top of page
इकोयुनिव्हचा पर्यावरणीय शिक्षण विचार: एक सुरुवात

मागील लेखात आपण शिक्षणपद्धतींची एकूण संकल्पना तपासून पाहिली, त्यात इकोयुनिव्हचा पर्यावरणीय शिक्षण विचार कुठे बसतो त्याची चर्चा केली. 

कुठल्याही शिक्षणपद्धतीची मुख्य अंगे तीन असतात:

 • हेतू 

 • काय शिकविले जाणार आहे, अभ्यासक्रमात नक्की काय असणार आहे ? 

 • ते कसे शिकविले जाणार आहे, शिकण्याची प्रक्रिया कशी असणार आहे ?

 

इकोयुनिव्हमध्ये आम्ही अजून एका चौथ्या अंगावर भर देतो. ते म्हणजे विदयार्थी कोण व  कसा आहे,  त्याचा भवताल कसा आहे, त्याची मानसिक जडणघडण कशी झाली आहे, हे खोलवर समजून घेणे. 

अर्थात वय, स्थळ, आणि काळ याप्रमाणे विद्यार्थी बदलतो, आणि त्यामुळे शिक्षणपद्धतीही बदलली पाहिजे. शिक्षणपद्धती हे ‘blueprint’ नसावे, पोथी नसावी. तो एक जिवंत दस्तऐवज असावा. शाळाचालकांना, शिक्षकांना, पालकांना त्यात योग्य ते सर्जनशील बदल करण्याचे स्वातंत्र्य असावे. विद्यार्थ्यांचे पर्यावरण, परिसरातील निसर्ग-माणूस संबंध, भाषा, कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांचे प्रतिबिंब शिक्षणपद्धतीत पडलेले असावे. 

इकोयुनिव्हचा पर्यावरणीय शिक्षण विचार खालील हेतू साध्य करण्यास कटिबद्ध आहे:

 • निसर्ग आणि माणूस यांचे शाश्वत सहजीवन साध्य करण्यासाठी प्रचलित व्यवस्थेत जो बदल अपेक्षित आहे त्यासाठी एक पूरक शिक्षणपद्धती देणे. नवीन समाज-अर्थव्यवस्था हळूहळू का होईना निर्माण व्हावी, स्थिर व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे मनुष्यबळ या शिक्षणातून तयार करणे. (नव-व्यवस्थाकेंद्री उद्देश) 

 • हे करताना समाजाचे ‘ब्रेनवॉशिंग’ न करता  निसर्ग आणि माणूस यातील मूलभूत संबंधांवर, चिरंतन नात्यावर भर देणे. मानवास सर्वंकष विचार करण्याची प्रेरणा देणे, सवय लावणे. आपण निसर्गातील जैवविविधतेचा केवळ एक भाग आहोत, निसर्गाची राखण करण्याची आपल्या सर्वात एक अंतःप्रेरणा आहे, त्यासाठी लागणारी बुद्धीही आहे, जल-जमीन-हवा-वनस्पती-प्राणी-मानवी समाज यांचे एक शाश्वत नाते होते, आहे, व असावे हे समजावून देणे. त्यायोगे मानवी आयुष्याचा अर्थ कसा पूर्ण होईल याचा शोध घेणे. (मानवकेंद्री उद्देश)

 • मानवी उपभोग, जीवनशैली, आणि अर्थव्यवस्था यांच्यात सर्वंकष दृष्टिकोनामुळे काय बदल व्हायला हवेत याचे विद्यार्थ्यास व पालकांना भान आणून देणे. 

 • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावरील पर्यावरणीय आव्हानांबरोबरच विद्यार्थ्यास स्थानिक निसर्ग, स्थानिक परिसंस्था, स्थानिक संसाधने, स्थानिक अर्थव्यवस्था, स्थानिक जमीनवापर,  स्थानिक जैववैविध्य, स्थानिक निसर्ग-माणूस संबंध, त्यांना जोडलेले भाषा व संस्कृती यांचे ताणेबाणे, यांचेही पूर्ण आकलन व्हावे, त्याचे उपयोजन करता यावे. 

 • या शिक्षण विचारात शिक्षकांबरोबरच पालक हे महत्वाचे भागीदार आणि योजक मानले आहेत. या दोघांनाही सर्वंकष दृष्टिकोन, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास व त्याचे गांभीर्य, आणि शाश्वत जीवनशैलीची गरज, याचे आकलन व्हावे, नवीन निसर्गस्नेही समाज-अर्थ रचना  घडविण्याच्या दिशेने त्यांना पावले टाकता यावीत हाही या शिक्षण विचाराचा एक हेतू आहेच. आमच्या मते, पालक आणि शिक्षक कुठल्याही प्रचलित शिक्षण पद्धतीचे किंवा शैक्षणिक विचारवंताचे झापडबंद अनुकरण करणारे नसावेत. त्यांनी नवीन शिक्षण विचारांचे सर्जन, रचना, वेगवेगळॆ प्रयोग यात भाग घ्यावा. एकमेकांच्या सहकार्याने पुढे जावे.   

 • निसर्गाच्या सौंदर्याचे अवलोकन-आकलन व आस्वाद  हासुद्धा या शिक्षण विचाराचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थी जसा मानवनिर्मित कलेचा रसास्वाद घ्यायला शिकतो, तशीच प्रक्रिया नैसर्गिक सौंदर्याबाबतही व्हावी. निसर्गासाठी एक सौंदर्यदृष्टी तयार व्हावी. निसर्गात मुलाला निरुद्देश हिंडावेसे वाटावे. त्याच्याशी एक भावनिक नाते जडावे. (अधिक स्पष्टीकरण या लेखात पहा) 

 • या शिक्षण विचारात निसर्ग विज्ञानाचे वेगवेगळे धागे एकत्र जोडले जातील. पारिस्थितीकी  व अर्थशास्त्र यांचा संबंध समजून घेतला जाईल. यातून जी शहाणीव येईल तिचा नवीन व्यवस्था घडवताना उपयोग केला जाईल. 

 • निसर्ग-,माणूस संबंधांचा संपूर्ण पट उलगडून पाहणे हाही एक महत्वाचा हेतू. (अधिक स्पष्टीकरण या लेखात पहा) या केंद्रबिंदूभवती महत्वाच्या अनेक संकल्पना तपासल्या जातील: तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, जमीनवापर, शेती, अन्नव्यवस्था, अर्थकारण, सत्ताकारण आणि शासन, पर्यावरणीय न्याय, लिंगसमानता, संसाधन-समता, सामाजिक समता, जागतिकीकरण, इ.    

 

पुढील ११ लेखात आपण शालेय विद्यार्थी वयानुसार कसा बदलत-उमलत जातो हे समजावून घेऊ. त्यांनतर अभ्यासक्रमाचा गाभा व शिकविण्याच्या पद्धतींकडे वळू. 

bottom of page