top of page
व्यक्तिगत पातळीवरील पर्यावरणवाद

(c) योगेश पाठक 

मागील लेखात चार प्रकारचे पर्यावरणवादी दृष्टिकोन दिले आहेत. माणसा-माणसामध्ये होणाऱ्या सामाजिक सहकार्यामुळे (social collaboration) हे दृष्टिकोन वेगवेगळया स्वरूपात अंगिकारले जातात, प्रवाही होतात. स्वयंसेवी संस्था, हरित उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या, सेंद्रिय शेतकऱ्यांचे गट, पर्यावरण रक्षणाच्या सरकारी-निमसरकारी प्रक्रिया व कायदे, अशा अनेक स्वरूपात ते आपल्याला दिसत असतात.

पण व्यक्तिगत पातळीवरील पर्यावरणवादाचे काय?

एखाद्याने जर आपली एकंदर पर्यावरणीय फूटप्रिंट (ecological footprint) कमी केली, तर त्या व्यक्तीने पर्यावरणवाद ‘जगला’ असे या लेखापुरते म्हणू या. इथे फक्त कार्बन फूटप्रिंट अभिप्रेत नाही, तर एकंदर नैसर्गिक संसाधनांचा (उदा: पाणी, हवा, जमीन, ऊर्जा) वापर व सर्व प्रकारचे प्रदूषण अभिप्रेत आहे.

उदाहरणादाखल, रोहन आणि मिहीर ही दोघे आयटी क्षेत्रात काम करणारे, शहरात राहणारे अभियंते आहेत असे समजू या. पर्यावरणाचे प्रश्न समजल्यावर, त्याच्याबद्दल भरपूर वचन केल्यावर दोघेही अस्वस्थ झाले आणि याबद्दल ‘काहीतरी केले पाहिजे’ असे त्यांना वाटले.

रोहनने आपली जीवनशैली जमेल तितकी बदलली:

 • रासायनिक खतांवर पिकलेले अन्न खाणे सोडून दिले. सेंद्रिय अन्न खाणे सुरू केले.  

 • प्लॅस्टिकचा वापर कमी केला. एकंदरीत वस्तूंचा पुनर्वापर वाढविला. कचरा कमी केला.  

 • त्याची कामाची जागा घरापासून 20 किमी अंतरावर असूनही आठवड्यातून 2-3 वेळा  सायकलने जाणे सुरू केले.  

 

यामुळे त्याची पर्यावरणीय फूटप्रिंट कमी झाली. पण काही गोष्टी तो बदलू शकला नाही

 • नोकरीनिमित्त वर्षातून दोन वेळा  अमेरिकेला आणि एक वेळा  मलेशियात जावे लागत असल्यामुळे जो विमानप्रवास घडतो, त्याची कार्बन फूटप्रिंट.

 • स्वतःच्या वाहनाचा त्याग करणेही रोहनला जमले नाही, पण त्याने वाहनाचा एकंदरीत वापर निश्चित कमी केला.  

 • घरातील एकंदरीत ऊर्जावापर व त्याची कार्बन फूटप्रिंट – उदा. फ्रीज, मायक्रोवेव्ह्, वॉशिंग मशीन

 • घरात नेहमी आणल्या जाणाऱ्या वेगवेगळया वस्तूंची प्लॅस्टिक वेष्टणे व त्यामुळे निर्माण होणार कचरा, उदा. बिस्किटे व इतर खाद्यपदार्थ

 

रोहनच्या व्यक्तीगत पर्यावरणवादाला आपण ‘जमेल तेवढा’ पर्यावरणवाद म्हणू या. त्याची आधीची पर्यावरणीय फूटप्रिंट ‘x’ एव्हढी असेल तर आता ती साधारण 0.75x झाली असेल असे मानू या.   

शहरी मध्यम/श्रीमंतवर्गातील बहुसंख्य पर्यावरणवादी ‘जमेल तेवढा’’ पर्यावरणवाद करतात. म्हणजेच आपल्या शहरी आयुष्याची एकंदरीत घडी पूर्ण बदलणे शक्य नसल्यामुळे जमेल तेवढी पर्यावरणीय मूल्ये आपल्या जीवनशैलीत आणायचा प्रयत्न करतात.

मिहीरने मात्र पर्यावरणीय मूल्ये खूप गंभीरपणे घेतली. फक्त स्थानिक सेंद्रिय अन्नच वापरणे, प्लॅस्टिक पूर्णपणे थांबविणे हे तर त्याने केलेच, पण एकंदरीत अर्थव्यवस्था, त्यातील स्वतःचे स्थान, निसर्ग-माणूस संबंध, गरजा व चोचले यातील फरक यावर खोलवर चिंतन केले. मिहीरलाही नोकरीमुळे वर्षातून 2-3 वेळा परदेशवारी करावी लागे. ‘ती कार्बन फूटप्रिंट नकोच’ म्हणून त्याने नोकरीच सोडून दिली. प्रवास खूप कमी केला. सर्वत्र सायकलने किंवा चालत फिरू लागला.  पाणी व ऊर्जा यांचा वापर अतिशय कमी केला. पुढील 1-2 वर्षात शहरी जीवनशैली पूर्णपणे सोडून खेड्यात स्थायिक व्हायचे विचार त्याच्या मनात घोळत आहेत.

मिहीरला आपण ‘सजग, गंभीर पर्यावरणवादी’ म्हणू या. त्याची आधीची पर्यावरणीय फूटप्रिंट ‘x’ एव्हढी असेल तर आता ती साधारण 0.25x झाली असेल असे मानू या.   

