बदलू शकतात, किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन कृती व उपक्रम यांचा अंतर्भाव करू शकतात.

 

 

कृतीपुंज १:  निसर्गाचे घटक

  • पाऊस: पावसाचा अनुभव घेण्यासाठी एक सहल घ्यावी. यात खालील गोष्टींचे निरीक्षण व्हावे: चिखल, पाण्याचे प्रवाह, पावसाचे थेंब, पानांवर पडणारा पाऊस, इत्यादी. खालील मुद्यांवर चर्चा करावी : खूप जोरात पाऊस आला तर काय होते? वादळ म्हणजे काय? पूर म्हणजे काय?

  • ओढा/नदी: परिसरातील ओढा/नदीला क्षेत्रभेट द्यावी. यात खालील गोष्टींचे निरीक्षण व्हावे: ओढा कसा दिसत आहे? त्यातील पाण्याचा वेग किती आहे? पाणी वाहत असताना त्यातील प्राणी, कीटक, मासे यांचे काय होते?

  • वारा: एकदा पावसाळ्यात आणि एकदा उन्हाळ्यात अशी दोन वेळ वारा पाहण्यासाठी बाहेर छोटी सहल न्यावी. उन्हाळ्यात जोरात वारा आला तर धूळ उडते त्याचा अनुभव घ्यावा. जोरात वारा आला तर झाडांचे काय होते ते पहावे? वादळ म्हणजे काय? चक्रीवादळ म्हणजे काय यावर चर्चा करावी.

  • आपले पाणी: वर्गात ‘पाण्याचे स्रोत’ यावर चर्चा करावी. आपण वापरतो ते सर्व पाणी कुठून येते? आपण पाणी कशा-कशासाठी वापरतो? पावसाचे पाणी कुठे जाते? ओढे कुठून सुरू होतात व कुठे संपतात? नद्या कशा सुरू होतात व कुठे संपतात? समुद्राला सुरुवात व शेवट आहे का?

  • माती: मातीची वेगवेगळी रूपे बघण्यासाठी एक सहल असावी. यात घराजवळची माती, शेतातली माती, नदीजवळची माती, डोंगरावर माती, याचा समावेश असावा. जमल्यास मातीकाम करणारे कारागीर, कुंभार, कलाकार यांना भेट देऊन त्यांचे काम बघावे व समजून घ्यावे. वर्गात मातीवर चर्चा करावी.

  • समुद्र आणि त्याचा किनारा: समुद्र जवळ असल्यास एखाद्या समुद्र किनाऱ्यास एक किंवा जास्त वेळा भेट द्यावी. भरती-ओहोटी, लाटा, वाऱ्याची दिशा, यांचे निरीक्षण करावे. या निरीक्षणांबद्दल वर्गात चर्चा करावी. उदा. समुद्रात लाटा का येतात आणि त्या किनाऱ्यावर येतात तेव्हा त्यांचे काय होते?

 

कृतीपुंज २:  झाडांची ओळख करून घेऊ या

  • परिसरातील मोठ्या झाडांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – झाडाची रचना, गती, उदा. झाडांचे भाग कोणते? वारा आल्यावर झाड कसे हलते? फांद्या कशा व कुठून सुरू होतात? झाडांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? वेगवगेळ्या झाडांमध्ये कुठले फरक दिसत आहेत? (सहज समजण्याजोगे). आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे झाडांचे असतात का? या प्रत्येक झाडाचा माणसाला काय उपयोग होतो? निसर्गातील इतर प्राणी-पक्ष्यांना काय उपयोग होतो?

  • परिसरातील छोट्या झाडांचे व झुडुपांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – झाडाची रचना, गती, उदा. झाडांचे भाग कोणते? वारा आल्यावर झाड कसे हलते? फांद्या कशा व कुठून सुरू होतात? झाडांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? वेगवगेळ्या झाडांमध्ये कुठले फरक दिसत आहेत? (सहज समजण्याजोगे). आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे झाडांचे असतात का? या प्रत्येक झाडाचा माणसाला काय उपयोग होतो? निसर्गातील इतर प्राणी-पक्ष्यांना काय उपयोग होतो?

  • परिसरातील शेतातील झाडांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: वेगवेगळ्या शेतात वेगवेगळी पिके असतील त्या सर्वांचे ‘झाड’ म्हणून निरीक्षण करावे. शेत हाही झाडांचा समूहच हे समजून घ्यावे. वेगवगेळ्या पिकांच्या झाडांमध्ये कुठले फरक दिसत आहेत? शेतात इतर कुठली झाडे आहेत? तण म्हणजे काय? शेतातील पिकांचा निसर्गातील इतर प्राणी-पक्ष्यांना काय उपयोग होतो?

  • परिसरातील गवतांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – गवताळ प्रदेश व जंगलात काय फरक आहे? ‘गवत’ या झाडाच्या रचनेत काय वेगळेपण आहे? गवतांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? वेगवेगळ्या गवतांमध्ये कुठले फरक दिसत आहेत? आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे गवतांचे असतात का? वेगवेगळ्या गवतांचा माणसाला काय उपयोग होतो? गवतांचा निसर्गातील इतर प्राणी-पक्ष्यांना काय उपयोग होतो?