वरील उदाहरणांमध्ये उल्लेखलेला आहे तो “full-stomach environmentalism”. म्हणजे सर्व गरजा/उपभोग भागलेल्या सधन वर्गाला मूल्यांचा शोध करताना उमगलेला पर्यावरणवाद.

गरीबांकडे मात्र अनावश्यक उपभोगांसाठी पैसाच नसतो. रोहनकडे घरकाम करण्यासाठी रंजनाबाई येतात. त्यांचे घर जनता वसाहतीत आहे. 10 x 10 च्या खोलीत तिथे चार-पाच जण राहतात. त्यांचा ऊर्जा व पाणी वापर अर्थातच रोहनपेक्षा खूप कमी आहे. त्या शहरातील सर्व प्रवास चालत, सायकलने, किंवा बसने करतात. त्यामुळे त्यांची कार्बन फूटप्रिंट व एकंदर पर्यावरणीय फूटप्रिंट खूप कमी आहे. रोहनची आधीची फूटप्रिंट x एवढी होती. रंजनाबाईंची पर्यावरणीय फूटप्रिंट 0.25x एवढी कायमच होती व आहे. हा गरिबीतला पर्यावरणवाद.

या व इतर काही काल्पनिक गृहितकांवर आधारित खालील माहिती आता बघा. अर्थात हे शास्त्रीय संशोधनावर आधारित नसून केवळ उदाहरण म्हणून दिले आहे. त्यांच्या शहराची एकूण लोकसंख्या 30 लाख मानू या.

यावरून काही निरीक्षणे करता येतात:

 • जमेल तसा पर्यावरणवाद आणि गंभीर, सजग पर्यावरणवाद करणाऱ्यांची संख्या आज एवढी कमी आहे की एकंदरीत जनसमूहाचा (शहराचा) विचार केल्यास एकूण फूटप्रिंट ही ‘जमेल तसा’ व ‘गंभीर, सजग’ यांच्यामुळे फक्त 0.04% एवढीच कमी होऊ शकली.

 • शहराची एकंदर फूटप्रिंट कमी ठेवण्यास गरीब व कनिष्ठ मध्यमवर्ग खूप मोठा हातभार लावत आहेत. परंतु त्यांच्या या सहभागाची सरकारदरबारी, माध्यमे-समाजमध्यमे, एवढेच काय पर्यावरणीय वर्तुळातही दखल (recognition) घेतली जात नाही. तसेच अर्थव्यवस्थेकडून त्यांना या पर्यावरणस्नेही जीवनशैलीबद्दल कुठलाही विशिष्ट मोबदला (tangible benefit / incentive) मिळत नाही.

 • श्रीमंतांची एकंदर फूटप्रिंट त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने खूप जास्त आहे, पण त्यांच्या पर्यावरणास धक्का पोचविणाऱ्या वागणुकीस आत्ताच्या अर्थव्यवस्थेत कुठलेही आव्हान / शिस्त / दंड / कर नाही.

 • गंभीर, सजग पर्यावरणवाद जगणारी ‘role models’ तयार होणे जरुरीचे आहे, पण आत्ता तरी बहुतांश लोकांना हा मार्ग खूप कठीण वाटतो. या परिस्थितीत जास्तीत जास्त लोक ‘जमेल तश्या’ पर्यावरणवादाकडे झुकले तरीही चांगलेच आहे.

 • मुख्य प्रवाहातील श्रीमंतवर्ग व मध्यमवर्ग यांचे अजूनही पर्यावरणीय मूल्यांकडे विशेष लक्ष नाही. एकीकडे शहरीकरण वाढत असताना शहरांची पर्यावरणीय फूटप्रिंट कमी करण्यासाठी  आपल्याकडे ठोस उपाय नाहीत. ही गंभीर परिस्थिती आहे. बाजार-केंद्री पर्यावरणवादाचे यावरचे ठराविक उत्तर म्हणजे वेगवेगळया प्रकारची पर्यायी, हरित उत्पादने. पण बाजार-केंद्री पर्यावरणवादाकडे एकात्मिक दृष्टिकोनचा अभाव आहे हे आपण आधीच्या लेखात पाहिले आहे.

 • विचारवंतांच्या मते, आज जागतिक समुदायासमोर पर्यावरणाबरोबर अजून एक धगधगता प्रश्न आहे आणि तो म्हणजे आर्थिक विषमता कमालीची वाढली आहे. जगातील 1% लोकांकडे 44% संपत्ती एकवटली आहे. विषमतेची ही दरी कमी करण्यासाठी Universal Basic Income पासून Wealth Tax पर्यन्त अनेक उपाय सुचविले जात आहेत. गरिबांच्या हातात जास्त उत्पन्न आले तर विषमता कमी होईल पण त्यामुळे त्यांचीही पर्यावरणीय फूटप्रिंट वाढू शकते. म्हणून एकंदर फूटप्रिंट कमी करण्यासाठी श्रीमंत/मध्यमवर्गाला पुढाकार घ्यावा लागेल. त्यांनी पर्यायी, पर्यावरणस्नेही उपाय तर योजलेच पाहिजेत, पण काही उपभोग कमी कमी करत त्यांचा त्याग करणेही जरुरीचे आहे. याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही.

 

आहे ती घडी तशीच ठेवून सगळयांना पर्यावरण आणि विषमता ह्या दोन्ही समस्या सोडवायच्या आहेत.

 

हे स्वप्नरंजन आहे की आशावाद? आशावाद असेल तर तो कुठून येतो? आत्ताची घडी बदलायला मानवी मन का तयार होत नाही? अर्थव्यवस्थेने मानवी समाजांवर, त्यांच्या मूल्यांवर एवढी पकड का आणि कशी घेतली? या व अशा प्रश्नांचा धांडोळा या मालिकेत घेत राहू या.  

bottom of page