 

कृतीपुंज ३:  प्राण्यांची ओळख करून घेऊ या

  • परिसरातील सस्तन प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – शरीराची रचना व मुख्य भाग.  त्यांचे चालणे व इतर गती, तोल सांभाळणे. ते प्रत्येक ऋतूत कसे राहतात, काही वेगळे करतात का? ते काय-काय खातात? त्यांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? परिसरातील वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये काय सारखे आहे? काय फरक आहेत (सहज समजण्याजोगे)?  आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे त्यांचेही आहेत का? त्यांची पिल्ले कशी दिसतात? ती आपल्यासारखीच एकमेकांशी खेळतात का? हे प्राणी एकमेकांशी बोलतात कसे? एकमेकांना प्रतिसाद कसा देतात? त्यांची भाषा आहे का?

  • परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – शरीराची रचना व मुख्य भाग.  त्यांचे चालणे, उडणे व इतर गती, तोल सांभाळणे. ते प्रत्येक ऋतूत कसे राहतात, काही वेगळे करतात का? ते काय-काय खातात? त्यांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? परिसरातील वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये काय सारखे आहे? काय फरक आहेत (सहज समजण्याजोगे)?  आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे त्यांचेही आहेत का? त्यांची घरटी कुठे आहेत? ती कशी दिसतात? कशापासून बनविली आहेत? त्यांची पिल्ले कशी दिसतात? ती आपल्यासारखीच एकमेकांशी खेळतात का? हे प्राणी एकमेकांशी बोलतात कसे? एकमेकांना प्रतिसाद कसा देतात? त्यांची भाषा आहे का?

  • परिसरातील उभयचर प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: प्रथम वर्गात उभयचर प्राणी म्हणजे काय याची ओळख करून दयावी. त्यानंतर निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – शरीराची रचना व मुख्य भाग.  त्यांचे चालणे, पाण्यात पोहणे व इतर गती, तोल सांभाळणे. ते प्रत्येक ऋतूत कसे राहतात, काही वेगळे करतात का? ते काय-काय खातात? त्यांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? एखादा प्राणी उदाहरण म्हणून घेतल्यास (बेडूक), वेगवेगळ्या बेडकांमध्ये काय सारखे आहे? काय फरक आहेत (सहज समजण्याजोगे)?  आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे त्यांचेही आहेत का? त्यांची पिल्ले कशी दिसतात? ती आपल्यासारखीच एकमेकांशी खेळतात का? हे प्राणी एकमेकांशी बोलतात कसे? एकमेकांना प्रतिसाद कसा देतात? त्यांची भाषा आहे का?

  • परिसरातील सरपटणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: परिसरात साप सहज दिसत नसतील तर ही सहल जवळच्या प्राणीसंग्रहालयात (जिथे साप आहेत) तिथे केली तरी चालेल. निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – शरीराची रचना व मुख्य भाग.  त्यांचे सरपटणे व इतर गती, तोल सांभाळणे. ते प्रत्येक ऋतूत कसे राहतात, काही वेगळे करतात का? ते काय-काय खातात? त्यांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? त्यांच्यात काय सारखे आहे? काय फरक आहेत (सहज समजण्याजोगे)?  आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे त्यांचेही आहेत का? त्यांची पिल्ले कशी दिसतात? ती आपल्यासारखीच एकमेकांशी खेळतात का? हे प्राणी एकमेकांशी बोलतात कसे? एकमेकांना प्रतिसाद कसा देतात? त्यांची भाषा आहे का?

  • परिसरातील कीटकांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यास सहल: निरीक्षण करा व नंतर चर्चा करा – शरीराची रचना व मुख्य भाग.  त्यांचे उडणे, चालणे, व इतर गती, तोल सांभाळणे. ते प्रत्येक ऋतूत कसे राहतात, काही वेगळे करतात का? ते काय-काय खातात? त्यांना दृष्टी-चव-श्रवण-स्पर्श-वास या पाच संवेदना असतात का? त्यांच्यात काय सारखे आहे? काय फरक आहेत (सहज समजण्याजोगे)?  आपले जसे कुटुंब असते, समूह असतात तसे त्यांचेही आहेत का? त्यांची पिल्ले कशी दिसतात? ती आपल्यासारखीच एकमेकांशी खेळतात का? हे प्राणी एकमेकांशी बोलतात कसे? एकमेकांना प्रतिसाद कसा देतात? त्यांची भाषा आहे का?

  • वर्गातील चर्चा – कुठल्या प्राण्याची किती ताकद? : कुठले प्राणी माणसापेक्षा जास्त शक्तीमान आहेत? कुठले कमी शक्तिमान आहेत? कुठले प्राणी पहिलीतील मुलांपेक्षा जास्त शक्तीमान आहेत? कुठले कमी शक्तिमान आहेत? प्राणी आपली शक्ती व चपळता कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे वापरतात (यात जे वैविध्य आहे ते नजरेस आणून द्यावे). प्राण्यांची शक्ती कुठे कमी पडते? माणूस बुद्धीमुळे प्राण्यांवर नियंत्रण ठेवू शकतो का? या व अशा मुद्द्यांवर चर्चा व्हावी.

  • वर्गातील चर्चा – झोप: झाडे झोपतात का? प्राणी झोपतात का? वेगवेगळ्या प्राण्यांच्या झोपायच्या सवयी काय आहेत? निशाचर म्हणजे काय? या व अशा मुद्द्यांवर चर्चा व्हावी.

  • पाळीव प्राणी / गुरांच्या निरीक्षणासाठी अभ्यास सहल आणि त्यानंतर वर्गात चर्चा: आपल्या भागात कुठले पाळीव प्राणी आहेत? देशात आणि जगात इतरत्र कुठले मुख्य पाळीव प्राणी आहेत? हे प्राणी आधी जंगलात होते आणि मग पाळीव झाले का? कधी पाळीव झाले? कसे पाळीव झाले? त्यांच्याकडून माणसाला रोज काय-काय मिळते? (उदा.: गायीं/म्हशींपासून दूध व बैलांकडून शेतात नांगरणी, घोडा-गाढव यांच्याकडून माणसे-माल यांची वाहतूक, अनेक प्राण्यांपासून कातडे, पाळलेल्या मधमाशांपासून मध, पिंजऱ्यात बंद केलेल्या पक्षी किंवा मासे यांच्याकडून मनोरंजन, कुत्रा/मांजर यांच्याकडून प्रेम/माया/सोबत). त्याबदल्यात माणूस या प्राण्यांना काय-काय देतो? या प्राण्यांचे जंगली भाईबंद अजून जंगलात आहेत का?

 

कृतीपुंज ४:  निसर्ग आणि सर्जनशीलता, कल्पकता, गोष्टी सांगणे

  • निसर्गातून कला: एक किंवा अनेक वेळा निसर्गात फिरा. रंगीत किंवा विशेष आकार व रचना असलेली फुले, पाकळ्या, पाने, दगड, माती जमवा आणि कुठलीही एक कलाकृती तयार करा. या वस्तू मुलांनी स्वतःच गोळा करायच्या आहेत.

  • गोष्टींचा तास १: शिक्षकाने प्राणी, वनस्पती, निसर्ग याबद्दलच्या गोष्टी सांगाव्या / वाचून दाखवाव्या.

  • गोष्टींचा तास २: मुलांनी प्राणी, वनस्पती, निसर्ग याबद्दलच्या छोट्या गोष्टी तयार करुन सांगाव्या.

  • कठपुतळी (पहिलीसाठी): निसर्गातील वस्तूंपासूनच एकत्र मिळून बाहुल्या तयार करा. निसर्गावरील एक छोटे नाट्य सादर करा. शिक्षकांनी नेतृत्व करावे व बाकीची सर्व कामे मुलांनी करावीत.  

  • माहिती लिहा/ भाषण करा (वर्गात सांगा) : माझे आवडते झाड / माझा आवडता पाळीव प्राणी / माझा आवडता जंगली प्राणी

  • आठवणींची गोधडी - आजोबा/आजी/आई/बाबा किंवा इतर मोठ्या माणसांच्या निसर्गविषयक आठवणी: घरातील किंवा परिसरातील मोठ्या माणसांना झाडे, प्राणी, निसर्ग याबाबतच्या त्यांच्या आठवणी विचारा व त्या वर्गात सांगा.

  • प्रत्येक आठवड्यात चित्र काढणे व इतर कला कृती चालू रहाव्यात व त्यात निसर्ग निरीक्षणातील विषय यावेत. 

 

कृतीपुंज ५:  एकत्रीकरण

  • वर्गात चर्चा करा – हवा, पाणी, माती हे निसर्गाचे घटक माणूस व इतर प्राणी कसे वापरतात, वाटून घेतात ?

  • वर्षाच्या शेवटी अभ्यास सहल व वर्गात चर्चा – आपला परिसर : परिसरातील नैसर्गिक स्थळे व मानवी वस्ती/शेती असणारा प्रदेश, त्या भागांमध्ये ऋतुंनुसार होणारे बदल, परिसरातील प्राणी व झाडे यांची उजळणी, आपले जीवनचक्र आणि त्यांचे जीवनचक्र, आपण निसर्गातून काय-काय घेतो/वापरतो आणि ते काय-काय घेतात?

  • पालक-शिक्षक यांना योग्य वाटेल अशा इतर कृती ज्यातून वरील सर्व ज्ञानाचे संकलन /उपयोजन/एकत्रीकरण होईल.

 

वरील कृतीपुंजांत दिलेल्या व अशा इतर कृती वेगवेगळ्या स्थानिक, सांस्कृतिक व सामाजिक-आर्थिक संदर्भानुसार बदलता येतील. या व अशा इतर कृतींतून ‘हरितात्म’ शैक्षणिक प्रगती, चिकित्सक विचार, आणि निसर्गाशी एक नाते जोडले जाणे, हे सर्वच घडून येईल.

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by EcoUniv. Proudly created with Wix.com

bottom of page